गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
इंदोरमध्ये खाजगी सार्वजनिक भागीदारीतून देशातला पहिला हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार
Posted On:
18 MAR 2025 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2025
स्वच्छ भारत अभियान - शहरी अंतर्गत इंदोर आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज होत आहे. खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर इथे देशातला पहिला हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु केला जाणार आहे.

पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने आणखी एक लक्षणीय झेप घेण्यास इंदोर शहर सज्ज असून स्वच्छ भारत अभियान – शहरी अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर आधारित देशातला पहिला हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प शहरात सुरू होणार आहे. हरित कचऱ्याचे मौल्यवान संसाधनांमध्ये रुपांतर करुन शहराच्या कचरा व्यवस्थापन यंत्रणेमध्ये क्रांती घडवून आणणे हे या अभूतपूर्व उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. शहरी भागातील कचरा व्यवस्थापनाची आव्हाने पेलताना नवकल्पना व शाश्वतता याप्रती असलेली शहराची वचनबद्धता या प्रकल्पातून प्रतीत होते.

या प्रकल्पात हरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच महसूल देखील निर्माण केला जाईल. इंदोर महानगरपालिकेला लाकूड व फांद्यांच्या पुरवठ्यातून प्रती टन सुमारे 3000 रुपये रॉयल्टी मिळेल. बिचोली हापशी इथे सुमारे 55,000 चौरस फूट जागेत उभारलेल्या या प्रकल्पात लाकूड व फांद्यांपासून लाकडी गोळे तयार केले जातील. हे लाकडी गोळे कोळशाला पर्याय म्हणून वापरता येतील आणि उर्जा संवर्धनाला प्रोत्साहन मिळेल.
मोठ्या झाडांच्या फांद्या शहराच्या वन क्षेत्रातील हरित कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठविण्यात येतील, जिथे त्यांच्यापासून मूल्यवान उत्पादने तयार केली जातील. याशिवाय मोठ्या संस्थांच्या परिसरात तयार होणारा हरित कचरा गोळा करुन थेट प्रक्रिया प्रकल्पाकडे पाठविला जाईल आणि यासाठी त्या संस्थांकडून ठराविक शुल्क घेतले जाईल. इंदोरसारख्या गजबजलेल्या शहरात लाकूड, फांद्या, पाने व फुले असा दररोज सुमारे 30 टन हरित कचरा तयार होतो. ऋतू बदलल्यावर, विशेषतः पानगळीच्या ऋतुमध्ये हे प्रमाण 60 ते 70 टनांपर्यंत जाते.

इंदोर महापालिकेच्या भागीदारीत ऍस्ट्रोनॉमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शहरातील हरित कचऱ्याचे शाश्वत व मूल्यवान गोष्टीत रुपांतर करण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम घेतला आहे. या उपक्रमात हरित कचऱ्यापासून बारीक भुसा तयार केला जातो, हा भुसा निरनिराळ्या उद्योगांमध्ये वापरला जाऊ शकतो.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जागा उपलब्ध करुन देऊन आणि हरित कचरा प्रकल्पापर्यंत पोहोचवण्याचे काम करुन इंदोर महापालिका यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. यादरम्यान खाजगी कंपनी शेडस, वीज, पाणी यासारख्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करेल. या प्रकल्पातील यंत्रे बसविण्याचे व ती कार्यान्वित करण्याचे काम खाजगी कंपनी करेल व सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे प्रकल्पाचे कामकाज सुरळीत चालविण्याची जबाबदारी घेईल.
हरित कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन आणि महापालिकेसाठी उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचे नियंत्रण करण्यातही याची प्रमुख भूमिका आहे. कचरा व्यवस्थापनात सुधारणा घडवून हा प्रकल्प स्वच्छता, आरोग्य वाढवेल, प्रदूषण कमी करेल आणि अनावश्यकपणे कचरा जाळणे थांबवेल. यामुळे अधिक स्वच्छ, आरोग्यदायी पर्यावरण निर्माण होण्यात हातभार लागेल.

या प्रकल्पामुळे कोळशाला एक वेगळा पर्याय उपलब्ध होईल आणि त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक नियंत्रणात ठेवून स्वच्छता व पर्यावरण संरक्षणासाठी एक परिणामकारक उपाय मिळेल. स्वच्छ भारत अभियानातील कचरामुक्त शहरांच्या संकल्पनेशी हा प्रकल्प सुसंगत आहे, अधिक हरित, स्वच्छ व शाश्वत शहरी पर्यावरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना चालना देणारा आहे.
N.Chitale/S.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112417)
Visitor Counter : 46