सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, एनएसओ द्वारे आयआयटी गांधीनगर येथे आयोजित "हॅक द फ्युचर" हॅकेथॉन यशस्वीरित्या संपन्न
Posted On:
24 MAR 2025 8:52AM by PIB Mumbai
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ ) भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गांधीनगरच्या सहकार्याने आयआयटी गांधीनगर संकुलात आयोजित केलेल्या "हॅक द फ्युचर" या 36 तासांच्या हॅकेथॉनची आज यशस्वीरित्या सांगता झाली.
या उपक्रमात भारतातील आय आय टी, एन आय टी आणि आय आय आय टी यांसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधील 18 संघ सहभागी झाले होते. मंत्रालयाच्या आणि शैक्षणिक संस्थांच्या मार्गदर्शकांच्या सहाय्याने सर्व सहभागी सदस्यांनी त्यांना देण्यात आलेल्या तीन अत्यंत नाविन्यपूर्ण आव्हानांवर उपाय सुचवले. उद्योगजगत, शैक्षणिक संस्था आणि मंत्रालयाच्या पाच सदस्यीय ज्युरींनी सर्व अंतिम उत्तरांचे मूल्यांकन केले.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव आणि एन एस ओ चे प्रमुख डॉ. सौरभ गर्ग तसेच एन एस ओ इंडियाचे महासंचालक पी.आर.मेश्राम आणि आय आय टी गांधीनगरचे संचालक डॉ. रजत मुना यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ झाला.
पी.आर.मेश्राम यांनी आपल्या भाषणात सर्व सहभागी सदस्यांचे अभिनंदन केले. हॅकेथॉन म्हणजे आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या प्रयत्नांचा व्यापक विस्तार असल्याचे त्यांनी सांगितले. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने तयार केलेल्या विशाल डेटा संचाचा पुरेपूर उपयोग करून सर्व सहभागींनी हॅकेथॉनच्याही पलीकडे विश्लेषणात्मक विज्ञान आणि सांख्यिकी या क्षेत्रातील आपले कार्य निरंतर सुरु ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. मंत्रालयाने या दिशेने सुरु केलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
या उपक्रमाला देशभरातून मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल डॉ गर्ग यांनी समाधान व्यक्त केले आणि अंतिम फेरीतील सर्व संघांचे अभिनंदन केले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपले योगदान देण्यासाठी सहभागींनी या क्षेत्रातील कार्य असेच पुढे चालू ठेवावे अशा शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिले.
एकूण तीन श्रेणींमध्ये पहिल्या तीन सोल्यूशन्सना बक्षिसे देण्यात आली. चंदीगड येथील प्लक्षा विद्यापीठाने दोन श्रेणींमध्ये अव्वल स्थान पटकावले, तर राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजीने उर्वरित श्रेणीत बाजी मारली. आयआयटी जम्मू, व्हीआयटी वेल्लोर आणि एनआयटी गोवा यांनी त्यांच्या संबंधित श्रेणींमध्ये दुसरे स्थान पटकावले, तर एनएमआयएमएस मुंबई, आयआयआयटी वडोदरा आणि आयआयटी खरगपूर यांनी त्यांच्या श्रेणींमध्ये तिसरे स्थान पटकावले.
सर्व हितधारकांच्या सहकार्याद्वारे नवोन्मेषाला चालना देण्याच्या सामूहिक वचनबद्धतेसह कार्यक्रमाची सांगता झाली.

***
SushamaK/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114264)
Visitor Counter : 39