संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आसियान गटाच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठक सह (ADMM-plus) तज्ञ कृती गटाची (EWG) दहशतवाद विरोधातील चौदावी बैठक नवी दिल्लीत होणार

Posted On: 16 MAR 2025 10:31AM by PIB Mumbai

 

 

आसियान गटाच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठक सह (ADMM-plus)  तज्ञ कृती गटाची (EWG) दहशतवाद विरोधातील चौदावी बैठक नवी दिल्लीत 19 मार्च ते 20 मार्च 2025 दरम्यान होणार असून भारत व मलेशिया या बैठकीचे सह अध्यक्ष असतील. या बैठकीला दहा आसियान देशांचे (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ लोकशाही प्रजासत्ताक, म्यानमार, फिलिपिन्स, व्हिएतनाम, सिंगापूर व थायलंड) आणि आठ संवाद भागीदार (ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, कोरियन प्रजासत्ताक, जपान, चीन, अमेरिका, रशिया) याशिवाय तिमोर लेस्ट व आसियान मंत्रालय देखील या बैठकीत सहभागी होईल.

भारत प्रथमच दहशतवाद विरोधी तज्ञ कृती गटाचा (EWG) सह अध्यक्ष असणार आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग 19 मार्च 2025 रोजी होणाऱ्या उदघाटन समारंभात आपले बीजभाषण करतील.

दहशतवाद विरोधी तज्ञ कृती गटाच्या (EWG) सध्याच्या 2024 ते 2027 या कार्यकाळातील उपक्रमांची योजना करण्यासाठी आयोजित केलेली ही पहिली बैठक आहे. दहशतवाद व अतिरेकीवादाने उभ्या केलेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यावर या बैठकीतील चर्चेत भर दिला जाईल. आसियान देशांच्या व त्यांच्या संवादक भागीदार देशांच्या संरक्षण दलांच्या प्रत्यक्ष अनुभवांना या बैठकीत सामायिक केले जाईल. यावर आधारित 2024 ते 2027 या कार्यकाळातील पुढील उपक्रम/प्रशिक्षण-सराव / कार्यशाळा/चर्चासत्रे ठरवण्यात येतील.

सहभागी देशांच्या संरक्षण दलांच्या प्रत्यक्ष अनुभवांना सामायिक करण्यासाठी ADMM plus या व्यासपीठाचा उपयोग होणार आहे. सध्या त्यांचा भर पुढील मुद्द्यांवर असेल - दहशतवाद विरोध, सागरी सुरक्षा, मानवतावादी मदतकार्य व आपत्ती व्यवस्थापन, शांतता राखण्यासाठीच्या मोहीमा, लष्करी मोहीम किंवा संबंधित परिस्थितीत उपयोगी वैद्यकशास्त्र, मानवतावादी भूसुरुंग निवारण कृती व सायबर सुरक्षा. या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य घडवून आणण्यासाठी तज्ञ कृती गटांची (EWG) स्थापना केली गेली आहे. 

प्रत्येक तज्ञ कृती गटाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असून गटाच्या  अध्यक्षस्थानी एक आसियान देश व एक संवादक भागीदार देश असणार आहे. अध्यक्षपद कार्यकाळाच्या सुरुवातीलाच कृती गटाची उद्दिष्टे, मार्गदर्शक धोरणे व निर्देश ठरवणे, सहभागी देशांची नियमित बैठक घेणे (किमान एका वर्षात दोन बैठकी) व कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षात सदस्य देशांची परस्पर सहकार्यातील प्रगती जोखण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील/वर्गातील/ कर्मचारी/ दळणवळण अशा कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण/प्रात्यक्षिक / सराव घेणे हे सह अध्यक्षांचे काम आहे.

***

S.Pophale/U.Raikar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2111599) Visitor Counter : 33