मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग आणि जागतिक पशु आरोग्य संघटना यांचा पशुधन क्षेत्रातील सार्वजनिक खाजगी भागीदारीसाठी पथदर्शी आराखडा
भारतात पशु आरोग्याला चालना देण्यासाठी जिल्हास्तरीय पशुवैद्यकीय प्रयोगशाळा, एफएमडी - मुक्त क्षेत्र, गतीमान लस साखळी निर्माण करण्यावर कार्यशाळेत भर
भारतात पशुवैद्यकीय सेवा मजबूत करण्यासाठी एका वर्षात रचनात्मक सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण विकसित करण्याची गरज – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग सचिव
Posted On:
15 FEB 2025 1:14PM by PIB Mumbai
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन मंत्रालयाच्या अखत्यारितील पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने जागतिक पशुआरोग्य संघटनेच्या सहकार्याने 11 ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान नवी दिल्लीत WOAH PVS-PPP ( पशुवैद्यकीय सेवा कार्य – सार्वजनिक खाजगी भागीदारी) ही उद्दीष्ट आधारित कार्यशाळा आयोजित केली होती. लसीकरण, पशुवैद्यकीय कर्मचारीदल विकास, संस्थात्मक पायाभूत सुविधा आणि लाळ खुरकत रोगमुक्त (FMD) क्षेत्र निर्मिती या क्षेत्रातील सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा मजबूत करणे हे या कार्यशाळेचे उद्दीष्ट होते.
सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या सहाय्याने भारतातल्या पशुवैद्यकीय सेवेतील गंभीर त्रुटी दूर करण्यावर चर्चेत भर देण्यात आला. यासाठी पुढील मुद्दे महत्त्वाचे मानले गेले :
- पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा विस्तार, जिल्हा स्तरावर NABL मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय प्रयोगशाळा स्थापन करणे
- सक्षम सर्वेक्षणाच्या माध्यमातून रोग नियंत्रण उपक्रमांचे बळकटीकरण आणि पाय व मुख रोगमुक्त (FMD) क्षेत्र विकास
- रचनात्मक प्रशिक्षण व ज्ञानाच्या आदान प्रदान मंचाच्या माध्यमातून पशुवैद्यकीय कार्यदल क्षमता उभारणी
- सशक्त लस मूल्य साखळी विकासाद्वारे पशुवैद्यकीय लस उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना
- पशुवैद्यकीय संशोधन, रोगनिदान व विस्तृत सेवांमधील खाजगी क्षेत्रातील कौशल्याचा समावेश करुन सर्वंकष सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण आखणे
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग सचिव अलका उपाध्याय यांनी पशुधन क्षेत्रातील पशुवैद्यकीय सेवांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. भारताच्या एकूण कृषी मूल्य वर्धनात याचे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. NABL मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय प्रयोगशाळा स्थापन करणे गरजेचे असल्याचे सांगून रोग सर्वेक्षण, कार्यदल क्षमता आणि लस उत्पादन यामध्ये खाजगी क्षेत्राचे सहकार्य आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम सशक्त करणारा पथदर्शी आराखडा तयार करण्यात या चर्चेचे योगदान लाभेल, पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांचा विस्तार होईल आणि पशु आरोग्य सुरक्षेसाठी शाश्वत परिसंस्था निर्माण होण्याची हमी मिळेल, असे त्या म्हणाल्या. पशुवैद्यकीय सेवांमधील दीर्घकालिन गुंतवणुकीच्या हमीसाठी आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागासाठी रचनात्मक सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण विकसित करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
जागतिक पशु आरोग्य संघटनेचे आशिया प्रशांत विभागाचे क्षेत्रिय प्रतिनिधी डॉ. हिरोफुमी कुगिता यांनी पशुवैद्यकीय सेवा क्षेत्रातील भारताच्या नेतृत्वाची दखल घेतली आणि ज्ञानाचे आदानप्रदान व प्रयोगशाळा सहकार्याच्या माध्यमातून सर्वोत्तम जागतिक सेवा देण्याची क्षमता भारताकडे असल्याचे मत व्यक्त केले.
पशुसंवर्धन आयुक्त आणि देशाचे प्रमुख पशुवैद्कीय अधिकारी डॉ. अभिजीत मित्रा यांनी पशुवैद्यकीय सेवेला सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राना एकत्रितपणे काम करता येईल अशा सुरचित संस्थात्मक आराखड्याची गरज असल्याचे मत नोंदवले. ते म्हणाले, या कार्यशाळेने अशा आराखड्यासाठीचा पाया निर्माण करण्याचे काम केले आहे आणि पुढच्या टप्प्यात याच्या अंमलबजावणीवर आणि क्षमतानिर्मितीवर भर दिला जाईल.
या कार्यशाळेत राज्यांचे पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय परिषद, रोगनिदान प्रयोगशाळा, ICAR संशोधन संस्था, पशु आरोग्य व उत्पादन विस्तार एजंट, भारतीय कृषी कौशल्य परिषद, केंद्रिय औषध प्रमाणीकरण नियंत्रण संस्था, खाजगी क्षेत्र, भारतीय पशु आरोग्य कंपनी महामंडळ, लस उत्पादक, अन् व कृषी संस्था आणि जागतिक बँक यांचे 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
WOAH च्या सात तज्ज्ञांनी चर्चासत्रात भाग घेतला. यामध्ये त्यांनी संसाधन वाहतूक, जोखीम व्यवस्थापन आणि संबंधितांना एकत्र आणणे यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या भूमिकेविषयी चर्चा केली. पशुवैद्यकीय क्षेत्रासाठीच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी आराखड्याच्या सादरीकरणाने या कार्यशाळेचा समारोप झाला. या आराखड्यात पशुवैद्यकीय सेवा सुधारणांसाठी कृतीधोरण, रोग सर्वेक्षण व पशुधन उत्पादन यांची रुपरेषा सादर करण्यात आली. कार्यशाळेतील फलनिष्पत्तीतून धोरण आखणी , गुंतवणुकीला चालना आणि रचनात्मक रितीने सार्वजनिक खाजगी भागीदारीची अंमलबजावणी यामध्ये योगदान लाभेल आणि त्यातून भारताच्या पशुसंवर्धन क्षेत्राला दीर्घकालिन लाभ होतील.



***
S.Kane/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2103513)
Visitor Counter : 45