आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
एचआयव्ही विरोधात दौड: राष्ट्रीय रेड रन 2.0 मध्ये देशभरातील सुमारे 150 धावपटूंचा सहभाग
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पणजीतील मिरामार येथे दौडीला दाखवला हिरवा झेंडा
Posted On:
18 JAN 2025 4:53PM by PIB Mumbai
पणजीच्या मिरामार येथे आज झालेल्या राष्ट्रीय रेड रन 2.0 या दौडीत देशभरातील सुमारे दीडशे धावपटू सहभागी झाले होते. राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्था (नाको) आणि गोवा राज्य एडस नियंत्रण सोसायटी (जीएसएसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ही दौड आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय नवीन आणि नविकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या 10 किलोमीटर अंतराच्या दौडीला हिरवा झेंडा दाखवला. खेळ आणि समूह सहभागाच्या माध्यमातून एचआयव्ही प्रतिबंधासाठी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याआधी आयोजित राज्यस्तरीय रेड रन स्पर्धामधील अव्वल दोन विजेते आजच्या राष्ट्रीय रेड रनमध्ये सहभागी झाले होते. पुरूष, महिला आणि ट्रान्सजेंडर गटातील धावपटूंनी यात सहभाग नोंदवला. पुरुष गटात केरळच्या नाबील साही यांनी प्रथम क्रमांक तर मेघालयच्या डॅनियल वाहलांग यांनी द्वितीय आणि स्खेमलांग शुभा यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
महिला गटात चंदीगडची श्रेया प्रथम, उत्तराखंडची अंजली दुसरी तर मध्य प्रदेशातील मनीषा तिसरी आली. ट्रान्सजेंडर गटात मणिपूरचे तनु थोस्कोम यांनी प्रथम, आंध्र प्रदेशातील एम नरेश यांनी द्वितीय तर महाराष्ट्रातील गार्गी चिखलकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकासाठी 50,000 रुपये रोख, द्वितीय क्रमांकांसाठी 35,000 रुपये रोख आणि तृतीय क्रमांकांसाठी 25,000 रोख रुपयांचे पुरस्कार देण्यात आले.
त्याचबरोबर 2 किलोमीटरच्या एकात्मता दौडीचे आयोजनही करण्यात आले होते. त्यात धोरणकर्ते, सरकार, प्रशासकीय सेवा, विविध समुदायांचे प्रतिनिधी, युवक, विकास भागीदार, दिव्यांग, संरक्षण क्षेत्राचे प्रतिनिधी, पोलीस आणि सामान्य जनता असे विविध पार्श्वभूमीचे नागरिक सहभागी झाले होते. सर्व सहभागांना प्रमाणपत्र आणि पदके देण्यात आली.
देशात अनेक लोक एड्सशी लढा देत आहेत आणि त्या लोकांप्रति ऐक्य दाखवण्यासाठी आणि हा आजार होणं म्हणजे कलंक ही समजूत खोडून काढण्यासाठी रेड रनचे आयोजन करण्यात आले होते, असे नाईक यावेळी म्हणाले. एड्स ही स्वतंत्र किंवा वैयक्तिक समस्या नाही. त्याचा परिणाम सर्वसाधारणपणे समाजावर होतो, असेही त्यांनी सांगितले.
म्हणूनच, आपल्याला यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वैद्यकीय संशोधन क्षेत्रात झालेल्या प्रगतीद्वारे आपण हे साध्य करू शकतो. “मी आपणा सर्वांना आवाहन करतो की, आपण समाजात आपापल्या परीने हा संदेश पसरवावा,” असे त्यांनी सांगितले.
सरकार एचआयव्ही नियंत्रणात निर्णायक भूमिका बजावू शकते, विशेषतः जर बाधित व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता पुढे येऊन सरकारी यंत्रणेत स्वतःची नोंदणी केली, तर या प्रयत्नांना अधिक प्रभावी बनवता येईल, असे त्यांनी नमूद केले.
राज्यसभेचे खासदार सदानंद तनवडे यांनी सांगितले की, केंद्र सरकार एचआयव्ही आणि एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. तथापि, या मोहिमेत प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्त्वाचा असून तोच सरकारी प्रयत्न यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरतो.
या कार्यक्रमात नॅकोच्या महासंचालक आणि भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आयएएस व्ही. हेकाली झिमोमी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव आयएएस निखील गजराज, तसेच जीएसएसीएसच्या प्रकल्प संचालक डॉ. ललिता उमरासकर उपस्थित होते. . याशिवाय, नॅको व जीएसएसीएसच्या इतर वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
2023 मध्ये गोव्यात राष्ट्रीय रेड रनची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे, देशभरात सुमारे 13,000 रेड रिबन क्लब (आरआरसी) स्थापन करण्यात आले आहेत. हे क्लब समाजात एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी जनजागृती करतात आणि तरुणांना एचआयव्ही, लैंगिक संक्रमित आजार (एसटीआय), तसेच अमली पदार्थांच्या गैरवापराबाबत माहिती व समज निर्माण करण्यासाठी मदत करतात.
इतक्या मोठ्या प्रमाणावर आरआरसी कार्यरत असल्याने, रेड रन हा उपक्रम युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. हा उपक्रम केवळ चुकीच्या समजुती दूर करण्यात मदत करत नाही, तर एचआयव्ही/एड्ससारख्या संवेदनशील विषयांवर खुल्या चर्चेसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करतो.
***
S.Kane/P.Jambhekar/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2094054)
Visitor Counter : 51