लोकसभा सचिवालय
तरुणांनी स्वतःला आत्मनिर्भर भारताच्या लक्ष्याप्रती कटिबद्ध करून घेण्याचे लोकसभा अध्यक्षांचे आवाहन
लोकसभा अध्यक्षांनी पुण्यात भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना केले संबोधित
Posted On:
27 FEB 2025 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2025
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज तरुणांनी रोजगार संधींची निर्मिती करून स्वतःला आत्मनिर्भर भारताच्या लक्ष्याप्रती कटिबद्ध करून घेण्याचे आवाहन केले आहे. नव भारतात विविध क्षेत्रांमधील अमर्याद संधींसह प्रचंड क्षमता आहे यावर अधिक भर देत ते म्हणाले की 2047 पर्यंत विकसित भारत उभारण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवकांनी संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रात अग्रेसर असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे येथील भारती विद्यापीठाच्या 26 व्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. भारतीय तरुण आधीच त्यांचे ज्ञान, क्षमता आणि शहाणपणा यांच्या जोरावर जगाचे नेतृत्व करत आहेत याचा उल्लेख करून ते म्हणाले की अगदी विकसित देशांची समृद्धी देखील तेथे स्थायिक भारतीय तरुणांनी त्या त्या देशांना दिलेल्या योगदानाचे फलित आहेत असे त्यांनी नमूद केले.
नवा भारत नव्या संधींसह समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करत आहे असे सांगून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, भारतातील तरुणांनी त्यांचे भविष्य घडवण्यासाठी विकसित देशांकडे अपेक्षेने पाहण्याऐवजी स्वतःची प्रतिभा आणि उर्जा 2047 पर्यंत भारताचे विकसित देशात रुपांतर करण्याच्या दिशेने वळवावी. भारतीय तरुणांमध्ये जागतिक आव्हानांवर मात करण्याचे सामर्थ्य आहे असे नमूद करून ते म्हणाले की या तरुणांचे ज्ञान, बुद्धिमत्ता ,आणि क्षमता यांच्या जोरावर भारत जागतिक आव्हानांवर नव्याने उदयाला येणाऱ्या उपाययोजना करण्यात आघाडीवर राहील. तरुणांनी मोठी स्वप्ने पहावी, कठोर परिश्रम करावे आणि देशाच्या भरभराटीत सक्रीय भागीदार व्हावे असे आग्रही प्रतिपादन ओम बिर्ला यांनी केले. शिक्षणाचे फायदे जेव्हा गरीब, उपेक्षित यांच्यापर्यंत तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यात यशस्वी होतील तेव्हाच हे शिक्षण यशस्वी मानता येईल असे त्यांनी पुढे सांगितले.
भारताच्या गेल्या 75 वर्षांतील वाटचालीचा संदर्भ देत ओम बिर्ला म्हणाले की, एक लोकशाही देश म्हणून भारताचा यशस्वी प्रवास संपूर्ण जगासाठी प्रेरक ठरला आहे. इतर देशांमध्ये लोकशाहीच्या भावनेला चालना देण्यासाठी सारे जग भारताकडे अपेक्षेने बघत आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
महाराष्ट्र राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा उल्लेख करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की महाराष्ट्र ही अनेक संघर्षांची तसेच सामाजिक आणि अध्यात्मिक क्रांतीची भूमी आहे. शूर छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा संदर्भ देऊन ते म्हणाले की या व्यक्तिमत्त्वांनी भारताच्या इतिहासाला आकार देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि ते आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील असे त्यांनी सांगितले.
या समारंभात बिर्ला यांनी भारती विद्यापीठातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पारितोषिके प्रदान केली.




लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे येथील भारती विद्यापीठाच्या 26 व्या पदवीदान समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2106781)
Visitor Counter : 15