कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 निमित्त केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने आज, दिनांक 06 मार्च 2025 रोजी आभासी पद्धतीने ‘नागरी सेवांमध्ये कार्यरत महिला’ या विषयावर गोलमेज वेबिनार केले आयोजित
प्रविष्टि तिथि:
06 MAR 2025 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2025
महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो.याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी आज, दिनांक 06 मार्च 2025 रोजी केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने (डीएआरपीजी) “नारी शक्ती से विकसित भारत ” या संकल्पनेवर आधारित आभासी पद्धतीने गोलमेज वेबिनारचे आयोजन केले होते.महिलांचे अनमोल योगदान साजरे करण्यासाठी तसेच भारतात लिंग समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी डीएआरपीजीचे सचिव व्ही.श्रीनिवास म्हणाले की, महिलांच्या संपूर्ण क्षमतांचा वापर करून घेतल्याशिवाय 2047 पर्यंत सक्षम भारताची कल्पना प्रत्यक्षात साकार होऊ शकत नाही तसेच या प्रवासात, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक महिला महत्त्वाची आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात महिलांसाठी नागरी सेवांची दारे कशी खुली झाली आणि तेव्हापासून नागरी सेवांमध्ये कार्यरत महिलांची भूमिका भारतीय विकास गाथेला कसा आकार देत आहे हे अधोरेखित करून केंद्रीय श्रम आणि रोजगार सचिव सुमिता दावरा म्हणाल्या की, प्रसूतीपश्चात रजा, बालसंगोपनासाठीची रजा इत्यादी कायद्यांनी महिलांना त्यांच्या कौटुंबिक कर्तव्यांचा समतोल साधत देश उभारणीप्रती योगदान देण्यात केली आहे. गेल्या काही काळापासून आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक सहभाग, बेरोजगारीत घट आणि अधिकाधिक शिक्षित महिलांचा विविध प्रकारच्या कामकाजात सहभाग यासह महिला कार्यबळाच्या सहभागात सकारात्मक कल कसा दिसून येतो आहे हे देखील त्यांनी अधोरेखित केले.

टपाल विभाग सचिव वंदिता कौल यांनी काळजीवाहकाच्या रुपात मोफत काम करण्यात पुरुषांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात वाटा उचलणाऱ्या महिलांच्या संघर्षावर प्रकाश टाकला.महिलांना सक्षम करण्यात सुकन्या समृद्धी योजनेच्या भूमिकेवर अधिक भर देत त्यांनी या योजनेच्या परिवर्तनशील प्रभावाची माहिती दिली. सरकारी प्रशासनात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान देखील अधोरेखित करत त्यांनी नागरी सेवांमध्ये प्रवेश करावा आणि या क्षेत्रात टिकून राहावे या दृष्टीने महिलांना प्रेरित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नागरी सेवा परीक्षांची तयारी करत असताना त्यांना स्वतःला विविध आव्हानांचा सामना कसा करावा लागला याबाबतीतील स्वतःचे अनुभव देखील त्यांनी सामायिक केले.

या आभासी पद्धतीने आयोजित वेबिनारला केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांमध्ये कार्यरत अडीचशेहून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. भारतातील महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांबाबत चर्चा आणि विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी या कार्यक्रमाने मंच उपलब्ध करून दिला.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2108942)
आगंतुक पटल : 122