अर्थ मंत्रालय
भारत आणि कतार या दोन्ही देशांमध्ये 18.02.2025 रोजी वित्तीय आणि आर्थिक सहकार्याशी संबंधित स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराला वित्त मंत्रालयाने दिली कार्योत्तर मंजुरी
Posted On:
11 MAR 2025 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2025
भारत आणि कतार या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, कतारचे महामहिम अमीर यांच्या भारत भेटीदरम्यान भारत सरकारचे अर्थ मंत्रालय आणि कतारचे अर्थ मंत्रालय यांच्यात 18.02.2025 रोजी वित्तीय आणि आर्थिक सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सहसचिव बलदेव पुरुषार्थ आणि कतारचे राजदूत मोहम्मद हसन जबीर अल-जबीर यांनी 5 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे, या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
आर्थिक धोरणे, वित्तपुरवठाविषयक साधनांचा वापर, सार्वजनिक-खाजगी भागीदारी चौकट आणि गुंतवणूक या क्षेत्रात परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि ते वृद्धिंगत करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. या सहकार्यामुळे कतारसोबत परस्परांना लाभदायक आणि बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारण्याची वचनबद्धता बळकट होईल. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढीला लागेल.
दोन्ही देशांची समान उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रवासात हा सामंजस्य करार एक महत्वाचा टप्पा ठरेल. दोन्ही देशांमधील वित्त मंत्रालये तज्ञांची कार्यशाळा, परिषदा आणि संमेलने आयोजित करणे तसेच संयुक्त कार्याच्या क्षेत्रात माहितीपट आणि तांत्रिक माहितीची देवाणघेवाण करणे आणि दोन्ही देशांच्या व्यावसायिक समुदायांमध्ये संवाद घडवून आणणे यांसारखे उपक्रम आयोजित करून संयुक्त सहकार्याच्या मॉडेल्स आणि क्षेत्रांना प्रोत्साहन देतील.
या सामंजस्य कराराची देवाणघेवाण एकत्र कार्य करण्याची तसेच गुंतवणूक, समृद्धी आणि विकास या क्षेत्रात नवीन संधींचा शोध घेण्याची वचनबद्धता दर्शवते.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110317)
Visitor Counter : 23