विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारत आणि नेपाळ यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भागीदारी अधिक दृढ करणारा नवा करार
Posted On:
19 FEB 2025 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025
भारत आणि नेपाळ यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करणारा अतिशय महत्त्वाचा ठरणारा एक करार करण्यात आला आहे. भारताची वैज्ञानिक संशोधन परिषद (CSIR) आणि नेपाळ अकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (NAST) या संस्थांदरम्यान 18 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीत सीएसआयआर-नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी येथे हा करार करण्यात आला.
सीएसआयआरचे संचालक आणि डीएसआयआरचे सचिव डॉ. एन. कलाईसेल्वी आणि एनएएसटीचे कुलगुरु प्राध्यापक डॉ. दिलिप सुब्बा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि संबंधित कागदपत्रांची देवाणघेवाण केली. या करारामुळे द्विपक्षीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्याला चालना देण्यासाठी एक व्यापक चौकट स्थापित झाली आहे.

भारताची सीएसआयआर आणि नेपाळची एनएएसटी यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्याच्या सामंजस्य कराराच्या प्रतींची सीएसआयआरचे संचालक डॉ. एन. कलाईसेल्वी आणि एनएएसटीचे कुलगुरु प्राध्यापक डॉ. दिलिप सुब्बा यांनी परस्परांमध्ये देवाणघेवाण केली.
सीएसआयआर आणि एनएएसटी यांच्यातील सहकार्याचा इतिहास अतिशय जुना म्हणजे 1994 सालापासूनचा आहे, ज्यावर्षी सीएसआयआर आणि तत्कालीन- आरओएनएएसटी ( आताची एनएएसटी) यांच्यात परस्पर हिताच्या क्षेत्रातील संयुक्त संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक करार करण्यात आला होता. या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन कृती कार्यक्रमांवर 1997 आणि 2002 साली स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कराराच्या अधिकृत कालावधीनंतरही अनेक संयुक्त कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नव्या सामंजस्य करारामुळे या सहकार्याचे पुनरुज्जीवन होणार असून दोन्ही संस्थांदरम्यान वैज्ञानिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार आहे.

2025 सालच्या सामंजस्य करारांतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या भागीदारीद्वारे विविध सहयोगी उपक्रम राबवले जातील. यामध्ये शास्त्रीय माहिती, संशोधन सामग्री आणि शास्त्रज्ञांची देवाणघेवाण, संयुक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन, संयुक्त संशोधन प्रकल्पांची अंमलबजावणी, एकमेकांच्या प्रमुख संशोधन संस्थांमध्ये प्रवेश, तंत्रज्ञान भागीदारी आणि क्षमता विकासासाठी संस्थांकडून परस्पर सहकार्याने राबवले जाणारे उपक्रम यांचा समावेश असेल. हे सहकार्य परस्पर मान्य केलेल्या क्षेत्रांवर केंद्रित असेल, ज्यात जैव-विज्ञान, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान, पाणी आणि पर्यावरण तंत्रज्ञान, इंधन आणि खाण विज्ञान, धातूशास्त्र, काच, सिरेमिक्स, बायोमटेरियल आणि नॅनोटेक्नॉलॉजी, पर्यायी ऊर्जा, चामडे आणि पादत्राणे तंत्रज्ञान, मापनशास्त्र, पॉलिमर विज्ञान आणि औषध शोध यांचा समावेश असेल.
* * *
M.Pange/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104827)
Visitor Counter : 24