श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जानेवारी 2025 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) 17.89 लाख सदस्यांची निव्वळ भर


8.23 लाख नवीन सदस्यांची झाली नोंदणी

Posted On: 20 MAR 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2025

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) जानेवारी 2025 साठी वेतनपटाबाबत तात्पुरती माहिती जारी केली असून, या महिन्यात 17.89 लाख सदस्यांची निव्वळ भर पडली असल्याचे यातून दिसून येत आहे. डिसेंबर 2024 मधील स्थितीच्या तुलनेत जानेवारी 2025 मध्ये वेतनपटावरील एकूण सदस्यसंख्येत 11.48% वाढ नोंदली गेली आहे.

तसेच दर वर्षीच्या माहितीच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की जानेवारी 2024 मधील वेतनपटावरील सदस्यांच्या तुलनेत यावर्षी सदस्यांच्या संख्येत 11.67 टक्क्याची वाढ झाली आहे. ही वाढ  सुधारलेल्या रोजगार संधी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी वाढलेली जागरुकता यांची  निदर्शक आहे आणि त्याला ईपीएफओने राबवलेल्या ​​परिणामकारक संपर्क उपक्रमांमुळे अधिक बळकटी मिळाली आहे.

ईपीएफओ च्या वेतनपटविषयक माहितीची (जानेवारी 2025) प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
 
नवीन सदस्य:

ईपीएफओने जानेवारी 2025 मध्ये सुमारे 8.23 लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली. नव्या सदस्यांची भर पडल्यामुळे गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्ये झालेल्या नवीन सदस्य नोंदणीपेक्षा यावर्षी 1.87% अधिक नोंदणी झाल्याचे दिसते. नव्या सदस्यांच्या संख्येतील वाढीचे श्रेय, वाढलेल्या रोजगार संधी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी वाढलेली जागरुकता आणि ईपीएफओ​​च्या यशस्वी संपर्क कार्यक्रमांना देता येईल.

वय वर्ष 18 ते 25 हा वयोगट नवीन सदस्यत्वाच्या बाबतीत आघाडीवर आहे:

या उपलब्ध माहितीचा एक लक्षात घेण्याजोगा पैलू म्हणजे नवीन सदस्य संख्येत असलेले वय वर्ष 18-25 या वयोगटाचे वर्चस्व, 18 ते 25 वर्ष वयोगटातील 4.70 लाख नवे सदस्य समाविष्ट झाले.जानेवारी 2025 मध्ये दाखल झालेल्या एकूण नव्या सदस्यांमध्ये या गटाचे 57.07%  योगदान आहे या महिन्यात समाविष्ट झालेल्या 18 ते 25 वर्ष वयोगटातील सदस्यांची संख्या गेल्या वर्षी, जानेवारी 2024 मध्ये झालेल्या नवीन सदस्य नोंदणीपेक्षा 3.07% ने वाढल्याचे दिसते.

पुन्हा सामील झालेले सदस्य:

वेतनपट अहवाल अधोरेखित करतो की सुमारे 15.03 लाख सदस्य संघटनेतून बाहेर पडले आणि नंतर काही काळाने पुन्हा ईपीएफओ ​ मध्ये प्रवेश करते झाले. ही आकडेवारी जानेवारी 2024 च्या तुलनेत वर्ष ते वर्ष पातळीवर उल्लेखनीय अशी 23.55% ची वाढ झाल्याचे दर्शवते.

महिला सदस्यत्वातील वाढ:

वेतनपट माहितीच्या लिंगनिहाय विश्लेषणात असे आढळून आले आहे की या महिन्यादरम्यान नव्याने समाविष्ट झालेल्या एकूण सदस्यांपैकी सुमारे 2.17 लाख नवीन सदस्य या महिला आहेत. हा आकडा जानेवारी 2024 च्या तुलनेत 6.01% ची उल्लेखनीय वार्षिक वाढ दर्शवितो.  

राज्यनिहाय योगदान:

वेतनपट माहितीचे राज्यनिहाय विश्लेषण असे दर्शवते की नव्या सभासदांच्या संख्येतील वाढीमध्ये, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पाच राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचा वाटा  सुमारे 59.98% आहे. या महिन्याभरात एकूण सभासद संख्येत सुमारे 10.73 लाख निव्वळ वाढ झाली आहे. सर्व राज्यांपैकी, महाराष्ट्र राज्य नव्या सदस्यांच्या संख्येच्या बाबतीत आघाडीवर असून महिनाभरात राज्यात 22.77% निव्वळ सदस्य वाढले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी महिन्याभरात एकूण निव्वळ सदस्यांपैकी प्रत्येकी 5% पेक्षा जास्त सदस्य वाढ नोंदवली आहे.

उद्योगनिहाय कल:

सभासद संख्येतील एकूण वाढीपैकी सुमारे 39.86% वाढ तज्ञ सेवांमध्ये (मनुष्यबळ पुरवठादार, सामान्य कंत्राटदार, सुरक्षा सेवा, नानाविध उपक्रम इत्यादींसारख्या सेवा) झालेली दिसत आहे.

वेतनपटाची उपरोल्लेखित माहिती तात्पुरती आहे, कारण कर्मचाऱ्यांची नोंद अद्ययावत करणे ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया असल्यामुळे, माहिती संकलित होणे ही देखील एक निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2113313) Visitor Counter : 37