संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना

Posted On: 23 FEB 2025 11:30AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 फेब्रुवारी 2025

 

भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (सीओएएस) 24 ते 27 फेब्रुवारी 2025 दरम्यानच्या  फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.  

24 फेब्रुवारी 2025 रोजी सीओएएस पॅरिसमधील लेझ इनव्हॅलिड्स येथे फ्रान्सच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.  गार्ड ऑफ ऑनर   नंतर जनरल पियरे शिल, फ्रेंच आर्मी चीफ (सीइएमएटी) यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील लष्करी संबंध अधिक दृढ करणे आणि सामरिक सहकार्याचे नवे मार्ग शोधणे हा आहे. यानंतर इकोल मिलिटरै ही प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्था आणि लष्करी संकुल येथे ते भेट देतील, जिथे त्यांना फ्युचर कॉम्बॅट कमांड (सीसीएफ) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. याशिवाय, ते फ्रेंच लष्कराच्या तांत्रिक विभाग (एसटीएटी) येथे भेट देऊन तांत्रिक नवोपक्रमांवर संक्षिप्त माहिती घेतील. त्यानंतर ते व्हर्साइल्स येथील बॅटल लॅब टेरे येथे लष्करी संशोधन आणि विकासाबाबत माहिती घेतील.  

25 फेब्रुवारी 2025 रोजी, जनरल द्विवेदी मार्सेल येथे प्रवास करतील. जिथे त्यांना फ्रेंच लष्कराच्या तिसऱ्या विभागाला भेट देतील. येथे त्यांना तिसऱ्या विभागाच्या प्रमुख जबाबदाऱ्या, त्यांची मोहीम आणि कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे, भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव (शक्ती), संयुक्त प्रशिक्षण उपक्रम, तसेच फ्रेंच लष्कराच्या आधुनिकीकरण प्रकल्प (स्कॉर्पियन) यासंदर्भातही त्यांना माहिती दिली जाईल.  

26 फेब्रुवारी 2025 रोजी, जनरल द्विवेदी कार्पीगन ला भेट देतील, जिथे त्यांना स्कॉर्पिअन विभागाच्या अत्याधुनिक युद्धनीतीचे थेट प्रात्यक्षिक पाहता येईल. या वेळी थेट गोळीबारासह युद्ध कौशल्यांचे सादरीकरण केले जाईल. ज्यातून त्यांना लष्करी सामर्थ्य आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचे दर्शन घडवले जाईल.  

27 फेब्रुवारी 2025 रोजी लष्करप्रमुख जनरल द्विवेदी सीओएएस न्यूवे चॅपल इंडियन वॉर मेमोरियल येथे भेट देऊन पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ पुष्पचक्र अर्पण करतील. ही श्रद्धांजली भारताच्या ऐतिहासिक लष्करी योगदानाची आठवण करून देणारी असेल. त्यानंतर ते इकोल डे गुरे de (फ्रेंच संयुक्त कर्मचारी महाविद्यालय) येथे व्याख्यान देतील. जिथे ते आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि भारताचा भविष्यातील सामरिक दृष्टिकोन यावर विचार मांडतील.  

हा दौरा भारत-फ्रान्स लष्करी सहकार्य अधिक दृढ करण्यासह दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारीला नवीन दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या भेटीतून द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यासोबतच भविष्यातील सहकार्याच्या नव्या संधीही निर्माण होतील.  

 

* * *

NM/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2105622) Visitor Counter : 20


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil