अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मधील घोषणेनुसार, केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांनी एमएसएमई उद्योगांसाठी नव्या पत मूल्यांकन प्रारुपाची केली सुरुवात


या प्रारुपात डिजिटल पद्धतीने मिळवलेल्या आणि पडताळणीयोग्य माहितीचा वापर एमएसएमई उद्योगांसाठी स्वयंचलित एमएसएमई कर्जसंबंधी मूल्यांकन प्रणालीतयार करण्यासाठी केला जाईल

Posted On: 06 MAR 2025 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मार्च 2025

 

विशाखापट्टणम येथे आज आयोजित अर्थसंकल्प-पश्चात चर्चेदरम्यान केंद्रित अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एमएसएमई उद्योगांच्या डिजिटल पदचिन्हांच्या गुणांकनावर आधारित नव्या पत मूल्यांकन प्रारुपाची सुरुवात केली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका (पीएसबीज) एमएसएमई उद्योगांना कर्ज देताना त्यांची पात्रता तपासण्यासाठी बाह्य मूल्यांकन पद्धतीवर अवलंबून न राहता स्वतःच्या अंतर्गत सक्षमता प्रणाली उभारतील अशी घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये करण्यात आली होती. त्यानुसार आता पीएसबीज एमएसएमई उद्योगांच्या डिजिटल पदचिन्हांच्या गुणांकनावर आधारित नवे पत मूल्यांकन प्रारूप विकसित करतील.

हे पत मूल्यांकन प्रारूप परिसंस्थेत उपलब्ध होणाऱ्या, डिजिटल पद्धतीने मिळवलेल्या आणि पडताळणीयोग्य माहितीचा वापर करतील आणि त्याद्वारे एमएसएमई उद्योगांच्या कर्जसंबंधी स्वयंचलित वाटचालीसाठी कर्जसंबंधी मूल्यांकन प्रणाली तयार करतील. यामध्ये बँकेचे विद्यमान कर्जदार असलेल्या (ईटीबी) तसेच नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या (एनटीबी) अशा दोन्ही प्रकारच्या एमएसएमई कर्जदारांना दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या अर्जांसाठी वस्तुनिष्ठ निर्णय प्रक्रिया तसेच उपरोल्लेखित प्रारुपावर आधारित कर्जमर्यादा मूल्यांकन यांचा वापर करण्यात येईल.

या प्रारुपात वापरण्यात येणाऱ्या डिजिटल पदचिन्हांमध्ये एनएसडीएलचा वापर करून नाव आणि पॅन यांची पडताळणी, ओटीपीचा वापर करून मोबाईल क्रमांक तसेच ईमेलची सत्यता तपासणी, सेवा पुरवठादारांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा करविषयक डाटाचा एपीआय मिळवणे, खात्यांचे एकत्रीकरण करणाऱ्या पद्धतीचा वापर करून बँक खात्याचे विश्लेषण, प्राप्ती कर विवरणपत्र अपलोड आणि पडताळणी, एपीआयने सुसज्जित व्यावसायिक तसेच ग्राहक ब्युरोकरून प्राप्त माहिती तसेच सीआयसीजचा वापर करून योग्य मेहनतीसह माहिती मिळवणे, घोटाळ्यांची माहिती, एपीआयच्या माध्यमातून हंटर चेक यांसह इतर अनेक घटकांचा समावेश असू शकेल.

या नव्या प्रारुपामुळे एमएसएमई उद्योगांना होणाऱ्या लाभांमध्ये, अनेक लाभांसह ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणाहून अर्जाचे सादरीकरण, आवश्यक कागदपत्रे आणि बँक शाखांना भेटी देण्याचे प्रमाण कमी, डिजिटल पद्धतीने तात्काळ तत्वतः कर्जमंजुरी, कर्ज प्रस्तावांची सुरळीत कार्यवाही, संपूर्ण प्रक्रिया स्ट्रेट थ्रू प्रोसेस (एसटीपी), टर्नअराउंड टाईम (टीएटी) म्हणजेच कर्ज मंजुरीच्या संपूर्ण प्रक्रियेला लागणाऱ्या वेळेची बचत, वस्तुनिष्ठ डाटा/ व्यवहारांतील वर्तणूक तसेच कर्जसंबंधी इतिहास यांच्या आधारावर कर्जाच्या मंजुरीचा निर्णय, सीजीटीएमएसईच्या अंतर्गत असलेल्या कर्जांसाठी कोणत्याही प्रत्यक्ष तारण ठेवीची आवश्यकता नसणे इत्यादी लाभांचा समावेश आहे.

एमएसएमई उद्योगांसाठी डिजिटल पदचिन्हांवर आधारित नव्या पत मूल्यांकन प्रारुपाच्या अंमलबजावणीमुळे केवळ मालमत्ता किंवा उलाढालीच्या निकषावर आधारित पत पात्रतेच्या पारंपरिक मूल्यांकन प्रणालीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल. औपचारिक लेखा प्रणाली उपलब्ध नसलेल्या एमएसएमई उद्योगांना देखील या नव्या प्रारूपामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2108870) Visitor Counter : 36