उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

परोपकाराला व्यवहारीपणाचा आणि व्यावसायीकीकरणाचा स्पर्श असता कामा नये - उपराष्ट्रपती


शिक्षण ही सरकार आणि खाजगी क्षेत्राची संयुक्त जबाबदारी आहे - उपराष्ट्रपती

नालंदाचा खिलजीने केलेला विध्वंस हे फक्त वास्तुविध्वंसाचे नव्हे तर पिढ्यानुपिढ्या चालत आलेले ज्ञान नियोजनबद्धपणे लयास नेण्याचे प्रतिक-उपराष्ट्रपती

Posted On: 01 MAR 2025 8:02PM by PIB Mumbai

 

"परोपकाराला व्यवहारीपणाचा आणि व्यावसायीकीकरणाचा स्पर्श असता कामा नये.  आपले आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र या गोष्टींमुळे त्रस्त असून कॉर्पोरेट नेत्यांनी शिक्षणातील गुंतवणुकीकडे  परोपकाराच्या पलीकडे जाऊन पहावे.  ही आपल्या वर्तमानातील गुंतवणूक आहे, आपल्या भविष्यातील गुंतवणूक आहे आणि स्पष्टच सांगायचे तर ती उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराच्या विकासासाठी गुंतवणूक आहे”.असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात मुंबई येथील के.पी.बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना  धनखड म्हणाले, "शिक्षण ही सर्वात प्रभावी, परिवर्तनकारी यंत्रणा आहे कारण ती समानता आणते. ती असमानता दूर करते, समान संधी देते. शिक्षणाच्या माध्यमातून  प्रतिभेचा शोध  घेऊन प्रतिभावंत तयार करते. आपले संविधान निर्माते खूप बुद्धिमान होते. त्यांनी शिक्षणाला समवर्ती सूचीत  ठेवले. तुमच्यापैकी जे वकील नाहीत, त्यांच्यासाठी समवर्ती सूचीचा अर्थ राज्य आणि केंद्राची संयुक्त चिंता असा आहे".

उद्योग आणि कॉर्पोरेट नेत्यांनी  शिक्षण क्षेत्रात  योगदान देण्याचे आवाहन करताना धनखड म्हणाले,"मी या व्यासपीठावरून आवाहन करू इच्छितो  , एक असे व्यासपीठ जिथे मी पाहिले आहे की परोपकाराच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडले जात आहे. ही सरकार आणि खाजगी क्षेत्राची समवर्ती जबाबदारी आहे. उद्योग, व्यापार, व्यवसाय आणि वाणिज्य क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. या प्रसंगी मी देशातील खाजगी क्षेत्राला  पुढे येण्याचे आणि शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करतो."

"उपस्थितांपैकी  बरेच जण माझ्याशी सहमत असतील  की अमेरिकेतील काही विद्यापीठांची देणगी अब्जावधी डॉलर्समध्ये आहे. या देशात असे काय आहे की आपल्याकडे ही संस्कृती नाही? पाश्चिमात्य देशांमध्ये , संस्थेतून बाहेर पडणारा कुणीही थोडेफार आर्थिक योगदान देण्यास वचनबद्ध असतो. ते किती हे  कधीही महत्त्वाचे नसते", असे ते पुढे म्हणाले.

नालंदासारख्या संस्थांच्या वारशाबाबत बोलताना  धनखड यांनी अधोरेखित केले की, "आपल्याकडे गौरवशाली संस्था होत्या, ओदंतपुरी, तक्षशिला, विक्रमशिला, सोमपुरा, नालंदा, वल्लभी.... ज्ञान मिळविण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी आणि ज्ञान सामायिक करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून विद्वान येत असत. ज्ञानाची तहान शमवली गेली. मात्र मग सुमारे बाराशे वर्षांपूर्वी काय घडले! नालंदा, प्राचीन भारताचे बौद्धिक रत्न. तिथे  दहा हजार विद्यार्थी आणि दोन हजार शिक्षक होते, नऊ मजली इमारत आणि काय घडले, 1193 मध्ये ? आपल्या संस्कृतीचा, आपल्या शैक्षणिक संस्थेचा अविवेकी विध्वंसक बख्तियार खिलजी, परिसर जाळण्यात आला. अनेक महिने आगीच्या धगीत  विशाल ग्रंथालये जळून खाक झाली , गणित, वैद्यकशास्त्र आणि तत्वज्ञानावरील शेकडो आणि हजारो  हस्तलिखितांची राखरांगोळी झाली. विनाश केवळ वास्तुविध्वंसाचे नव्हे तर कित्येक शतकांचे ज्ञान पद्धतशीरपणे पुसून टाकण्याचे प्रतिनिधित्व होते.”

दरम्यानआज मुंबई येथील के.पी.बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड , महाराष्ट्राचे राज्यपाल  सी.पी. राधाकृष्णन, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक पी. हिंदुजा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2107440) Visitor Counter : 54