इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आधार सेवा वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी यूआयडीएआयची सर्वम एआय या स्वदेशी जेनएआय कंपनीसोबत भागीदारी
आधार सेवांना मिळणार एआय आधारित व्हॉइस इंटरॅक्शन, फ्रॉड डिटेक्शन आणि बहुभाषा सुविधेचे पाठबळ
Posted On:
18 MAR 2025 7:42PM by PIB Mumbai
यूएडीएआय अर्थात भारतीय सार्वत्रिक ओळख प्राधिकरणाने आधार सेवा वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी सर्वम एआय या स्वदेशी फुल-स्टॅक जनरेटिव्ह एआय कंपनीसोबत भागीदारी केली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित(AI-Powered) आवाजाद्वारे संवाद
सर्वम् या कंपनीसोबत केलेला करार लागू होत असल्याच्या म्हणजे 18 मार्च 2025 या तारखेपासून ही कंपनी नागरी केंद्रित वापराच्या व्यवहारांमध्ये आवाजावर आधारित संवाद साधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सोयी पुरवणार आहे. यामुळे आधार क्रमांक धारकांकडून त्यांची नोंदणी आणि नागरिकांकडून जादा शुल्क आकारणीच्या( झाली असल्यास) माहितीसह अद्यतनीकरण प्रक्रियांसंदर्भात रियल टाईम म्हणजे तत्क्षणी अभिप्राय मिळवता येणार आहे.
वाढीव सुरक्षेसाठी रियल टाईम फ्रॉड ऍलर्ट्स
या करारानुसार, आधार वापरकर्त्यांच्या प्रमाणीकरणासाठी आलेली विनंती कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे होणाऱ्या पडताळणीत संशयास्पद आढळली तर त्याचा तात्काळ इशारा(real-time fraud alerts) आधार वापरकर्त्यांना देण्याची सोय आहे.
व्यापक हाताळणीसाठी बहुभाषिक एआय पाठबळ
भाषिक विविधता विचारात घेऊन या नव्या एआय प्रणालीद्वारे वर उल्लेख केलेल्या आवाजाद्वारे संवाद आणि घोटाळा आढळल्याचे इशारे या सुविधा मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, मलयाळम्, गुजराती, ओदिया आणि पंजाबी या दहा भाषांमधून मिळू शकतील. येत्या काही महिन्यात भाषांच्या या पर्यायात आणखी वाढ केली जाईल.
वापरकर्ताभिमुख नवोन्मेषासोबत वचनबद्धता
सार्वत्रिक ओळख प्राधिकरणाने नेहमीच आधार क्रमांक धारकांना केंद्रस्थानी मानले आहे आणि तंत्रज्ञान अद्यतनीकरणासाठी आणि वापरकर्त्यांच्या सोयीसुविधात आणखी वाढ करण्यासाठी सातत्याने काम करत आहे. हा सामंजस्य करार याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
सर्वम् एआयने एका एयर-गॅप्ड यूआयडीएआय पायाभूत सुविधांमध्ये ऑन प्रिमाईस होस्टेड असलेला एक कस्टम जेनएआय स्टॅक प्रणाली दिली आहे. त्यामुळे सार्वत्रिक ओळख प्राधिकरणाच्या सुरक्षित व्यवस्थेमधून कोणत्याही व्यवहारांच्या कोणत्याही टप्प्यावर डेटा बाहेर जाणार नाही, ज्यामुळे डेटा सार्वभौमत्व आणि सुरक्षा नियमावलीचे संपूर्ण अनुपालन सुनिश्चित होईल. हा करार सुरुवातीला एका वर्षासाठी लागू असेल आणि त्यानंतर त्याला आणखी एका वर्षासाठी मुदतवाढ मिळू शकेल.
सार्वत्रिक ओळख प्राधिकरणाचे उद्योगांसोबत भागीदारीला प्रोत्साहन देणाऱ्या स्वयंसेवक धोरणाच्या(volunteer policy) माध्यमातून ही नावीन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करणे शक्य झाले आहे. सर्वम् एआयचे स्वयंसेवक भारतीय सार्वत्रिक ओळख प्राधिकरणाच्या बंगळूरु येथील तंत्रज्ञान केंद्रात जेनएआय सुविधांचा विकास आणि त्यांचा या प्रणालीत समावेश करण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक काम करतील. या सुविधेची मालकी भारतीय सार्वत्रिक ओळख प्राधिकरणाकडे असेल.
“भारतीय सार्वत्रिक ओळख प्राधिकरण ही एक लोकाभिमुख संस्था आहे. तंत्रज्ञानाचे प्रणेते म्हणून होत असलेल्या वाटचालीत, जीवनसुलभतेच्या सुविधा देण्यासाठी नवोन्मेषाप्रति असलेल्या आमच्या प्रदीर्घ बांधिलकीवर उभारलेली जेनएआय ही पुढच्या टप्प्यातील तंत्रज्ञान उत्क्रांती आहे.” भुवनेश कुमार, सीईओ, यूआयडीएआय यांनी सांगितले.
" यूआयडीएआयसोबत सहकार्याने काम करायला मिळणे हा आमचा बहुमान आहे. सार्वजनिक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेमधील अफाट क्षमता या भागीदारीने अधोरेखित होत आहे,” सर्वम एआयचे सहसंस्थापक विवेक राघवन यांनी सांगितले.
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2112703)
Visitor Counter : 11