संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research & Development Organisation - DRDO) आणि भारतीय नौदलाने केली स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून हवेत उडणाऱ्या, छोट्या पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी


ही क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींने वाढवणारी ठरेल - संरक्षण मंत्री

Posted On: 26 MAR 2025 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2025

 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research & Development Organisation - DRDO) आणि भारतीय नौदलाने 26 मार्च 2025 रोजी दुपारी सुमारे 12.00 वाजता ओडिशात चांदीपूरच्या किनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी प्रक्षेपण केंद्रात (Integrated Test Range) स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून हवेत उडणाऱ्या छोट्या पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी जमिनीवर उभ्या स्वरुपात असलेल्या प्रक्षेपक यंत्रणेद्वारे केली गेली. या चाचणीअंतर्गत  अतिशय जवळच्या अंतरावर आणि कमी उंचीवर असलेल्या एका उच्च - गतीचे हवाई लक्ष्य यशस्वीपणे भेदले गेले. या चाचणीमुळे भारताने सीमेच्या जवळ कमी उंचीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता साध्य केली आहे.

A rocket launching from a buildingDescription automatically generated

या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य यशस्वीपणे भेदत ते पूर्णतः उध्वस्त केले. याअंतर्गत क्षेपणास्त्राने अतिशय जवळच्या अंतरावरील लक्ष्य भेदण्यासाठी आवश्यक असलेली उच्च गतीही गाठली. या चाचणीतून या क्षेपणास्त्राचा  वेग, विश्वासार्हता आणि अचूकता सिद्ध झाली आहे. ही क्षेपणास्त्र चाचणी सर्व शस्त्रास्र विषयक प्रणालीच्या युद्धाच्या वेळी तैनात असलेल्या घटक आणि उपकरणांसह  घेण्यात आली. यात स्वदेशी बनावटीचे रेडिओ फ्रिक्वेन्सी शोधक, मल्टी - फंक्शन रडार आणि शस्त्र नियंत्रण प्रणालीचा समावेश होता. चाचणी दरम्यान या सर्व प्रणाल्यांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. या चाचणी अंतर्गत चांदीपूरच्या एकात्मिक चाचणी प्रक्षेपण केंद्राने विकसित केलेल्या विविध पल्ल्याच्या क्षमतेच्या उपकरणांनी नोंद केलेल्या उड्डाण विषयक माहितीच्या आधारे सर्व प्रणालींच्या कार्यक्षमतेची पडताळणी केली गेली.

या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भारतीय नौदल आणि संरक्षण उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेतील एक सक्षम डिझाइन आणि विकास क्षमतेचाच पुरावा असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींने वाढवणारी ठरेल असा विश्वासही संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

संरक्षण विषयक संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे  अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी देखील या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भारतीय नौदल आणि या चाचणीशी संबंधित चमूचे अभिनंदन केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले या क्षेपणास्त्रामुळे, सशस्त्र दलांना तंत्रज्ञान वापरासाठी अधिक चालना मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.

 

* * *

JPS/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2115668) Visitor Counter : 24


Read this release in: Odia , English , Urdu , Bengali