रसायन आणि खते मंत्रालय
जन औषधी दिन 2025 अंतर्गत आज दुसऱ्या दिवशी जन औषधी - विरासत के साथ या उपक्रमाचे आयोजन
जन औषधी दिनानिमित्त आरोग्य आणि जन औषधींच्या स्वरुपातील संपत्तीविषयी संदेश देण्यासाठी देशभरात विविध 25 ठिकाणी वारसा पदयात्रेचे आयोजन
देशभारत 500 पेक्षा जास्त ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मोफत आरोग्य शिबिरांचे (जन आरोग्य मेळा) आयोजन
Posted On:
02 MAR 2025 5:39PM by PIB Mumbai
7व्या जन औषधी दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. याअंतर्गत आज या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जन औषधी – विरासत के साथ या संकल्पनेअंतर्गत देशभरातील 25 वेगवेगळ्या ऐतिहासिक स्मारकांच्या वारसा स्थळांना भेट देण्याच्या उपक्रमाने सुरुवात झाली.

विरासत या शब्दाचा अर्थ दीर्घकाळापासून चालत आलेल्या परंपरा आणि संस्कृतीशी जोडला गेला आहे. य़ा अर्थाप्रमाणेच देशभरातल्या ज्येष्ठ नागरिकांनी देखील आपल्या परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवल्या आहेत. आपल्या या अशा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी आणि त्या माध्यमातून देशातल्या विविध परंपरा आणि आपली संस्कृती अबाधित राखण्यासाठी, देशभरातील वेगवेगळ्या 500 ठिकाणी जन औषधी केंद्रांवर आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरांमध्ये रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी अशा असंख्य तपासण्यांसह, डॉक्टरांसोबत विनामूल्य सल्लामसलतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आरोग्याचे महत्त्व आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेबद्दल (PMBJP) जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने ही आरोग्य शिबिरे आयोजित केली गेली होती.

याशिवाय आज, नवी दिल्लीमधील हौज खास या ऐतिहासिक ठिकाणासह देशभरातील 25 वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्याचा उपक्रमही आयोजित केला गेला होता. या उपक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी दधीच यांच्या नेतृत्वात इतर अधिकारी आणि जन औषधी केंद्र मालकांनी एकत्र पायी चालत नियोजित ऐतिहासिक स्थळाला भेट दिली.
सध्या, देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून 15,000 पेक्षा जास्त जन औषधी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत, सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात 25,000 जन औषधी केंद्रे सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारातून, दरवर्षी 7 मार्च हा दिवस जन औषधी दिन म्हणून साजरा केला जातो. या योजनेबद्दल जागरूकता वाढवणे आणि जेनेरिक औषधांचा प्रचार प्रसार करणे हा यामागचा उद्देश आहे. या दिनाच्या निमित्ताने गेल्या वर्षांप्रमाणेच, यंदाही 1 मार्च ते 7 मार्च 2025 या आठवडाभराच्या कालावधीत देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.
***
S.Patil/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107606)
Visitor Counter : 49