ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्र सरकारने 'वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता' वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम केले अधिसूचित
उद्योगांना अनुपालनासाठी पुरेसा कालावधी देत नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार
दुर्घटना आणि रस्त्यांची दूरवस्था रोखण्यासाठी वाहतूक नियमपालन अनुप्रयोगांसाठी सत्यापित आणि मुद्रांकित रडार उपकरणे अत्यंत महत्त्वाची
Posted On:
23 JAN 2025 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वैध मापनपद्धती विभागाने 'वाहनांचा वेग मोजण्यासाठीच्या रडार साधनांकरिता' वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत नियम अधिसूचित केले आहेत. उद्योगांना अनुपालनासाठी पुरेसा कालावधी देत हे नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत.
मसुदा नियम तयार करण्यासाठी, रांची येथील भारतीय वैध मापन विज्ञान संस्थेच्या (आयआयएलएम) संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने ओआयएमएल (आंतरराष्ट्रीय वैध माप विज्ञान संस्था) नियम 91 वर आधारित प्रारंभिक मसुदा सादर केला. नियमांच्या आवश्यकता स्पष्ट करण्यासाठी राज्य वैध मापन विज्ञान विभाग, आरआरएसएल म्हणजे क्षेत्रीय निर्देश मानक प्रयोगशाळांचे अधिकारी, उत्पादक आणि व्हिसीओ यांच्यासाठी मसुदा नियमांचे सादरीकरण करण्यात आले.
वैध मापनपद्धती (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी ते सार्वजनिक सल्लामसलतीसाठी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. भागधारकांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून त्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले.
मानवी संरक्षणासाठी अचूकतेची सुनिश्चितता करण्याकरिता अशा सर्व उपक्रमांची पडताळणी केली जाईल आणि ती सत्यापित केली जातील, अशी तरतूद या नियमांमध्ये आहे. नियमांमुळे वेग, अंतर आणि इतर संबंधित निकषांचे अचूक मोजमापदेखील सुनिश्चित होईल. सत्यापित रडार स्पीड गन वाहनांचा वेग अचूकपणे मोजतील, उल्लंघने ओळखतील आणि वाहतूक कायदे प्रभावीपणे अमलात आणतील त्यामुळे अंमलबजावणीत सुधारणा होईल आणि लोकांना फायदा होईल.
सत्यापित रडार उपकरणे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेग मर्यादा प्रभावीपणे मोजण्यास मदत करतील. त्यामुळे वाहतूक नियमपालनात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रभाव आणि विश्वासार्हता लक्षणीयरीत्या वाढेल. वाहनांच्या वेगाचे मोजमाप करण्यासाठी सत्यापित आणि मुद्रांकित रडार उपकरणे अपघात, रस्त्यांची दुरवस्था इत्यादी रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
वेग मोजण्याचे उपकरण हे वाहनाला दोन ठिकाणांमधला प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ शोधून किंवा रडार, लेजर किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर करून कालांतराने स्थितीत होणारे बदल मोजून काम करतात. रडार उपकरणे रेडिओ लहरी उत्सर्जित करतात ज्या चालत्या वाहनांवरून उत्पतित होतात, डॉपलर इफेक्टच्या आधारे वेग मोजतात. या सर्व पद्धती अचूक आणि विश्वासार्ह असल्याची सुनिश्चिती अचूक अंशाकनावर (कॅलिब्रेशन) अवलंबून असते. आधुनिक रडार प्रणाली अत्यंत अचूक आहेत, एकाच वेळी अनेक वाहनांचा वेग मोजू शकतात आणि अनेकदा स्वयंचलित लक्ष्य माग घेण्यासारखी वैशिष्ट्ये त्यात समाविष्ट असतात. योग्य अंशाकन, उपकरण विश्वसनीय आणि अचूक गती मोजत असल्याची सुनिश्चिती करते.
* * *
S.Patil/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2095574)
Visitor Counter : 19