नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताची सागरी क्षेत्रातील व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी महत्वाच्या असलेल्या सागरी विधेयकाला लोकसभेत मंजुरी

Posted On: 28 MAR 2025 9:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मार्च 2025

 

भारताच्या सागरी क्षेत्राचे आधुनिकीकरण, कायदेशीर चौकटीचे अद्ययावतीकरण तसेच व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, लोकसभेत आज ‘सागरी मार्गाने मालवाहतूक विधेयक 2024’ हे महत्वाचे विधेयक मंजूर करण्यात आले. 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हे विधेयक सादर केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सागरी मार्गाने मालवाहतूक विधेयक लोकसभेत मंजूर होणे, हे भारताच्या कायदेशीर चौकटीचे अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरण करून, ती अधिक कालसुसंगत, कार्यक्षम आणि सुलभ बनवून, प्रगतीला अडथळा ठरणारा वसाहतकालीन वारसा मागे सोडण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन साकारण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाउल आहे. हे विधेयक मंजूर होणे म्हणजे सागरी व्यापारासाठी भारताचा कायदेशीर पाया मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. यामुळे केवळ गुंतवणूकदारांचा विश्वास वाढणार नसून, विकसित भारत म्हणून भारताचे स्थानही मजबूत होईल. 

केंद्रीय मंत्र्यांनी 'इंडियन पोर्ट्स बिल (भारतीय बंदरे विधेयक) 2025' देखील सादर केले. बंदर व्यवस्थापनाशी संबंधित कायद्यांचे एकत्रीकरण करणे, एकात्मिक बंदर विकासाला प्रोत्साहन देणे आणि सागरी क्षेत्रात व्यवसाय सुलभता वाढवणे हे याचे उद्दिष्ट  आहे. प्रमुख बंदरांखेरीज  इतर बंदरांचेही  प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सागरी मंडळांची स्थापना आणि सक्षमीकरण करून भारताच्या विशाल सागरी किनारपट्टीचा अधिकाधिक वापर करण्याचा या विधेयकाचा प्रयत्न आहे. या विधेयकात बंदर क्षेत्राच्या संरचित विकासाला चालना देण्यासाठी सागरी राज्य विकास परिषदेच्या स्थापनेचाही प्रस्ताव आहे.

केंद्रीय मंत्री सोनोवाल पुढे म्हणाले की,  आधुनिक, कार्यक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक नौवहन क्षेत्राच्या दिशेने सुरु असलेल्या भारताच्या प्रवासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल. सागरी मार्गाने मालवाहतूक विधेयक 2024 लोकसभेत मंजूर होणे म्हणजे, भविष्यासाठी सज्ज आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनण्यासाठी भारताच्या सागरी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन साकारण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाउल आहे.

 

* * *

S.Kakade/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2116475) Visitor Counter : 42


Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam