आदिवासी विकास मंत्रालय
धरती आबा ट्राइबप्रेन्युअर्स 2025 : जनजातीय गौरव वर्षाअंतर्गतचा राष्ट्रीय उपक्रम
अनुसूचित जमातीतील उद्योजकांचे सक्षमीकरण: स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये 45 पेक्षा आदिवासी स्टार्टअप होणार सहभागी
Posted On:
29 MAR 2025 2:27PM by PIB Mumbai
भारत सरकारचे आदिवासी व्यवहार मंत्रालय धरती आबा ट्राइबप्रेन्युअर्स 2025 अर्थात धरती आबा आदिवासी जमातील उद्योजक 2025 या उपक्रमांच्या माध्यमातून अनुसूचित जमातींमधील नवोदित आणि प्रस्थापित उद्योजकांसाठी एक परिवर्तनकारी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या 3 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे स्टार्टअप महाकुंभ 2025 चे आयोजन केले गेले आहे. याच आयोजनाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील सर्वात आश्वासक स्टार्टअप्सना एकत्र आणले जाणार आहे. यामुळे अनुसूचित जमातीतील उद्योजकांना उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वे, उद्यम भांडवलदार (Venture Capitalist) आणि परिणामकारी गुंतवणूकदारांची (impact investor) भेट घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे या उद्योजकांच्या सर्वसमावेशक आर्थिक वाढीला आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे.
जनजातीय गौरव वर्ष: भगवान बिरसा मुंडा यांच्या वारशाचा सन्मान
धरती आबा ट्राइबप्रेन्युअर्स 2025 हा जनजातीय गौरव वर्षांतर्गत राबवला जाणारा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. आदिवासी समाजातील थोर स्वातंत्र्यसैनिक आणि नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित केला जात आहे. भारत सरकारने हे वर्ष आदिवासी समाजातील उद्योजकता, नवोन्मेष आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित केले आहे. स्टार्टअप महाकुंभ 2025 च्या माध्यमातून आदिवासी समाजातील उद्योजकांचे सक्षमीकरण केले जाणार असून, याद्वारे आदिवासी व्यवहार मंत्रालय भगवान बिरसा मुंडा यांच्या आत्मनिर्भर आणि सक्षम आदिवासी समुदायाच्या दृष्टिकोनालाच बळ देत आहे.
आदिवासी उद्योजकतेला मोठे प्रोत्साहन
आदिवासी व्यवहार मंत्रालय आदिवासी समुदायांचे सक्षमीकरण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून ठाम निश्चयाने काम करते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर आदिवासी या ददृष्टिकोनावर भर दिला आहे. याच दृष्टिकोनाच्या अनुषंगाने, अनुसूचित जमातींसाठी स्टार्टअप परिसंस्थेला बळकटी देण्याकरता, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आपल्या 100 दिवसांच्या निर्धारीत कार्यक्रमांअंतर्गत हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे.
या परिवर्तनाला ठोस दिशा देण्यासाठी, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने कोलकात्यातील भारतीय व्यवस्थापन संस्था, दिल्ली मधील भारतीय तंत्रज्ञान संस्था, आयएफ़सीआय व्हेंचर कॅपिटल फंड्स लिमिटेड आणि प्रमुख उद्योग संघटनांसारख्या आघाडीच्या संस्थांसोबत भागीदारी केली आहे. या भागिदारीमुळे या उपक्रमाचा प्रभाव गहिरा असेल आणि तो दीर्घकाळ कायम राहील याची सुनिश्चिती होणार आहे. आदिवासी समुदायांमधील उद्योजकता आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित असलेल्या अनुसूचित जमातींसाठीच्या उद्यम भांडवल निधीची स्थापना हा या संपूर्ण वाटचालातील महत्वाचा टप्पा असून, याअंतर्गत 50 कोटी रुपयांच्या प्रारंभिक निधीची तरतूद केली गेली आहे.
स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये आदिवासी उद्योजकता असणार केंद्रस्थानी
या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने, कोलकत्ता इथली भारतीय व्यवस्थापन संस्था, काशीपूर इथली भारतीय व्यवस्थापन संस्था आणि भिलाई इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत इनक्युबेट झालेल्या अर्थात प्राथमिक टप्प्यावर सहकार्य प्राप्त केलेल्या अनुसूचित जमातीतील उद्योजकांच्या स्टार्टअपसह, अनुसूचित जमातीतील उद्योजकांनी स्थापन केलेले 45 पेक्षा जास्त स्टार्टअप, स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये सहभागी होणार आहेत. यापैकी काही स्टार्टअप्सना या आधीच आयएफ़सीआय व्हेंचर कॅपिटलकडून आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
धरती आबा ट्राइबप्रेन्युअर्स 2025 या उपक्रमाअंतर्गत नवोन्मेष, सर्वसमावेशकता आणि बाजारपेठेच्या विस्तारावर सर्वाधिक भर दिला गेला आहे. यामुळे हा उपक्रम आदिवासी समाजातील व्यक्तींच्या नेतृत्वाखालील उद्योग व्यवसायांना प्रत्यक्ष जगात प्रवेश मिळवून देणाऱ्या व्यासपीठाप्रमाणे कामी येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा उद्योजकांसाठी मार्गदर्शन, धोरणात्मक संपर्कव्यवस्थेचा विस्तार आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील याचीही सुनिश्चिती होऊ शकणार आहे.
आदिवासी समाजातील नवोन्मेषकांच्या भावी पिढ्यांची जडणघडण
आदिवासी समाजातील युवा प्रतिभांना प्रेरणा आणि प्रशिक्षण देण्यासाठी, आदिवासी व्यवहार मंत्रालय खाली नमूद केल्याप्रमाणे अनेक उपक्रम राबवत आहे :
स्टार्टअप महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या विशेष बूट कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील (EMRS) 100 विद्यार्थ्यांना संधी.
शिष्यवृत्ती मिळवलेल्या 150 आदिवासी विद्यार्थ्यांना भारतातील वेगाने विस्तारत असलेल्या स्टार्टअप परिसंस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी.
उन्नत भारत अभियानाअंतर्गच्या अनुसूचित जमातींमधील 50 विद्यार्थ्यांना उद्योजक आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची संधी
***
S.Kakade/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2116592)
Visitor Counter : 73