वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
नवी दिल्लीतील यशोभूमी येथे 20-21 फेब्रुवारी दरम्यान केले जाणार दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्स्पो (डायलेक्स) 2025 चे आयोजन
'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांशी सुसंगती साधत डायलेक्स वाढवणार निर्यात आणि रोजगार
कॉन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट्स ने पादत्राणे आणि चामडे निर्यातीवर विशेष लक्ष केंद्रित करून 2030 पर्यंत 47 अब्ज डॉलर्स मूल्याच्या निर्यातीचे लक्ष्य केले निर्धारित
Posted On:
06 FEB 2025 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025
कॉन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट्स (सीएलई) 20-21 फेब्रुवारी या दिवशी नवी दिल्लीतील आयसीसी द्वारका भागातील यशोभूमी येथे दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्स्पो (डायलेक्स) 2025 आयोजित करणार आहे. डायलेक्स हा एक प्रमुख बी2बी कार्यक्रम व्यवहार्य स्रोत पर्याय शोधणाऱ्या आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसमोर उत्पादक आणि निर्यातदारांना त्यांचे नवीनतम संग्रह, नवोन्मेष आणि क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ प्रदान करण्यासाठी आरेखित आहे. "मेक इन इंडिया" आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांशी सुसंगत असलेला डायलेक्स 2025 निर्यात वाढविण्यासाठी, रोजगार निर्मिती करण्यासाठी तसेच जागतिक बाजारपेठेत भारताची उपस्थिती मजबूत करण्यासाठी सज्ज आहे.
सरकारने व्यापार आणि उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक सुधारणा लागू केल्या आहेत. या उद्योगाची प्रमुख मागणी पूर्ण करत वेट ब्लू लेदरवरील मूलभूत सीमाशुल्क (BCD) 2 फेब्रुवारी 2025 पासून 10% वरून शून्य टक्के करण्यात आले आहे, तर क्रस्ट लेदरवरील निर्यात शुल्क काढून टाकण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, विशेष करून पादत्राणे क्षेत्रात उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष पॅकेज सादर करण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये उत्पादकता, गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी 4 लाख कोटींची उलाढाल करण्यावर, 1.1 लाख कोटी रुपये मूल्यांची निर्यात करण्यावर तसेच 22 लाख नोकऱ्या निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला समर्थन देण्यासाठी, गुंतवणूक आणि उलाढालीच्या वर्गीकरण मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत, तसेच सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पत हमी संरक्षण दुप्पट करून 10 कोटी रुपये करण्यात आले आहे. यामुळे पाच वर्षांत अतिरिक्त 1.5 लाख कोटी रुपये कर्ज देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. सूक्ष्म-उद्योगांसाठी सानुकूल आर्थिक साहाय्य सोबतच कस्टमाइज्ड क्रेडिट कार्ड आणि अनुसूचित जाती/ जमातीतील महिला उद्योजकांना पाठिंबा यामुळे समावेशक वाढीला आणखी चालना मिळेल. क्षेत्रीय आणि मंत्रालयस्तरीय लक्ष्यांसह निर्यात प्रोत्साहन अभियान देखील सुरू केले जाईल, सोबतच आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्तपुरवठा यासाठी एक एकीकृत व्यासपीठ, भारतट्रेडनेट (बीटीएन) स्थापन केले जाईल.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2100308)
Visitor Counter : 32