वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल 27-28 जानेवारी 2025 रोजी ओमान दौऱ्यावर
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2025 3:09PM by PIB Mumbai
भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल 27-28 जानेवारी 2025 रोजी मस्कत, ओमान येथे होणाऱ्या 11व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत (जेसीएम) सहभागी होणार आहेत. या बैठकीत ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहिम कैस बिन मोहम्मद बिन मूसा अल-यूसुफ यांच्यासोबत चर्चा होईल. ओमान हा भारताचा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) मधील महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. तसेच 2023-2024 मध्ये भारत-ओमान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सुमारे 8.94 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे.
या भेटीदरम्यान, दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यावर व्यापक चर्चा होणार आहे. भारत-ओमान व्यापक आर्थिक भागीदारी कराराची (सीईपीए) चर्चा प्रगत स्तरावर पोहोचली आहे. त्याला या भेटीदरम्यान आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. हा करार वाणिज्यदृष्ट्या महत्त्वाचा, संतुलित, न्याय्य, महत्त्वाकांक्षी आणि परस्पर फायदेशीर असेल, अशी अपेक्षा आहे.
गोयल यांच्यासोबत एक व्यापारी प्रतिनिधीमंडळ देखील असेल, जे एफआयसीसीआय आणि ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्यातील संयुक्त व्यवसाय परिषदेच्या बैठकीत सहभागी होईल. तसेच, मंत्री महामहिम सुलतान बिन सलीम अल हब्सी (वित्त मंत्री आणि सीईपीए मंत्रीमंडळ समितीचे अध्यक्ष) व महामहिम शेख डॉ. अली बिन मसूद अल सुनैदी (अध्यक्ष, सार्वजनिक प्राधिकरण विशेष आर्थिक क्षेत्र व मुक्त क्षेत्र - ओपीएझेड) यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करतील. याशिवाय, ओमानमधील उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी आणि तेथील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधतील.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2096548)
आगंतुक पटल : 60