अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बनावट भारतीय चलनी नोटा छापणारी आणखी 7 मॉड्यूल्स डीआरआयने आणली उघडकीस, महाराष्ट्रातल्या 4 तर हरियाणा,बिहार आणि आंध्रप्रदेशमधल्या प्रत्येकी एका मॉड्युल्सचा समावेश, नऊजणांना अटक

Posted On: 21 FEB 2025 3:11PM by PIB Mumbai

 

सिक्युरिटी पेपर आयात आणि बनावट भारतीय चलनी नोटा छापणाऱ्या मॉड्यूल्सविरुद्धची मोहीम सुरू ठेवत, डीआरआय,अर्थात महसूल गुप्तचर महासंचालनालयाने 20  फेब्रुवारी 2025   रोजीमहाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू आणि बिहारमधील 11  वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि बनावट भारतीय चलनी नोटा  छपाईत सहभागी असलेली  आणखी सात (7) मॉड्यूल्स उघडकीस आणली.

या प्रकरणात, मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथे, डीआरआयने सिक्युरिटी पेपर  आयातदाराची ओळख पटवून शोध घेतला.  दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात कसून शोध घेतल्यानंतर, बनावट भारतीय नोटा छापण्यासाठी करण्यासाठी एक अत्याधुनिक ठिकाण  उघडकीस आले आणि 50  आणि 100  रुपयांच्या बनावट नोटा, अनेक यंत्रसामग्री/साधने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये लॅपटॉप, प्रिंटर, पेन ड्राइव्ह, सेक्युरिटी पेपर, A-4 आकाराचे कागद आणि महात्मा गांधींचे वॉटरमार्क असलेले बटर पेपर इत्यादींचा समावेश आहे.डीआरआय अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आणि पोलिस अधिकाऱ्यांनी पुढील तपासासाठी सर्व उपकरणे आणि साधने जप्त केली.

संगमनेर जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात, डीआरआयने बनावट भारतीय चलनी नोटा छापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणक आणि प्रिंटरसह अशाच प्रकारचे ठिकाण  शोधून काढले. दोन्ही ठिकाणी, डीआरआय अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आणि पुढील तपासासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित  सामान  जप्त केले.

कोल्हापूर मॉड्यूलमधील आरोपींच्या चौकशीनंतर कोल्हापूर पोलिसांनी बेळगावमध्ये प्रिंटिंग सेट असलेल्या आणखी एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक केली.

इतर तीन ठिकाणी (आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्हा; बिहारमधील खगरिया जिल्हा आणि हरियाणामधील रोहतक) सेक्युरिटी पेपरच्या आयातदारांचा शोध घेण्यात आला. पश्चिम गोदावरी येथे प्रतिबंधित सेक्युरिटी पेपर आणि प्रिंटर; खगारिया जिल्ह्यात लॅपटॉप, प्रिंटर आणि प्रतिबंधित सेक्युरिटी पेपर असे गुन्हेगारी पुरावे देखील जप्त करण्यात आले. डीआरआय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींना अधिकारक्षेत्रातील पोलिसांनी अटक केली आहे आणि बीएनएस अंतर्गत पुढील तपास सुरु आहे.

***

N.Chitale/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2105383) Visitor Counter : 39