शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शनात पीएम युवा 2.0 अंतर्गत 41 पुस्तकांचे केले प्रकाशन
Posted On:
08 FEB 2025 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शन-2025 मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते पीएम युवा 2.0 अंतर्गत 41 पुस्तकांचे प्रकाशन झाले.त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू हे या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
![Image](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001M9KV.jpg)
उपस्थितांना संबोधित करताना धर्मेंद्र प्रधान यांनी,ज्यांच्या पुस्तकांचे आज प्रकाशन झाले, अशा 41 युवा लेखकांचे अभिनंदन केले.त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत, ते म्हणाले की या युवा लेखकांचे लेखन आणि सर्जनशीलता साहित्य विश्व समृद्ध करेल आणि बौद्धिक अभिसरणाला एक नवीन दिशा देईल.
![Image](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002J0GD.jpg)
देशभरात भारतीय भाषांमधील पुस्तकांचा प्रसार करणे हे राष्ट्रीय ध्येय आहे,असे प्रधान यांनी अधोरेखित केले. पीएम युवा सारखे उपक्रम या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात नुकतीच जाहीर केलेली ‘भारतीय भाषा पुस्तक योजना’ अशा राष्ट्रीय प्रयत्नाला गती देईल यावरही त्यांनी भर दिला.
![Image](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003RDY0.jpg)
भारतीय भाषांमध्ये पुस्तके आणि साहित्य मिळवणे सहजसाध्य करण्यामधे नॅशनल बुक ट्रस्टची महत्त्वपूर्ण भूमिका विशद करत, त्यांनी या संस्थेला आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आणि भारताचा समृद्ध साहित्यिक वारसा आणि भाषिक परंपरा जागतिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशकांशी सहयोग करण्याचे आवाहनही केले.
प्रधान यांनी प्रदर्शन हॉलला भेट दिली आणि जगातील सर्वात मोठ्या पुस्तक मेळ्यांपैकी एक आयोजित केल्याबद्दल नॅशनल पुस्तक ट्रस्टचे अभिनंदन केले. नवीन पुस्तके शोधण्यासाठी, साहित्यात हरवून जाण्यासाठी, लेखकांना भेटण्यासाठी आणि सहकारी पुस्तकप्रेमींशी संपर्क साधण्यासाठी हे एक आदर्श व्यासपीठ असल्याचे सांगत, याला साहित्य, भाषा, ज्ञान, लोक आणि संस्कृती यांचा "ज्ञान-कुंभ" असे संबोधत त्यांनी या मेळ्याचे वर्णन वाचकांचे नंदनवन असे केले.
***
S.Kane/S.Patgonakar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2101023)
Visitor Counter : 56