वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि न्यूझीलंड व्यापक, परस्पर लाभदायक मुक्त व्यापार करारावर काम करत आहेत - पियुष गोयल


न्यूझीलंडचे पंतप्रधान तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत आणि न्यूझीलंडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केले संबोधित

Posted On: 18 MAR 2025 8:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2025

भारत आणि न्यूझीलंड व्यापक आणि परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी काम करत आहेत, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत भारत आणि न्यूझीलंडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संबोधित करताना दिली. दोन्ही देशांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच या मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा केली होती. आजच्या या कार्यक्रमाला न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन, न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक, कृषी आणि वनीकरण मंत्री टॉड मॅकक्ले, दोन्ही देशांचे व्यावसायिक प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

व्यापारी प्रमुखांना संबोधित करताना गोयल यांनी दोन्ही देशांमधील सहकार्याच्या प्रचंड क्षमतेवर भर दिला. गोयल यांनी भारत-न्यूझीलंड भागीदारीसाठी एक महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन मांडला, ज्यात पुढील दशकात द्विपक्षीय व्यापारात 10 पट वाढ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात व्यवसायांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना केले. न्यूझीलंडला स्पर्धात्मक फायदा होईल अशा नवीन आघाड्या आणि क्षेत्रे शोधण्याच्या गरजेवर लक्सन यांनी भर दिला. "मी भारत आणि न्यूझीलंड दोन्ही देशांच्या भविष्याबद्दल खूप आशावादी आहे. आमच्यासाठी भारत हा एक गेम चेंजर आहे. आज जेव्हा आपण 3 अब्ज डॉलर्सच्या व्यापारी संबंधांकडे पाहतो तेव्हा आमच्यासाठी येथे एक मोठी संधी आहे," असे ते म्हणाले.

हे ध्येय साध्य करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन वाणिज्य मंत्र्यांनी दोन्ही देशांतील व्यावसायिक प्रमुखांना केले. " आपण एकमेकांशी स्पर्धा करतो अशी क्षेत्रे फार नाहीत आणि संवेदनशील असलेल्या काही क्षेत्रात परस्परांचा आदर राखून मार्गक्रमण करता येते. आपल्या विकासाच्या वेगवेगळ्या पातळ्या पाहता, कृषी-तंत्रज्ञान, दुग्धव्यवसाय, अन्न प्रक्रिया, औषधनिर्माण, नवीकरणीय ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, वनीकरण, फलोत्पादन, पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रात सहकार्याच्या अमर्याद शक्यता आहेत," असे ते म्हणाले.

जागतिक आव्हानांवर चर्चा करताना गोयल यांनी विश्वासार्ह भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. “जग अनेक समस्यांमधून जात आहे. आपल्या दोन्ही राष्ट्रांमधील निश्चित भागीदारी ही विश्वासू भागीदार एकत्र कसे काम करतात याचा एक आदर्श म्हणून काम करू शकते.” असे ते म्हणाले.

गोयल यांनी भारत आणि न्यूझीलंडमधील संबंध मजबूत करण्यात पर्यटन उद्योगाची भूमिका अधोरेखित केली.

जिथे कायद्याचे राज्य असते आणि व्यवसायांना योग्य संधी मिळतात, अशा लोकशाही देशांबरोबर काम करण्याचे महत्त्व गोयल यांनी अधोरेखित केले. मुक्त व्यापार करार (FTA) वाटाघाटींबद्दल त्यांनी आशावाद व्यक्त केला. हा करार चैतन्यशील असेल आणि परस्पर संबंधांना अधिक दृढता देणारा असेल, असे ते म्हणाले.

दोन्ही देशातील लोकांना जवळ आणण्यात शिक्षण आणि संशोधनाचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केले.

संपर्क सुविधांबाबत बोलताना गोयल यांनी आर्थिक आणि डिजिटल दुवे मजबूत करण्यासाठी तसेच मनुष्यबळ आणि तांत्रिक प्रतिभेचे जलद चलनवलन सुलभ करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. भारत दरवर्षी सर्वाधिक STEM अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदवीधरांची निर्मिती करतो, त्यापैकी 43% महिला आहेत. यातून भारताच्या कार्यबलाची विविधता आणि ताकद प्रदर्शित होते, असे गोयल यांनी सांगितले.


N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2112567) Visitor Counter : 38


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil