ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
ग्राहक जागरूकता म्हणजे टिकाऊ आणि सुरक्षित डिजिटल अनुभवाची गुरुकिल्ली – प्रल्हाद जोशी
ग्राहक संरक्षण मजबूत करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग आणि मेटा यांची भागीदारी
Posted On:
18 MAR 2025 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2025
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आणि मेटाचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी जोएल कॅपलन यांनी सरकारच्या प्रमुख ग्राहक जागरूकता मोहिम ‘जागो ग्राहक जागो’ अंतर्गत ग्राहकांना डिजिटल साक्षरता उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी नवीन सहकार्याची घोषणा केली. या उपक्रमाचे नाव आहे ‘सशक्त ग्राहक बना’.
या भागीदारीच्या उद्घाटनप्रसंगी प्रल्हाद जोशी म्हणाले, "मेटासोबत या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम नागरिकांना डिजिटल विश्वात सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधने उपलब्ध करून देईल आणि त्यांना ऑनलाइन धोके ओळखण्यास तसेच स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करेल."
ते पुढे म्हणाले, "ग्राहक जागरूकता ही टिकाऊ आणि सुरक्षित डिजिटल अनुभवाची गुरुकिल्ली आहे. ही मोहीम ग्राहक संरक्षण उपाययोजनांना बळकटी देईल आणि भारतीय ग्राहकांना सक्षम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळ मिळवून देईल."
प्रल्हाद जोशी यांनी या भागीदारीमुळे ग्राहक संरक्षणासाठी ग्राहक व्यवहार विभाग आणि भारत सरकारचे प्रयत्न देशातील दूरदूरच्या भागांपर्यंत पोहोचतील, असेही नमूद केले.
‘सशक्त ग्राहक बना’ ही संयुक्त मोहीम भारतीय नागरिकांना ऑनलाइन धोके ओळखण्यास आणि सुरक्षित डिजिटल सवयी आत्मसात करण्यास मदत करेल. यात मजबूत पासवर्डचा वापर, ऑनलाइन माहितीची सत्यता पडताळणे आणि संशयास्पद कृतींची तक्रार करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. या मोहिमेच्या उद्घाटनाच्या आधी झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली.
कार्यक्रमादरम्यान, मेटाचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी जोएल कॅपलन म्हणाले, "मेटामध्ये आम्ही मानतो की कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) लोकांना ऑनलाइन माध्यमांवर सुरक्षित राहण्यास मदत करू शकते आणि त्यांना जागरूक ग्राहक बनवू शकते. एआय ला अधिक सुलभ करून, आम्ही ग्राहक जागरूकता वाढवून, तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ करून आणि लोकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी सक्षम करू इच्छितो."
हा दुहेरी दृष्टिकोन म्हणजे – ग्राहक तक्रार निवारणासाठी ‘ग्राहक न्याय’ (GrahakNyay) चॅटबॉक्स मध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल साक्षरतेसाठी ‘सशक्त ग्राहक बना’ मोहीम हा होय. हा उपक्रम भारतातील ग्राहक हक्क बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.



N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112586)
Visitor Counter : 40