युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
देशभरात महिला दिनानिमित्त विशेष फिट इंडिया संडे ऑन सायकलचे आयोजन ; आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेतल्या सायकलपटूंचा दिल्ली येथे सत्कार
Posted On:
09 MAR 2025 2:20PM by PIB Mumbai
फिट इंडिया संडे ऑन सायकलच्या महिला दिन विशेष पिंक सायक्लोथॉन स्पर्धेसाठी 9 मार्च रोजी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर 400 हून अधिक सायकलस्वार जमले तेव्हा राष्ट्रीय राजधानीत ऊर्जा आणि उत्साहाची लाट दिसून येत होती. भारतीय मुष्टीयोद्ध्या मनीषा मौन, माजी टेनिसपटू अंकिता भांबरी तसेच मलेशियात आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत अलीकडेच सहभागी झालेल्या 13 भारतीय आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनीही यात भाग घेतला.

सकाळचे सत्र क्रीडा, शारीरिक शिक्षण, शरीर स्वास्थ्य आणि विश्राम कौशल्य परिषद (SPEFL-SC) आणि भारतीय सायकलिंग महासंघ (सीएफआय) यांच्या भागीदारीने आयोजित करण्यात आले होते. मुख्य अतिथी असलेल्या युवा व्यवहार, युवा व्यवहार मंत्रालय आणि क्रीडा सचिव मीता राजीव लोचन (IAS) यांनी सत्कार केल्यानंतर खेळाडूंनी 3 किमी लांबीच्या जॉय राईडमध्ये भाग घेतला.

युवा खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या कामगिरीचे कौतुक करताना मीता लोचन म्हणाल्या की, "आपले सर्व युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवत आहेत आणि आपल्याकडे अनेक जागतिक अजिंक्यपद स्पर्धांसह आणखी स्पर्धा होणार आहेत. मला आशा आहे की या सर्व स्पर्धांमध्ये भारतीय ध्वज फडकत राहील. युवा विजेते हे आपल्या देशाचे भवितव्य आहेत. भारताने खुल्या दिलाने तुमची प्रशंसा केली आहे आणि आता जगाला या मुलांमधील गुणवत्तेची ओळख व्हावी असे मला वाटते“
इस्तंबूलमध्ये 2022 मध्ये झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मनीषा मौन यांनी या कार्यक्रमाच्या प्रभावाबद्दल उत्कटतेने मत मांडले. "आज मला युवा सहभागींकडून आणि मुख्यतः येथे आघाडीवर राहून नेतृत्व करणाऱ्या महिलांकडून मिळालेली प्रेरणा आपल्या पंतप्रधानांच्या फिट इंडियाच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे जुळते. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा सायकलिंग हे लठ्ठपणा दूर करण्यासाठी परिपूर्ण आहे. ते केवळ आम्हा मुष्टीयोद्ध्यासाठीच आवश्यक नाही तर सर्वांसाठी देखील महत्त्वाचे आहे," असे त्या म्हणाल्या.

गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण भारतात सायकलिंग मोहिमेने किती प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे याबद्दल इम्फाळचे रहिवासी असलेले प्रसिद्ध सायकलपटू रोनाल्डो सिंग यांनी सांगितले. “फिट इंडिया संडे ऑन सायकल हा उपक्रम देशात प्रत्येक ठिकाणी पोहोचला आहे. माझे राज्य, मणिपूरमधील लोक, माझे सहकारी डेव्हिड बेकहॅम आणि एसो अल्बेन यांचा मूळ प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांवरचे लोक देखील यात भाग घेत आहेत. त्रिवेंद्रम आणि भारतातील अनेक दुर्गम भागातील लोक देखील यात सहभागी होत असलेले मला दिसत आहे,” असे आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत 4 वेळा पदक मिळवणाऱ्या सायकलपटूने सांगितले.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणांच्या उपस्थितीबद्दल बोलताना रोनाल्डो पुढे म्हणाले, “मला वाटते की जर सायकलिंगचा समर्पित सराव सुरू ठेवला आणि दीर्घकाळापर्यंत त्याचा एक स्पर्धात्मक खेळ म्हणून स्वीकार केला तर ही तरुण पिढी देखील माझ्यासारखी आणि माझ्या सहकाऱ्यांसारखी बनू शकते.”

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी सुरू केलेला फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रम डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत देशभरातील 4200 हून अधिक ठिकाणी पोहोचला आहे. महिला दिन 2025 च्या निमित्ताने विविध भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्रांमध्ये (आरसी) आयोजित या कार्यक्रमात महिला सायकलस्वारांचा लक्षणीय सहभाग होता. बोडोलँड विद्यापीठाच्या सहकार्याने गुवाहाटी येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्राअंतर्गत एसएआय प्रशिक्षण केंद्र कोकराझार येथे पिंक सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. बी. एल. आहुजा यांनी हिरवा झेंडा दाखवून पिंक सायक्लोथॉनचे उद्घाटन केले. बोडोलँड विद्यापीठ प्रागणातून सुरू झालेल्या या सायकलिंग राईडमध्ये विद्यापीठातील शंभराहून अधिक मुलींनी भाग घेतला.

सोनीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण - राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र येथे, प्रसिद्ध महिला कुस्तीपटू आणि हॉकीपटू सहभागी झाल्या होत्या. यामध्ये फोगट भगीनी - अर्जुन पुरस्कार विजेती गीता फोगट, कुस्तीगीर संगीता फोगट, मिश्र मार्शल आर्टपटू रितू फोगट आणि अर्जुन पुरस्कार विजेती सरिता मोर यांचा समावेश होता. या कार्यक्रमात उपस्थित हॉकीपटूमध्ये ऑलिंपियन नेहा गोयल तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनिका तांडी आणि ज्योती रामबावत तसेच अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रीतम सिवाच यांचा समावेश होता.
***
S.Kane/S.Naik/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2109631)
Visitor Counter : 51