सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
सरकार मुंबई विद्यापीठामध्ये 'आंबेडकर अध्यासन’ आणि विद्यार्थी सुविधा निर्माण करणार : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांची संविधान अमृत महोत्सवात माहिती
अधिकारांचे कर्तव्यासोबत संतुलन असले पाहिजेः केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.विरेंद्र कुमार
मुंबई विद्यापीठाने भारताच्या विधी आणि सामाजिक परिदृश्याला आकार दिला आहे - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव
Posted On:
20 FEB 2025 6:09PM by PIB Mumbai
मुंबई, 20 फेब्रुवारी 2025
भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आज मुंबई विद्यापीठाच्या संकुलात संविधान अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांनी पुरस्कार केलेल्या सामाजिक न्याय, समता, आणि सक्षमीकरणाच्या सिद्धांतांना पुढे घेऊन जाण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे यावर त्यांनी आपल्या बीजभाषणात भर दिला. डॉ. कुमार यांनी वंचितांच्या पुनरुत्थानासाठी आणि डॉ. आंबेडकर यांच्या समावेशक वृद्धी आणि समता दृष्टीकोनाला पुढे नेण्यासाठी तयार केलेल्या सरकारच्या विविध उपक्रमांना अधोरेखित केले. डॉ. आंबेडकर यांचे योगदान आणि त्यांचा देशाविषयीचा दृष्टीकोन याविषयीच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी इतर विद्यापीठांच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठात आंबेडकर अध्यासन स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी विद्यापीठात दोन नवीन वसतिगृहे उभारणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याशिवाय उपेक्षित समुदायातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना मदत करण्यासाठी, इतर संस्थांमध्ये अशा केंद्रांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मुंबई विद्यापीठात एक समर्पित प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

त्यांच्या भाषणात डॉ. कुमार यांनी भारताच्या युवा वर्गाला नशामुक्त भारत अभियानाचा एक भाग म्हणून अंमली पदार्थविरोधी लढ्यात नेतृत्व करण्याचे आणि स्वतःला तसेच आपल्या समुदायाला या घातक पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

ज्या मुंबई विद्यापीठातून डॉ. भीमराव आंबेडकर यांनी त्यांचे अध्ययन पूर्ण केले त्या मुंबई विद्यापीठाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध विशद करताना डॉ. कुमार म्हणाले, "डॉ. आंबेडकर यांचा या संस्थेतील विद्यार्थी ते आपल्या संविधानाचे शिल्पकार होण्यापर्यंतचा प्रवास हा त्यांच्या भारतासाठीच्या दृढनिश्चय आणि दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्याने केवळ कायदेशीर चौकटच प्रदान केली नाही तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची संकल्पना मांडली जी अजूनही सरकारच्या धोरणांमागील मार्गदर्शक शक्ती आहे."
राज्यघटना केवळ मूलभूत हक्कांची हमी देत नाही तर जबाबदाऱ्यांवरही भर देते हे त्यांनी नमूद केले. "आपल्या अधिकारांवर लक्ष केंद्रित करताना, आपण समाजाप्रती असलेली आपली कर्तव्ये देखील स्वीकारली पाहिजेत याची जाण ठेवावी. डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातील लोकशाही वास्तवात साकारण्यासाठी हे संतुलन आवश्यक आहे," याकडे त्यांनी लक्ष वेधले. "सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही अपूर्ण आहे" या डॉ. आंबेडकरांच्या विश्वासाचा पुनरुच्चार करून केंद्रीय मंत्र्यांनी भाषणाचा समारोप केला आणि या आदर्शांच्या पूर्ततेसाठी सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

"भारताच्या कायदेशीर आणि सामाजिक उत्क्रांतीत मुंबई विद्यापीठाने बजावलेल्या प्रभावी भूमिकेची आठवण करून देणारा हा कार्यक्रम आहे. या विद्यापीठाने निर्माण केलेल्या सर्वोत्तम नेत्यांपैकी एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी येथे पदवी संपादन करण्याबरोबरच अध्यापनही केले आणि परिवर्तनाचा वारसा मागे सोडला" असे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव यांनी नमूद केले.

महाराष्ट्र सरकारचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे संचालक अनिल कुमार पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते.
S.Kane/S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105058)
Visitor Counter : 30