कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
आजवर केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषा माध्यम असणाऱ्या भरती परीक्षा आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जात असल्याची केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली प्रशंसा, उच्चस्तरीय आढावा बैठकीचे भूषवले अध्यक्षस्थान
Posted On:
22 MAR 2025 8:06PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, भरती परीक्षा आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जात असल्याची प्रशंसा केली आहे. 2014 सालापूर्वी हिंदी आणि इंग्रजी भाषा माध्यमापुरत्या मर्यादित भरती परिक्षांचा हा विस्तार हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही ते म्हणाले. नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथील कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात (डीओपीटी) आयोजित उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले. भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि तंत्रज्ञान-चालित सुधारणांद्वारे सुप्रशासनाची व्याप्ती वाढविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.

भरती चक्राचा सरासरी कालावधी 15 महिन्यांवरून 8 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, येत्या काळात या अवधीत आणखी कपात करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. आपल्या प्रयत्नांतून अमलात आलेल्या सार्वजनिक परीक्षा (अन्याय्य साधनांना प्रतिबंध) कायदा, 2024 ची त्यांनी आठवण करून दिली. या कायद्याचे नियम आणि तपशील अधिसूचित करण्यात आले आहेत, याला त्यांनी दुजोरा दिला.
केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना संगणक-आधारित चाचण्या घेण्यासाठी मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे स्थापित करण्याचे निर्देश दिले. यामुळे सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, असे ते म्हणाले. नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांवरचा भार कमी करण्यासाठी आणि विविध प्लॅटफॉर्मवर अर्ज करण्यात खर्च होणारा त्यांचा वेळ आणि ऊर्जा वाचवण्यासाठी 'सिंगल जॉब ॲप्लिकेशन पोर्टल' तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी मिशन कर्मयोगीचा आढावा घेतला. आतापर्यंत जवळपास 89 लाख कर्मयोगींना या मिशनमध्ये सामावून घेण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी क्षमता बांधणीचे महत्त्वही मंत्रीमहोदयांनी अधोरेखित केले.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2114105)
Visitor Counter : 31