गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘सुरक्षित तट - समृद्ध भारत’ सायकल मोहिमेचे आयोजन


सहभागी सायकलपटू देशाच्या 6,553 कि.मी. लांबीच्या किनारपट्टीलगत सायकलने प्रवास करणार

या मोहीमेतून शारीरिक क्षमता आणि धैर्यासोबतच केंद्रीय औद्योगिक सुलक्षा दलाच्या देशाच्या किनारपट्टी प्रदेशाच्या सुरक्षेतील भूमिकेचे आणि देशाच्या आर्थिक समृद्धीतील योगदानाचे देशाला दर्शन घडणार

Posted On: 04 MAR 2025 3:43PM by PIB Mumbai

मुंबई, 4 मार्च 2025

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) आपल्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘सुरक्षित तट - समृद्ध भारत’ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव सायकल मोहिमेचे अर्थात सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.  केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते 7 मार्च रोजी आभासी पद्धतीने या मोहीमेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक सुधीर कुमार यांनी ही माहिती दिली. या मोहिमेविषयी माहिती देण्यासाठी आज मुंबईत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने वार्ताहर परिषदेचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते.

या मोहिमेच्या निमित्ताने या कार्यक्रमाला समांतरपणे लखपत किल्ला (गुजरात), बखाली (पश्चिम बंगाल), गेटवे ऑफ इंडिया (मुंबई, महाराष्ट्र), कोणार्क सूर्य मंदिर (ओडिशा), स्वामी विवेकानंद स्मारक (कन्याकुमारी, तामिळनाडू) या देशभरातल्या पाच प्रमुख ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याअंतर्गत विविध सांस्कृतिक सादरीकरणे, केंद्रीय औद्योगि सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसोबतचा संवाद आणि किनारी प्रदेशाच्या सुरक्षेबद्दलची माहितीपर सत्रे असे विविध उपक्रमही आयोजित केले जाणार आहेत, असे ते म्हणाले. या मोहिमेअंतर्गतच्या महाराष्ट्रातील सायकलपटुंची तुकडी पश्चिम किनारपट्टीवरून निघालेल्या मुख्य पथकासोबत 20 मार्च रोजी  मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथे जोडली जाईल असेही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक सुधीर कुमार यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबई पोलिसांच्या संगीत पथकाचे विशेष सादरीकरण, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अग्नी आणि श्वान पथकाचे विशेष प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रमही आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या मोहिमेत सहभागी झालेले सायकलपटू देशाच्या 6,553 कि.मी. लांबीच्या किनारपट्टीलगत सायकलने प्रवास करतील. या सायकलपटूंना दोन पथकांमध्ये विभागले जाणार असून, ती एकाच वेळी पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या कच्छ इथल्या लखपत किल्ला आणि पूर्व किनारपट्टीवर पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणामधील बखाली, इथून  प्रस्थान करणार आहेत. ही दोन्ही पथके 25 दिवसांच्या साहसी प्रवासानंतर 31मार्च 2025 रोजी  तमीळनाडूत कन्याकुमारी स्मारकाजवळ एकत्र येतील.

या मोहिमेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे 125 कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात 14 धाडसी महिला सायकलपटूंचाही समावेश असणार आहे. या मोहिमेसाठी या  सर्व सायकलपटूंना एका महिन्याचे कठोर प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणात लांब पल्ल्याची सायकलिंग (Long-distance cycling), पोषण, सहनशिलता, सुरक्षितता या पैलुंवर विशेष भर दिला गेला आहे.

राष्ट्रीय सुरक्षेचा संदेश देणारी ऐतिहासिक मोहीम

या मोहीमेतून शारीरिक क्षमता आणि धैर्याचे प्रदर्शन घडेलच, आणि त्यासोबतच केंद्रीय औद्योगिक सुलक्षा दलाच्या देशाच्या किनारपट्टी प्रदेशाच्या सुरक्षेतील भूमिकेचे आणि देशाच्या आर्थिक समृद्धीत असलेल्या योगदानाचे दर्शनही देशाला घडेल. भारताच्या  विस्तीर्ण किनारपट्टीवर 250 पेक्षा जास्त बंदरे वसलेली आहेत. यातील 72 बंदरांचा अंतर्भाव देशाच्या प्रमुख बंदरांमध्ये होतो. त्याचवेळी भारताच्या एकूण व्यापारापैकी 95% व्यापार हा सागरी मार्गाने होतो, याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात केली जाते. याशिवाय भारताच्या सागरी प्रदेशातच तेल शुद्धीकरण प्रकल्प (Refineries), जहाज बांधणी केंद्रे (Shipyards) आणि अणुऊर्जा प्रकल्प असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मोठी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मोठी भूमिका बजावत असते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे हे योगदान या मोहीमेळुळे अधोरेखित होणार आहे.

मोहिमेची उद्दिष्टे

सागरी सुरक्षेबाबत जनजागृती – किनारी प्रदेशातील नागरिकांना अमली पदार्थ, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची तस्करी यांसारख्या संभाव्य धोक्यांबाबत जागरूक करणे.

सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांमधील परस्पर सहकार्य वाढवणे, यादृष्टीने सुरक्षाविषयक सतर्कता वाढवण्याचा प्रयत्न करणे, तसेच नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांमधला समन्वय अधिक दृढ करणे.

देशभक्तीची भावना जागृत करणे – नागरिकांना स्वातंत्र्य सैनिक, सुरक्षा दलांचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाची जाणीव करून देणे.

भारताच्या सागरी परंपरांचा सन्मान – नागरिकांना आपल्या किनारपट्टी प्रदेशातील समृद्ध परंपरा, इतिहास आणि भौगोलिक विविधतेची ओळख करून देणे तसेच या भागाच्या राष्ट्रीय विकासातील योगदान अधोरेखित करणे.

नागरिकांनीही या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने केले आहे. या मोहितील सहभाग आणि माहितीसाठी https://cisfcyclothon.com/ या संकेतस्थळाला भेट देता येईल.

 

S.Tupe/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2108069) Visitor Counter : 480
Read this release in: English , Urdu , Hindi