युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लठ्ठपणाशी लढा देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला  भारतीय खेळाडू, फिटनेस इन्फ्ल्यूएन्सर यांचा  वाढता पाठींबा

Posted On: 07 FEB 2025 3:25PM by PIB Mumbai

 

लठ्ठपणाशी लढा देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला  पाठींबा  देण्यासाठी भारतीय खेळाडू, फिटनेस इन्फ्ल्यूएन्सर पुढे येत आहेत.डेहराडूनमध्ये आयोजित 38 व्या राष्ट्रीय क्रीडा 2025 च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी हे आवाहन केले होते. 

प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू पीआर श्रीजेश याने आहाराबाबत जागरुकतेवर भर दिला.  “आरोग्यदायी आहार  ही निरोगी आणि आनंदी जीवनाची पहिली पायरी आहे. फिटनेस संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वचनबद्धतेने प्रेरित होऊन ‘फिट फूड इंडिया’ उपक्रमाला आपली जीवनशैली बनवूया,” असा संदेश पीआर श्रीजेश याने X या समाज माध्यमावर लिहिला आहे.

टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा हिने माईंडफूल आहाराचे महत्त्व विशद करून आपल्या भावना व्यक्त केल्या.  “आपण जे अन्न खातो ते आपल्या आरोग्याला आकार देते. आपण पौष्टिक आहारासाठी  वचनबद्ध होऊ या आणि ‘फिट फूड इंडिया’ उपक्रमाला जीवन जगण्याचा मार्ग बनवू या, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या फिट इंडिया  मिशनमध्ये योगदान देऊया,” असा संदेश मनिका बत्रा हिने  X या समाज माध्यमावर दिला आहे.

फिट इंडिया आयकॉन आणि एमएमए चॅम्पियन संग्राम सिंग यांनी आरोग्याला प्राधान्य देण्याच्या निकडीवर भर दिला तसेच लोकांना तंदुरुस्त जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहनही केले.  “मानवी शरीरासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे सकस खाणे आणि तंदुरुस्त राहणे. आपल्या माननीय पंतप्रधानांनी प्रत्येकाला हे आवाहन केले आहे, त्याला प्रतिसाद देत आपण लठ्ठपणाविरुद्ध लढा दिला  पाहिजे. आयुष्याच्या अखेरीला  संपत्ती आणि ऐशोआराम महत्त्वाचे नाहीत - फक्त आपले निरोगी शरीरच आपल्या कामी येणार आहे.  स्वतःला निरोगी बनवू आणि देशाला पुढे नेऊया,” असे सिंग यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

क्रीडा विश्वातील प्रसिद्ध क्रीडापटूंनी या चळवळीला पाठिंबा दिल्याने लठ्ठपणाविरुद्धच्या लढ्याला वेग आला आहे.  गेल्या रविवारी, राष्ट्रीय राजधानीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमात, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी भारतात लठ्ठपणा विरोधात लढण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत  डॉक्टर आणि पोषणतज्ञांच्या 250 हून अधिक जणांच्या गटाचे नेतृत्व केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात लठ्ठपणा विरोधात लढण्याचे आवाहन केले होते.  तरुण आणि वृद्ध अशा सर्व वयोगटांवर परिणाम  करणाऱ्या लठ्ठपणा विरोधात लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2100717) Visitor Counter : 29


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil