रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते सुरक्षेच्या सुधारित उपाययोजना तातडीने लागू करण्याची गरज केली अधोरेखित

Posted On: 06 MAR 2025 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मार्च 2025

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते सुरक्षेच्या सुधारित उपाययोजना तातडीने लागू करण्याची गरज अधोरेखित केली असून, रस्ते बांधकाम उद्योगाने नवीन तंत्रज्ञान आणि पुनर्वापराजोग्या शाश्वत बांधकाम साहित्याचा वापर करून रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी रणनीती विकसित करावी, असे आवाहन केले आहे.

ते आज नवी दिल्लीत, 'व्हिजन झिरो : सस्टेनेबल इन्फ्राटेक अँड पॉलिसी फॉर सेफ रोड्स' या संकल्पनेवरील, ग्लोबल रोड इन्फ्राटेक समिट अँड एक्स्पो (जीआरआयएस), या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन करताना बोलत होते. देशातील बहुतेक रस्ते अपघात रस्त्यांचे आरेखन, बांधकाम आणि व्यवस्थापनातील निकृष्ट अभियांत्रिकी पद्धती आणि रस्त्यांवरील अयोग्य चिन्हे आणि मार्किंग पद्धतीमुळे  होतात, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. स्पेन, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांमधील  पद्धतींचे अनुकरण करून त्यामध्ये सुधारणा करता येईल, असे त्यांनी सुचवले.

भारतात 4,80,000 रस्ते अपघात, 1,80,000 जणांचा मृत्यू आणि सुमारे 4,00,000 जण गंभीर जखमी झाल्याची नोंद असून, यापैकी 1,40,000 अपघाती मृत्यू हे 18 ते 45  वयोगटातील व्यक्तींचे असून यामध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातांमुळे जीडीपीचे 3% आर्थिक नुकसान झाल्याचे गडकरी यांनी नमूद केले.

रस्त्यांचे ढिसाळ नियोजन आणि रचना  यामुळे रस्ते अपघात वाढत असून, यासाठी अभियंते आणि निकृष्ट दर्जाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जबाबदार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत 2030 पर्यंत अपघातांचे प्रमाण 50% कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.   

रस्ते अपघात रोखण्याचे उपाय शोधण्यासाठी उद्योग आणि सरकारने एकत्र यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले, तसेच सुरक्षित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि सुरक्षितपणे  वाहन चालवण्याच्या सवयींबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी शिक्षणाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. कायद्याची कडक अंमलबजावणी आणि प्रतिसाद देण्यामध्ये सक्षम आपत्कालीन वैद्यकीय सेवेची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

इंटरनॅशनल रोड फेडरेशन-इंडिया चॅप्टर (आयआरएफ-आयसी) द्वारे, नवोन्मेशाला प्रेरणा देणे, उद्योग क्षेत्राकडून अत्याधुनिक उपाय प्रदर्शित करणे, ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे, आणि सरकारी संस्था आणि खासगी संस्थांमधील तज्ञ आणि निर्णय कर्त्यांसाठी मोलाच्या नेटवर्किंग संधी खुल्या करण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित केली होती.

सर्वसमावेशक अनुभव देणे, हे या संमेलन आणि प्रदर्शनाच्या स्वरूपातील परिषदेचे उद्दिष्ट होते, जे प्रारुपांचे मिश्रण करून उद्योगांच्या प्रगतीला चालना देईल, असे इंटरनॅशनल रोड फेडरेशनचे (आयआरएफ) अध्यक्ष के. के. कपिला यांनी सांगितले. ही जगभरातील उत्तम आणि सुरक्षित रस्त्यांसाठी काम करणारी जागतिक रस्ते सुरक्षा संस्था आहे.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2108944) Visitor Counter : 37