सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समितीची (सीएसी) बैठक संपन्न
Posted On:
08 FEB 2025 3:40PM by PIB Mumbai
प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समिती (सीएसी) ची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आणि सीएसी चे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कुमार होते. या बैठकीत योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच अनुसूचित जाती समुदायाच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी धोरणे ठरविण्यात आली.
डॉ. वीरेंद्र कुमार यांनी योजनेंच्या अंमलबजावणीवर सखोल चर्चा केली आणि अनुसूचित जाती समुदायाची वस्ती असलेल्या गावांचा आणि लाभार्थ्यांचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी पीएम- अजय च्या व्यापक उद्दिष्टांवर भर दिला.
समितीने योजनेचा अधिकाधिक अनुसूचित जातीच्या लोकसंख्येपर्यंत विस्तार करण्याच्या रणनीतींवर सविस्तर चर्चा केली. योजनेची परिणामकारकता वाढवण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समन्वय मजबूत करणे, समुदायाचा अधिक सहभाग वाढवणे, प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करणे आणि त्यांच्या परिणामांचे प्रभावी निरीक्षण करणे यावर भर देण्यात आला.
डॉ. वीरेंद्र कुमार यांनी एससी समुदायाच्या सर्वांगीण विकासाप्रति सरकारच्या ठाम वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, "पीएम- अजय ही योजना सामाजिक-आर्थिक तफावत दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. केंद्रित हस्तक्षेप आणि सहयोगात्मक प्रयत्नांद्वारे, आम्ही एससी व्यक्तींच्या सशक्ती करणासाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्य करत आहोत."
बैठकीच्या शेवटी, योजनेच्या उद्दिष्टांची अंमलबजावणी जलद आणि प्रभावीपणे करण्यासाठी सर्व संबंधितांनी आपल्या प्रयत्नांना गती देण्याचे तसेच एससी समुदायाच्या शाश्वत विकासासाठी अधिक सक्रिय योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2101014)
Visitor Counter : 41