गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना 'ग्रामीण' (फेज-2) अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता केला वितरित

Posted On: 22 FEB 2025 7:44PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना 'ग्रामीण' (फेज-2) अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. या भव्य सोहळ्याला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Awas 1.JPG

आपल्या भाषणात केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताने पहिल्यांदाच एकाच वेळी 20 लाख घरांचे वाटप होताना पाहिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की या घरांसोबत लाभार्थ्यांना शौचालये, सौर पॅनेल आणि लवकरच गॅस सिलिंडरदेखील मिळणार आहेत. हे सर्व केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीशील आणि सक्षम नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. 

शाह यांनी अधोरेखित केले की प्रधानमंत्री आवास योजना (फेज-2) अंतर्गत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक घरांचे वाटप करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की ही घरे केवळ चार भिंती नाहीत, तर ती विकासाच्या स्वप्नांची पूर्तता आहेत. ही घरे लाभार्थ्यांच्या भविष्याच्या उज्ज्वल वाटचालीतील पहिले पाऊल ठरणार आहेत. 

Awas 2.1.JPG

केंद्रीय गृह मंत्री पुढे म्हणाले की पंतप्रधान मोदींनी ‘ प्रत्येकासाठी घर’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत गरिबांचे सन्मान आणि आत्मसन्मान सुरक्षित केले आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून 2029 सालापर्यंत महिलांसह मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकूण 5 कोटी घरे वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 3 कोटी 80 लाख कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे. 

शाह यांनी नमूद केले की महाराष्ट्रासाठी सुरुवातीला 13.50 लाख घरे मंजूर करण्यात आली होती, मात्र आता ती संख्या वाढवून 19.50 लाख करण्यात आली आहे. तसेच, ही सर्व घरे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

Awas 2.JPG

याशिवाय, अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचा उल्लेख केला. त्यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. 

Awas 3.JPG

शाह यांनी नमूद केले की विविध सिंचन प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती सुधारली आहे. राज्यात 11 वंदे भारत गाड्या सुरू करण्यात आल्या असून, अमृत भारत योजनेअंतर्गत 128 रेल्वे स्थानकांचे पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. 

Awas 4.JPG

मुंबई, पुणे आणि नागपूर येथील मेट्रो प्रकल्प जलदगतीने पूर्ण होत आहेत, तसेच शिर्डी आणि सिंधुदुर्ग येथे नवीन विमानतळांचे बांधकाम सुरू आहे. 'अटल सेतू ट्रान्स-हार्बर लिंक' हा प्रकल्प जागतिक स्तरावर एक अभियांत्रिकी चमत्कार ठरणार असून, भविष्यात तो इतर देशांसाठी आदर्श ठरेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

***

M.Pange/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2105584) Visitor Counter : 46