वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-कतार दरम्यानचे द्विपक्षीय आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन
Posted On:
18 FEB 2025 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 18 फेब्रुवारी 2025
कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमद बिन खलिफा अल थानी यांच्या 17-18 फेब्रुवारी दरम्यानच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय उद्योग महासंघाने, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआईआईटी) सहयोगाने 18 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि कतारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री शेख फैजल बिन थानी बिन फैसल अल थानी उपस्थित होते, आणि त्यांनी यावेळी त्यांनी बीजभाषण दिले.
संयुक्त व्यापार मंचाच्या उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी, विकसित भारताच्या दृष्टीकोनाला अनुसरून, 2047 पर्यंत 30 ते 35 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेचा पुनरुच्चार केला. भारत आणि कतार दरम्यान यशस्वी ऊर्जा व्यापाराचा दीर्घ काळाचा इतिहास असून, या भागीदारीचे भविष्य हायड्रोकार्बन पासून, ते एआय, क्वांटम कंप्युटिंग, आयओटी आणि सेमीकंडक्टर्स यासारख्या अत्याधुनिक क्षेत्रांपर्यंत विस्तारणार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
बदलत्या भूराजकीय स्थितीत सायबर सुरक्षेपुढील धोके आणि हवामान बदलाची आव्हाने अधिक तीव्र होत असताना, स्वावलंबन, अर्थात आत्मनिर्भरता ही प्राथमिकता बनली आहे, यावर त्यांनी भर दिला. प्रत्येक देशाकडे वेगवेगळे स्पर्धात्मक फायदे असताना, भारत आणि कतार परस्परांच्या क्षमतांना पूरक ठरण्याच्या स्थितीत असून, नवोन्मेषाला चालना देण्यात आणि भविष्यातील उद्योगांना आकार देण्यात भागीदार बनू शकतील, यावर त्यांनी भर दिला. दोन्ही देश परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असताना, या भागीदारीसाठी उद्योजकता, तंत्रज्ञान आणि शाश्वतता, हे प्रमुख आधारस्तंभ ठरतील, असे ते म्हणाले.
उद्घाटन सत्राला संबोधित करताना, कतारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री शेख फैजल बिन थानी बिन फैजल अल थानी यांनी या भावनांचा पुनरुच्चार केला, आणि भारत-कतार दरम्यानचे संबंध केवळ एक व्यवहार नसून, परस्पर सन्मान, सामायिक हितसंबंध आणि आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या वचनबद्धतेवर आधारित परंपरा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भारत-कतार व्यापार भागीदारी वाढत असून भारत हा कतारचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. कतार हे एक वैविध्यपूर्ण, गतिशील आणि गुंतवणूकदार-अनुकूल गंतव्य स्थान आहे, असून, कतारची अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांमधील अफाट संधींचा शोध घेण्यासाठी भारतीय गुंतवणूकदारांचे स्वागत करत आहे, असे ते म्हणाले.
या वाढत्या भागीदारीला बळकटी देण्यासाठी या कार्यक्रमादरम्यान दोन महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि कतार बिझनेस असोसिएशन इन्व्हेस्ट इंडिया आणि इन्व्हेस्ट कतार.
व्यावसायिक सहकार्य सुलभ करणे, गुंतवणुकीचा ओघ वाढवणे आणि परस्पर हिताच्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन सहकार्य वाढवणे, हे या करारांचे उद्दिष्ट आहे.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104438)
Visitor Counter : 27