वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि जपानमधली भागिदारी ही बंधुत्व, लोकशाही, संस्कृती आणि आर्थिक सहकार्यावर आधारलेली आहे - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल

Posted On: 21 FEB 2025 5:07PM by PIB Mumbai

 

भारत आणि जपानमधली भागिदारी ही बंधुत्व, लोकशाही, संस्कृती आणि आर्थिक सहकार्यावर आधारलेली असून, संपूर्ण जगाने या भागिदारीची दखल घेतली असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. भारत-जपान अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक मंचाच्या  कार्यक्रमाला ते संबोधित करत होते.

भारताच्या आर्थिक विकासात जपान हा एक महत्त्वाचा सहकारी देश आहे. जपानद्वारा 2000 ते 2024 या कालावधीत भारतात 43 अब्ज डॉलरपेक्षा जास्त थेट परकीय गुंतवणूक (FDI) केली गेली असून, जपान हा भारताच्या परकीय गुंतवणुकीचा पाचवा सर्वात मोठा स्त्रोत बनला असल्याची बाब पियुष गोयल यांनी यावेळी अधोरेखीत केली.

दोन्ही देशांमध्ये 2011 साली झालेल्या व्यापक आर्थिक भागीदारी करारामुळे दोन्ही देशांतील परस्पर द्विपक्षीय व्यापार लक्षणीयरित्या दृढ झाला आहे. आजमितीला 1,400 पेक्षा जास्त जपानी कंपन्या भारतात कार्यरत आहेत तसेच देशातल्या 8 राज्यांमधील 11 औद्योगिक वसाहतींमध्ये जपानी आस्थापने  सुरू आहेत याचा उल्लेखही पियुष गोयल यांनी यावेळी केला. मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वे तसेच दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू आणि चेन्नई इथली मेट्रो रेल्वे प्रणाली यांसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांतून भारताच्या विकासातील जपानचा सक्रिय सहभाग दिसून येत असल्याचीही बाबही त्यांनी नमूद केली. आगामी काळात मुंबई ते अहमदाबाद दरम्यान शिंकानसेन बुलेट ट्रेन सेवा प्रत्यक्षात सुरू होईल, अशी आशाही पियुष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.

भारताने उत्पादन क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनातला  वाटा 25% पर्यंत वाढवण्याचे  ध्येय निश्चित केले आहे, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यात जपानसोबतची भागिदारी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखीत केली.

देशात व्यवसायस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही पियुष गोयल यांनी दिली. याचदृष्टीने देशात  केंद्र आणि राज्य स्तरावर व्यवसाय सुलभता विषयक सुधारणांशी संबंधित उपाययोजना राबवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांचा विकास, नवोन्मेषाच्या क्षेत्रातील सार्वजनिक - खाजगी क्षेत्राची भागीदारी आणि नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय घोषणांच्या माध्यमातून  संशोधन आणि विकास परिसंस्थेला दिले जात असलेले पाठबळ या सर्व घडामोडींमधून केंद्र सरकार आर्थिक विकासाच्या बाबतीत धोरणात्मक भर देत असल्याचेच दिसून येते ही बाबही त्यांनी आवार्जून नमूद केली. आजमितीला विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित  (STEM - Science, Technology, Engineering, and Mathematics) या शाखांमधले जगातले सर्वाधिक पदवीधर हे भारतातले आहेत, आणि त्यात महिलांचे प्रमाणही 43% इतके असून, त्या देशातील कुशल मनुष्यबळात आपले योगदान देत असल्याची बाबही पियुष गोयल यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केली.

निर्णायक नेतृत्व, लोकसांख्यिकीय लाभ, लोकशाही, विविधता आणि 1.4 अब्ज लोकांद्वारे बाजारपेठेत निर्माण होणारी मागणी हे भारताच्या आर्थिक विकासाचे पाच प्रमुख घटक आहे, आणि हे घटक एकत्रितपणे भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला आकार देत आहेत ही बाब त्यांनी अधोरेखीत केली. जागतिक गरजेनुसार पुरवठा करण्याच्या अनुषंगाने देशातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार असल्याचा पुनरुच्चारही पियुष गोयल यांनी यावेळी केला.

आजचा भारत हा जगात आत्मविश्वास निर्माण करणारा आहे हे पंतप्रधानांचे वक्तव्य  अधोरेखित करत आज भारतात युवा आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध असून, यामुळे आजच्या घडीला भारत हे गुंतवणुकीसह, वस्तू आणि सेवांच्या स्त्रोताचेही प्रमुख केंद्र बनले असल्याचेही गोयल यांनी यावेळी नमूद केले.

जपान कायमच उत्कृष्टतेचा मापदंड म्हणून ओळखला गेला आहेआणि भारत देखील आपल्या उत्पादन क्षेत्रासाठी याच पद्धतीच्या उच्च मानकांचा अवलंब करू इच्छित असल्याची बाबही पियुष गोयल यांनी यावेळी नमूद केली. गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारतीय उत्पादकांना कायझेन (सातत्यपूर्ण सुधारणा) आणि लीन सिक्स सिग्मा या तत्त्वांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे गोयल म्हणाले.

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2105407) Visitor Counter : 19


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil