ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे : महासंचालक, भारतीय मानक ब्यूरो
भारतीय मानक ब्यूरोने आयोजित केले आरोग्यसेवा क्षेत्रासाठीचे वार्षिक अधिवेशन
Posted On:
04 FEB 2025 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025
नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे असे भारतीय मानक ब्यूरोचे महासंचालक, प्रमोद कुमार तिवारी यांनी म्हटले आहे. आरोग्यसेवा क्षेत्रासाठीच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाअंतर्गत भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने, नॉयडा येथील त्यांच्या राष्ट्रीय मानकीकरण प्रशिक्षण संस्थेत आरोग्यसेवा क्षेत्रातील शैक्षणिक संस्था, संशोधन आणि विकास संस्थांचे अधिष्ठाते आणि विभाग प्रमुखांसाठी वार्षिक अधिवेशन आयोजित केले होते. शैक्षणिक आणि संशोधन संस्थांसोबत आतापर्यंत आयोजित केलेल्या सर्व अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारचे आरोग्यसेवा क्षेत्रावर आधारित अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात 28 संस्थांमधील सुमारे 36 मान्यवर उपस्थित होते, यामध्ये संस्थांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक सदस्य आणि संशोधन संस्थांचे तज्ञ यांचा समावेश होता.
आरोग्यसेवा आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रात मानकीकरणाबाबत जागरूकता वाढवणे आणि या क्षेत्रात भारतीय मानक ब्युरोचे कार्यक्षेत्र अधिक विस्तारण्यासाठी शैक्षणिक आणि संशोधन संस्थांसोबत सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी संधींचा शोध घेणे हा या अधिवेशनाचा उद्देश होता.
मनोज तिवारी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील भारताचा उत्पादकतेचा पाया भक्कम करण्यावर त्यांनी भर दिला. शैक्षणिक संस्थांमध्ये मानकीकरणाच्या क्षेत्रातील अध्यक्षांची नियुक्ती करणे आणि सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याबाबत तिवारी यांनी उपस्थितांना माहिती दिली.
भारतीय मानक ब्युरो, शिक्षणाच्या विविध शाखेतील संस्थांमध्ये अभिमुखता कार्यक्रम आणि अनेक विषयांमधील वार्षिक अधिवेशने आयोजित करते अशी माहिती त्यांनी दिली. तज्ञांनी भारतीय मानक ब्युरोच्या तांत्रिक समितीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, संशोधन आणि विकास प्रकल्पांमध्ये सहभागी व्हावे आणि शिक्षणाला अधिक उंचीवर नेण्यासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये मानकांचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.
वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत मानकांच्या निर्मितीबरोबरच काळाच्या गरजेनुसार कालसुसंगत मानके निर्माण करण्याला प्राधान्य द्यावे असे वैज्ञानिक-जी आणि डीडीजी (आंतरराष्ट्रीय संबंध) चंदन बहल, यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना अद्ययावत तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती अवगत असल्याने या संस्था या क्षेत्रातील महत्वपूर्ण भागीदार असल्याचे असल्याचे ते म्हणाले.
वैज्ञानिक-ई आणि प्रमुख (वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णालय नियोजन विभाग) चिन्मय द्विवेदी, यांनी उपस्थितांना भारतीय मानक ब्युरोमधील आरोग्य सेवा क्षेत्रातील मानके निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली. तर आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जैवतंत्रज्ञान आणि जैववैद्यकीय अभियांत्रिकी या शैक्षणिक क्षेत्रातील तांत्रिक संकल्पनांवर आधारित आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या मानकांची माहिती दिली.
* * *
JPS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2099552)
Visitor Counter : 24