युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा सत्कार, दिव्यांग खेळाडूंना केंद्र सरकारच्या पूर्ण पाठबळाचे डॉ. मनसुख मांडविया यांचे आश्वासन

Posted On: 24 JAN 2025 3:58PM by PIB Mumbai

 

श्रीलंकेतील कोलंबो इथे झालेल्या दिव्यांग क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावल्याबद्दल केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा सत्कार केला. भारताच्या संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले असाधारण कौशल्य आणि लवचिकतेचे दर्शन घडवत इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद पटकावलं.

भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषद (DCCI) आणि स्वयंम ही दिव्यांगासाठी काम करणारी संस्था यांचे पाठबळ लाभलेल्या भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा आज भारतीय क्रीडा प्राधिकरण इथे सत्कार करण्यात आला.

यानिमीत्ताने झालेल्या कार्यक्रमाला डॉ. मांडविया यांनी संबोधित केले. त्यांनी आपल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक क्रीडा सहभागाच्या दृष्टीकोनाविषयी सांगितले. दिव्यांग खेळाडूंना पाठबळ देण्याप्रती केंद्र सरकार वचनबद्ध असल्याबाबतही त्यांनी सर्वांना आश्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग खेळाडूंप्रती बांधिलकीचे वचन दिले आहे, तुम्ही दिव्यांग व्यक्ती आहात, म्हणून तुम्ही देशाचा गौरव वाढवू शकत नाही, असा त्याचा अर्थ होत नाही असे ठाम मतही मांडविया यांनी यावेळी व्यक्त केले. तुम्ही मिळवलेला विजयही त्याचीच साक्ष देत आहे असे ते म्हणाले. भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाने, संघ निवडीच्या खडतर प्रक्रियेपासून ते श्रीलंकेतील कामगिरीपर्यंत दाखवलेल्या जिद्दीतून या संघाची अफाट क्षमता ठळकपणे दिसते असे ते म्हणाले. स्पर्धेतील सहापैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवणे, आणि तो मिळवताना इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या संघांना पराभूत करणे ही काही छोटी कामगिरी  नाही अशा शब्दांत मांडविया या या संघाच्या स्पर्धेतल्या कामगिरीचा गौरव केला.

पॅरिस पॅरालिम्पिकपासून ते दिव्यांग क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्यंत देशातल्या दिव्यांग खेळाडूंनी, भारतासाठी वाढते यश नोंदवणाऱ्या केलेल्या कामगिरीचाही मांडविया यांनी यावेळी उल्लेख केला. आपले दिव्यांग खेळाडू देशाला अभिमानास्पद कामगिरी  करत  आहेत, आणि अशा कामगिरीतून ते त्यांना पाठबळ देणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रेरित करत आहेत असेही मांडविया यावेळी म्हणाले. हे सरकार सर्व दिव्यांग खेळाडूंच्या सोबत असल्याबाबतही त्यांनी आश्वस्त केले. सर्व दिव्यांग खेळाडूंनी आपल्या यशाचा उपयोग करत विविध व्यासपीठांच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना प्रेरणा द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2095864) Visitor Counter : 21