संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना 32 शौर्य, विशिष्ट सेवा आणि गुणवंत सेवा पदके प्रदान

Posted On: 25 FEB 2025 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2025

 

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी 25 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या 18 व्या भारतीय तटरक्षक दलाच्या  अलंकरण समारंभात भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना शौर्य, विशिष्ट सेवा आणि गुणवंत सेवा पदके प्रदान केली.2022, 2023 आणि 2024 या वर्षांसाठी दिल्या गेलेल्या एकूण 32 पदकांत 6 राष्ट्रपती तटरक्षक पदके ( विशिष्ट सेवा),11 तटरक्षक सेवापदके (शौर्य पदके) आणि 15 तटरक्षक (गुणवंत सेवा)पदके  कर्मचाऱ्यांना दिली गेली.ही पदके त्यांची अनुकरणीय सेवा, धाडसी कृत्य आणि कर्तव्यासाठी केलेले निःस्वार्थ समर्पण, यासाठी असून अनेकदा आव्हानात्मक आणि अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल दिली गेली आहेत.

पुरस्कारार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे …..

ही पदके केवळ स्मृतिचिन्ह नसून राष्ट्रध्वजाचा  सन्मान राखण्यासाठी शौर्य, चिकाटी आणि अटळ निष्ठा यांचे प्रतीक असल्याचे या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना संरक्षण मंत्र्यांनी   सांगितले.  किनारी सुरक्षा, संघटनात्मक कार्यक्षमता, अंमली पदार्थ जप्त करणे, बचाव कार्य आणि आंतरराष्ट्रीय सराव सुनिश्चित करण्यासाठी जवानांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

एक मजबूत, विश्वासार्ह आणि जगातील सर्वात कार्यक्षम सागरी बल म्हणून भारतीय तटरक्षक दलाचा विकास राजनाथ सिंह यांनी यावेळी अधोरेखित केला. “भौगोलिकदृष्ट्या भारत तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे आणि त्याची किनारपट्टी विस्तीर्ण आहे. देशाच्या धोरणात्मक सुरक्षेला दोन प्रकारचे धोके आहेत. पहिला युद्धाचा धोका  जो सशस्त्र दलांद्वारे हाताळला जातो आणि दुसरा म्हणजे चाचेगिरी, दहशतवाद, घुसखोरी, तस्करी आणि बेकायदेशीर मासेमारीची आव्हाने ज्यासाठी सागरी दल, विशेषत: भारतीय तटरक्षक दल नेहमीच सतर्क असतात. या आव्हानांचा सामना करण्यासाठी तटरक्षक दल सक्रियपणे काम करत आहे, धोरणात्मक सुरक्षा सुनिश्चित करण्यात या दलाची महत्वाची  महत्त्वाचा भूमिका आहे,”असे संरक्षणमंत्री  यावेळी म्हणाले.

गेल्या एका वर्षात, तटरक्षक दलाने सागरी सुरक्षा, सुरक्षा आणि मानवतावादी मोहिमांमध्ये  लक्षणीय कामगिरी केली आहे.  सुमारे 37,000 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्याव्यतिरिक्त 14 बोटी आणि 115 समुद्री चाच्यांना पकडले. याव्यतिरिक्त, तटरक्षक दलाने विविध बचाव कार्यांद्वारे 169 लोकांचे प्राण वाचवले आणि 29 गंभीर जखमी लोकांना वैद्यकीय मदत मिळवून दिली.

सागरी सीमांवर सतर्क राहून, तटरक्षक दल केवळ बेकायदेशीर घुसखोरी थांबवत नाही तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि अंतर्गत सुरक्षेवर सकारात्मक परिणाम करण्यास मदत करते, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उभ्या ठाकणाऱ्या अपारंपरिक धोक्यांवर प्रकाश टाकत त्यांनी सागरी दलांना, विशेषत: तटरक्षक दलाला  पारंपारिक धोक्यांसह सायबर हल्ले, डेटाचे उल्लंघन, सिग्नल जॅमिंग, रडार व्यत्यय आणि जीपीएसचे स्पूफिंग यांसारख्या आव्हानांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

जेव्हा देशाची  सुरक्षा व्यवस्था मजबूत असेल आणि सैन्यदल मजबूत असतील,तेव्हाच सुरक्षित आणि समृद्ध भारताचे ध्येय साकार होऊ शकते, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले.

यावेळी पुरस्कार विजेते आणि त्यांच्या कुटुंबियांनीही राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधला.  संरक्षण राज्य मंत्री  संजय सेठ, संरक्षण सचिव  राजेश कुमार सिंह, तटरक्षक दलाचे  महासंचालक परमेश शिवमणी,  तटरक्षक दल आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

 

* * *

N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2106142) Visitor Counter : 19