निती आयोग
नीती आयोगाच्या वतीने गुजरात मधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटी येथे ‘भारतीय नवोन्मेष परिसंस्थेत समन्वय निर्मिती’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
24 MAR 2025 2:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2025
भारताच्या नवोन्मेषी परिसंस्थेला मजबूत करण्याच्या हेतूने एका ऐतिहासिक उपक्रमाअंतर्गत गुजरात मधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटी येथे 22 मार्च 2025 रोजी ‘भारतीय नवोन्मेष परिसंस्थेत समन्वय निर्मिती’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नीती आयोग आणि गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद (GUJCOST), DST ने ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.
प्रामुख्याने सरकारी अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी, औद्योगिक जगतातील तज्ञ, स्टार्ट अप्सचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा समावेश असलेल्या हितधारकांमध्ये संवाद स्थापन करणे आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणे हा या परिषदेचा उद्देश होता. सर्व संबंधित क्षेत्रांमध्ये समन्वय वाढीस लागावे या उद्देशाने या परिषदेची रचना करण्यात आली होती, त्यामध्ये संशोधन आणि विकास यांमधील गुंतवणूक, नवोन्मेषाशी निगडित सरकारी धोरणे, जागतिक स्तरावरील नवोन्मेषाचे कल आणि तळागाळात विकसित होणारी उद्योजकता अशा महत्वपूर्ण विषयांवर उपस्थितांमध्ये विचारविनिमय झाला.
या कार्यशाळेला नीती आयोगाचे सदस्य (विज्ञान आणि तंत्रज्ञान) डॉ. व्ही. के. सारस्वत आणि गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव मोना खंदार ,आयएएस उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या कार्यशाळेचे महत्व अधोरेखित झाले तसेच नवोन्मेष, उद्योजकता आणि तांत्रिक प्रगती या क्षेत्राला सानुकूल वातावरण निर्माण करण्याप्रति सरकारची वचनबद्धता बळकट केली.
आपल्या उद्घाटनपर भाषणात,डॉ. व्ही.के. सारस्वत यांनी भारताच्या नवोन्मेषाच्या क्षेत्रात सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वयाच्या महत्वाच्या भूमिकेवर भर दिला. अर्थपूर्ण नवोन्मेषाला चालना देणाऱ्या मूलभूत विज्ञान शोधांना अधिक जलद आणि कार्यक्षमतेने व्यवहारात आणू शकणाऱ्या संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे, ज्यामुळे प्रभावी स्टार्टअप्सची निर्मिती होऊन नवोन्मेषाच्या दिशेने होणाऱ्या जागतिक बदलांचे प्रतिबिंब त्यात उमटेल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय डीप टेक स्टार्टअप्सना सहाय्य करणे अतिशय महत्वाचे असून भारताला सेवा आधारित उद्योगाकडून उत्पादन आधारित उद्योग मॉडेलकडे संक्रमण करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या डॉ. साचा वुन्श-व्हिन्सेंट यांनी भारताच्या अनोख्या विकास प्रवासासाठी पुढील 10 वर्षांसाठी कृती मुद्दे मांडले. भारताचे आयपी प्रोफाइल लहान आहे परंतु गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे, भारतीय मूळ असलेले पेटंट दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि नजीकच्या काळात देशात आणखी विज्ञान आणि तंत्रज्ञान समूह यात जोडले जातील असेही ते म्हणाले.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114342)
Visitor Counter : 30