युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे 1 ते 3 एप्रिल 2025 दरम्यान ‘विकसित भारत युवा संसद 2025’ चे केले जाणार आयोजन.

Posted On: 30 MAR 2025 3:25PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या नेतृत्वाखाली युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय 1 ते 3 एप्रिल 2025 दरम्यान ‘विकसित भारत युवा संसद’ आयोजित करणार आहे. पारंपरिक युवा संसदेची पुनर्कल्पना करणारा हा कार्यक्रम तरुणांना राजकारण आणि सार्वजनिक धोरणाशी सम्मिलित करण्यासाठी तसेच प्रशासन आणि राष्ट्र उभारणीमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी एक प्रबळ व्यासपीठ म्हणून काम करतो.

कोविड-19 नंतर प्रथमच, सर्व जिल्ह्यात नोडल फेरी (300) प्रत्यक्ष सहभागातून आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कार्यक्रमात युवावर्गाचा अधिकाधिक तसेच प्रत्यक्ष सहभाग सुनिश्चित झाला. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 75,000 हून अधिक तरुणांनी माय भारत पोर्टलद्वारे आपल्या व्हिडिओ प्रवेशिका सादर केल्या होत्या. यातून राष्ट्राचे भविष्य घडविण्यासाठी तरुणांचा उत्साह आणि वचनबद्धता दिसून येते. या कार्यक्रमातील सहभागासाठीची संपूर्ण निवड प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडली. यातून प्रशासकीय उपक्रमांमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर प्रतिबिंबित होतो.

विकसित भारत युवा संसदेची रचना तीन प्रमुख टप्प्यात केली गेली आहे:

जिल्हा नोडल फेरी:

एक राष्ट्र, एक निवडणूक या विषयावरील चर्चा, 300 जिल्हा नोडल स्तरावर झालेल्या संवादांद्वारे प्रत्येक शहर आणि गावात पोहोचली.

या फेरीत पात्र होण्यासाठी, इच्छुकांनी 1 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यात त्यांनी "विकसित भारताचा तुमच्या लेखी काय अर्थ होतो?" या प्रश्नाचे उत्तर दिले होते.

राज्य स्तरीय फेरी:

17 हून अधिक राज्यातील विधानसभा आणि इतर सरकारी आस्थापनांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या फेऱ्यांनी युवक आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी एक दुवा म्हणून काम केले.

सत्रांचे अध्यक्षपद विधानसभेचे सभापती आणि राज्यपालांनी भूषवल्याने युवा चर्चांना विश्वासार्हता आणि महत्त्व प्राप्त झाले.

राष्ट्रीय फेरी (1 - 3 एप्रिल 2025):

प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील (एकूण 108 तरुण) सर्वोत्कृष्ट 3 उमेदवारांची राष्ट्रीय स्तरावरील फेरीत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

या फेरीतसाठी पात्र ठरलेले सहभागी उच्चस्तरीय चर्चा आणि उपक्रमांमध्ये सहभागी होतील - ते याप्रमाणे-

प्रश्नोत्तर तास: एक राष्ट्र, एक निवडणूक आणि विकसित भारत यावर केंद्रित असेल. या तासाचा शेवट एका ठरावाने होईल.

मास्टरक्लास: या सत्रात एक ज्येष्ठ संसद सदस्य तरुणांना संसदेत आवश्यक असणारे वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्यांबाबत मार्गदर्शन करतील.

संसदीय अनुभव: प्रशासनाच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सत्रांना उपस्थित राहणे.

पंतप्रधान संग्रहालय भेट: भारताचा राजकीय प्रवास आणि नेतृत्वाच्या कथांबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करेल.

पुरस्कार समारंभ: 3 एप्रिल रोजी, विकसित भारत युवा संसद पुरस्कार आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान केले जातील.

विकसित भारत युवा संसद केवळ एक कार्यक्रम नाही, तर ही एक परिवर्तनकारी चळवळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निर्माण झालेले विचार आणि चर्चा सेंट्रल हॉलची सीमा ओलांडून सर्वांपर्यंत पोहोचून देशभरात प्रतिध्वनित होतील आणि युवकांच्या नेतृत्वाखालील धोरणात्मक सहभाग आणि राष्ट्रीय प्रगतीच्या नवीन युगाचा मार्ग मोकळा करतील

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2116870) Visitor Counter : 48


Read this release in: Odia , English , Urdu , Hindi , Tamil