युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मध्य आशियाई युवा शिष्टमंडळ 22 ते 28 मार्च 2025 दरम्यान भारत भेटीवर येणार
प्रविष्टि तिथि:
21 MAR 2025 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2025
केंद्र सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, आंतरराष्ट्रीय युवा आदानप्रदान कार्यक्रम अंतर्गत 22 ते 28 मार्च 2025 दरम्यान भारतात तिसऱ्या मध्य आशियाई युवा शिष्टमंडळाचे यजमानपद भूषवणार आहे. या उपक्रमाचा उद्देश भारत आणि मध्य आशियाई देश - कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान दरम्यान युवा सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि राजनैतिक संबंध मजबूत करणे हा आहे.
जानेवारी 2022 मध्ये झालेल्या भारत-मध्य आशिया शिखर परिषदेत मांडण्यात आलेल्या दृष्टिकोनानुसार हा कार्यक्रम होत आहे, ज्यामध्ये भारताच्या पंतप्रधानांनी या प्रदेशातील युवा नेत्यांमध्ये परस्पर सामंजस्य वाढविण्यासाठी वार्षिक युवा आदानप्रदान उपक्रमाचा प्रस्ताव मांडला होता. 100 सदस्यांचे हे शिष्टमंडळ विविध उपक्रमांमध्ये सहभागी होईल, स्थानिक युवा नेते आणि प्रमुख हितधारकांशी संवाद साधतील तसेच भारतातील ऐतिहासिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देतील.
भेटीची ठळक वैशिष्ट्ये:
- सांस्कृतिक आणि वारसा स्थळांना भेट: भारताचा स्थापत्य आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी ताजमहाल, आग्रा किल्ला, हुमायूनचा मकबरा आणि गोव्यातील वारसा स्थळांचा दौरा
- शैक्षणिक आणि आर्थिक सहभाग: आयआयटी दिल्ली येथील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेमध्ये भारताने केलेल्या प्रगतीबाबत जाणून घेण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री /गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला भेट देणे .
- युवकांशी संवाद आणि स्वयंसेवा: युवा सक्षमीकरण, नेतृत्व आणि नवोन्मेष यावर चर्चा करण्यासाठी माय भारत स्वयंसेवकांशी संवाद
- उच्चस्तरीय राजनैतिक संवाद: युवा मुत्सद्देगिरीच्या महत्वावर भर देत परराष्ट्र मंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री आणि गोव्याचे राज्यपाल यांच्या भेटीचे आयोजन करण्यात येणार
- सांस्कृतिक आदानप्रदान आणि मेजवानीचे आयोजन: शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ एक गोलमेज आणि अनौपचारिक मेजवानीचे आयोजन केले जाईल ज्यामध्ये प्रतिनिधी त्यांच्या देशातील तरुणांशी संवाद साधण्यासंबंधी त्यांच्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करतील.
ही भेट भविष्यातील सहकार्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, आंतर-सांस्कृतिक सामंजस्य, नेतृत्व विकास आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देईल. हा युवा आदानप्रदान कार्यक्रम मध्य आशियासोबत प्रादेशिक शांतता, मैत्री आणि आर्थिक भागीदारीप्रति भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देतो, ज्यामुळे सद्भावनेचे बंध अधिक मजबूत होतील.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2113684)
आगंतुक पटल : 86