युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अहमदाबादमध्ये फिट इंडिया संडेज ऑन सायकल कार्यक्रमाचे केले नेतृत्व; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक रोहताश चौधरी दिल्लीतील कार्यक्रमात झाला सहभागी
Posted On:
16 MAR 2025 4:10PM by PIB Mumbai
फिट इंडिया संडेज ऑन सायकल कार्यक्रमात देशभरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग दिसून आला. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज अहमदाबादमधील प्रसिद्ध साबरमती रिव्हरफ्रंट येथे आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकल कार्यक्रमाचे नेतृत्व केले. भारतीय क्रीडा प्राधिकरण,गांधीनगर द्वारा आयोजित या कार्यक्रमात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गुजरात आणि अहमदाबाद मेडिकल असोसिएशनचे सदस्य तसेच खासदार हसमुखभाई पटेल आणि दिनेशभाई मकवाना यांच्यासह सुमारे 650 सायकलस्वार सहभागी झाले होते. पॅरालिम्पियन खेळाडू भावना चौधरी यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

डॉ. मनसुख मांडविया यांनी आपल्या भाषणात "संडे ऑन सायकल" कार्यक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल आनंद व्यक्त केला. देशभरात फिट इंडिया चळवळ प्रगती करत असून "संडे ऑन सायकल" उपक्रम आता हळूहळू एक सांस्कृतिक घटना बनत असल्याचे त्यांनी नमूद केले. आज हा कार्यक्रम 5,000 हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यात डॉक्टरांनी तंदुरुस्त आणि स्थूलपणामुक्त भारताचा संदेश देण्यासाठी सक्रियपणे सहभाग घेतला होता ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

डॉ. मांडविया यांनी नमूद केले की, सायकलिंगला दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून प्रोत्साहन दिले पाहिजे, मग ते कामावर जाण्यासाठी असो किंवा किराणा दुकानात जाणे, यासारख्या साध्या कामांसाठी असो. शारीरिक तंदुरुस्ती, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकलिंगचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्थूलपणाविरुद्धच्या लढाईत सायकलिंग हे एक महत्त्वाचे साधन आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भविष्यात सायकलिंगला कार्बन क्रेडिट योजनांशी जोडले जाऊ शकते असेही ते म्हणाले.
आरोग्य उत्तम राखण्याचे साधन म्हणून सायकलिंगचा नियम लिहून देण्यासाठी त्यांनी डॉक्टरांना प्रोत्साहित केले. रुग्णांना त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून सायकलिंग स्वीकारण्यास वैद्यकीय समुदायाने प्रवृत्त करावे असे आवाहन त्यांनी केले.

एक निरोगी नागरिक एक निरोगी समाज घडवतो आणि एक निरोगी समाज समृद्ध राष्ट्र घडवू शकतो, असा पुनरुच्चार डॉ. मांडवीय यांनी केला आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी देशाने तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे, हे परिवर्तन घडवण्यासाठी सायकलिंगची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे मांडवीय यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, 27.2 किलो वजन एका पायाने उचलून एका तासात सर्वाधिक पुश-अप करून गिनीज बुकमध्ये जागतिक विक्रमाची नोंद करणारे आणि ज्यांना पुश- उप मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते असे रोहताश चौधरी यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्ली इथे 'संडेज ऑन सायकल' या मोहिमेमध्ये सहभाग घेत इतर स्पर्धकांचाही उत्साह वाढवला. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम मध्ये फिट इंडिया चळवळीचा हा कार्यक्रम झाला. इंडियन मेडिकल असोसिएशन- आयएमएचे डॉक्टर्स, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, योगासन भारतचे सदस्य आणि व्यवसायिकांसह पाचशे सायकल प्रेमी लोकांनी या सायकल स्वारी मध्ये सहभाग घेतला.

संडेज ऑन सायकल हा फिट इंडियाचा एक उत्तम उपक्रम आहे. आज सर्वांचा उत्साह उल्लेखनीय होता, पण, फक्त रविवारीच नव्हे तर इतर दिवशीही सायकल चालवण्याचे आवाहन मी तरुणांना करतो, असे यावेळी रोहताश म्हणाले. लठ्ठपणाचा विचार केल्यास चीन आणि अमेरिकेनंतर भारत लठ्ठपणामध्ये तिसऱ्या स्थानी आहे, आपल्याला लठ्ठपणात नाही तर विकासात अव्वल स्थानी असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच देशाच्या विकासासाठी तंदुरुस्त राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे रोहताश यावेळी म्हणाले.
इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएने देशभरात 25 ठिकाणी संडेज ऑन सायकल हा उपक्रम राबवला आहे. जीवनशैलीशी निगडित आजार रोखण्यासाठी तंदुरुस्ती महत्त्वाची आहे असे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे वित्त सचिव डॉ. पियुष जैन यांनी अधोरेखित केले आहे. उपचारांपेक्षा प्रतिबंध कधीही चांगला आहे, म्हणूनच आयएमए फिट इंडिया चळवळीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे जैन यावेळी म्हणाले. सायकल चालवणे हा एक पूर्ण शरीराचा उत्तम व्यायाम आहे, सायकल चालवणे मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, असे यावेळी जैन म्हणाले. प्रत्येकाने निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे देखील जैन यांनी सांगितले.
***
S.Kane/S.Mukhedkar/R.Dalekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2111643)
Visitor Counter : 25