लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

शक्ती आणि प्रेरणेसाठी तरुणांनी पुस्तकांकडे वळण्याचे लोकसभा अध्यक्षांनी केले आवाहन

Posted On: 08 FEB 2025 7:47PM by PIB Mumbai

 

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकांना, विशेषतः तरुणांना, शक्ती आणि प्रेरणेसाठी पुस्तकांकडे वळण्याचे आवाहन केले आहे. पुस्तके ही वैयक्तिक आणि सामाजिक विकासात खरी मार्गदर्शक शक्ती आहेत कारण त्या ज्ञानाच्या कायमस्वरूपी नोंदी असून भविष्यातील पिढ्यांसाठी विचार आणि वारसा जतन करतात, असे त्यांनी नमूद केले. आव्हानांवर मात करण्यासाठी उत्साह, प्रेरणा आणि शक्तीचा स्रोत म्हणून पुस्तकांचा स्वीकार करण्याचे आवाहन बिर्ला यांनी तरुणांना केले.

बिर्ला यांनी आज नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2025 मध्ये प्रसिद्ध पत्रकार आणि राजस्थान पत्रिकेचे मुख्य संपादक गुलाब कोठारी यांनी लिहिलेल्या 'स्त्री: देह से आगे' आणि 'माइंड बॉडी इंटेलेक्ट' या दोन पुस्तकांचे प्रकाशन करताना हे निरीक्षण नोंदवले.

उपस्थितांना संबोधित करताना बिर्ला यांनी विशेष करून आव्हानात्मक काळात मार्गदर्शन, ज्ञान आणि शक्ती प्रदान करण्यात पुस्तकांच्या अमूल्य भूमिकेवर प्रकाश टाकला. पुस्तके केवळ आयुष्यभराचे साथीदार नाहीत तर  कधीही, कुठेही ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचे काम ते करतात, असेही ते म्हणाले.

या वर्षीचा पुस्तक मेळा महाकुंभमेळा आणि भारतीय संविधानाच्या 75 वा वर्धापन दिन या दोन महत्त्वाच्या घटनांसोबत येत आहे हा शुभ संकेत  आहे, असे बिर्ला म्हणाले. त्यांनी प्रयागराजमधील महाकुंभचे वर्णन श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक म्हणून केले, तर जागतिक पुस्तक मेळा हा "ज्ञान आणि संस्कृतीचा महाकुंभ" असून  साहित्य, कल्पना आणि विचार एकत्रितपणे समाजाला प्रगतीकडे नेण्यासाठी प्रेरणा देतात असे त्यांनी सांगितले.

आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात, बिर्ला यांनी कोठारी यांच्या वैदिक ज्ञानाची समकालीन  दृष्टिकोनांशी, विशेषतः समाजात महिलांच्या विकसित होत असलेल्या भूमिकेशी केलेल्या अंतर्दृष्टीपूर्ण तुलनेची प्रशंसा केली. चेतना आणि आंतरिक शक्तीच्या गहन शोधासाठी कोठारी यांच्या पुस्तकांचे कौतुक केले. ही पुस्तके वाचकांना स्वतःशी जोडले जाण्यास आणि जीवनातील गहन पैलू समजून घेण्यास प्रोत्साहित करतील, असेही ते म्हणाले.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2101081) Visitor Counter : 43