संरक्षण मंत्रालय
गोवा शिपयार्ड कंपनीने दुसऱ्या P1135.6 लढाऊ नौकेचे जलावतरण केले, भारताच्या स्वदेशी युद्धनौका उभारणीतील एक ऐतिहासिक टप्पा
Posted On:
22 MAR 2025 1:51PM by PIB Mumbai
गोवा शिपयार्ड लिमिटेड या भारतातील प्रमुख लष्करी जहाजबांधणी कंपनीने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. Project 1135.6 (Yard 1259) अंतर्गत तयार झालेल्या ‘तवास्य’ या दुसऱ्या युद्धनौकेचे आज 22 मार्च 2025 रोजी यशस्वी जलावतरण करण्यात आले. युद्धनौकांच्या बांधणीच्या बाबतीत भारताच्या स्वावलंबनाचा हा पुढचा टप्पा असून याद्वारे संरक्षण उत्पादनांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा भारताचा निर्धार दृढ झाला आहे.
नीता सेठ यांच्या हस्ते समारंभपूर्वक या नौकेचे जलावतरण करण्यात आले. यावेळी संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जगातील अस्थिर भूराजकीय वातावरणाचा पुरवठा साखळीवर परिणाम झालेला असतानाही केवळ आठ महिन्यांत दोन महत्त्वपूर्ण, शस्त्रास्त्रसज्ज नौकांचे जलावतरण करणाऱ्या गोवा शिपयार्ड कंपनीची संरक्षण राज्य मंत्र्यांनी प्रशंसा केली. नौदलाच्या वाढत्या आत्मनिर्भरतेबाबत बोलताना ते म्हणाले की भारतीय नौदलाच्या इतिहासात आजचा दिवस निर्णायक असून यातून आपली तंत्रज्ञानविषयक क्षमता आणि आत्मनिर्भरतेप्रती अढळ वचनबद्धता दिसून येते. ब्राम्होस क्षेपणास्त्र यंत्रणा, टॉर्पेडो प्रक्षेपक, सोनार आणि सहायक नियंत्रण प्रणाली हे भारताची जहाजबांधणी परिसंस्थेतील आत्मनिर्भरता वाढत असल्याचे प्रतीक आहेत. तवास्यचे जलावतरण हा भारतीय नौदलासाठी केवळ एक पुढचा टप्पा नाही तर संरक्षण क्षेत्रातील धोरणात्मक महत्त्वाकांक्षांच्या पूर्ततेसाठी घेतलेली मोठी झेप आहे, असेही ते म्हणाले.
3800 टनांपेक्षा जास्त वजनाच्या तवास्य युद्धनौकेची बांधणी बचावात्मक आणि आक्रमक स्वरुपाची विविध कामे पार पाडण्याच्या दृष्टीने करण्यात आली असून यामुळे हिंद महासागर क्षेत्रात धोरणात्मक वर्चस्वाची हमी मिळत आहे. ही नौका प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे आणि भारतीय नौदलाच्या कार्यक्षमतेला चालना देणारी आहे असे मंत्र्यांनी सांगितले. युद्धनौकांच्या निर्यातीत जागतिक पातळीवरील आघाडीचा देश म्हणून उदयाला येण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेचा त्यांनी पुनरुच्चार केला. संरक्षण निर्यातीमध्ये जीएसएल कंपनीची भूमिका अग्रणी असल्याचे सांगून 2029 सालापर्यंत संरक्षण निर्यात 50000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संरक्षण मंत्रालयाचे ध्येय आहे असे त्यांनी नमूद केले.

देशासाठी धोरणात्मक संरक्षण सामग्री तयार करताना कंपनीच्याही प्रगतीत लक्षणीय क्रांती झाल्याचा उल्लेख जीएसएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी यावेळी केला. तवस्याचे जलावतरण हे आमच्या स्वदेशी जहाजबांधणीत सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन केलेल्या अथक परिश्रमाचे फलित आहे. मध्यम आकाराच्या जहाजबांधणी कंपनीपासून जीएसएल कंपनीने संरक्षण क्षेत्रात नेतृत्व करण्यापर्यंत मजल मारली आहे. आता आम्ही सर्वात गुंतागुंतीच्या नौदल मंचांपैकी काही भाग बनवून देत आहोत. अत्याधुनिक युद्धनौका बांधणी प्रकल्प आम्ही अचूकता, कार्यक्षमता आणि देशाच्या सुरक्षेशी एकनिष्ठ राहून पूर्णत्वास नेऊ शकतो हे या प्रकल्पाच्या यशामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार सदानंद तानवडे, लोकसभेचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस, व्हाइस ऍडमिरल एस जे सिंग, व्हाइस ऍडमिरल राजाराम स्वामीनाथन, वरीष्ठ अधिकारी, जीएसएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय तसेच संरक्षण मंत्रालय, भारतीय नौदलातील अधिकारी आणि जीएसएलचे कर्मचारी उपस्थित होते.

अशाप्रकारच्या गुंतागुंतीच्या रचना उभारण्याचा भारतीय जहाजबांधणी कंपनीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यापूर्वी ते संपूर्ण तयार अवस्थेत आयात केले जायचे. यामध्ये 56 टक्के सामुग्री स्वदेशी आहे, बाहेरच्या देशात तयार होणाऱ्या याप्रकारच्या युद्धनौकेत ती आधी 25 टक्के होती. ही युद्धनौका भारतीय अभियांत्रिकी क्षेत्राचे वर्चस्व वाढत असल्याचे लखलखते उदाहरण असून देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याचे आणि जागतिक संरक्षण क्षेत्रात भारताचे स्थान आणखी मजबूत करण्याचे काम करत आहे. नौदलाच्या सर्व प्रकारच्या युद्धकौशल्यांसाठी उपयोगी ठरेल अशाप्रकारे या बहुउपयोगी युद्धनौकेची रचना करण्यात आली आहे. हवेत, पाण्याच्या पृष्ठभागावर आणि पाण्याखालीही याची कार्यक्षमता अजोड आहे.
या प्रभावी कामगिरीमुळे भारताच्या संरक्षण जहाजबांधणी उद्योगात जीएसएल कंपनीला आघाडीचे स्थान मिळाले आहे. या कंपनीने गेल्या वर्षात सात जहाजांचे यशस्वी जलावतरण केले आहे. यातून कंपनीची बहुआयामी, अत्याधुनिक जहाजबांधणी क्षमता अधोरेखित होते.
***
M.Pange/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2114009)
Visitor Counter : 58