संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या  पार्श्वभूमीवर भारताचे आक्रमक  आणि बचावात्मक  प्रतिसाद  आणखी मजबूत करणे आवश्यक आहे: संरक्षण  मंत्री  राजनाथ सिंह

Posted On: 17 JAN 2025 2:46PM by PIB Mumbai

 

नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या  पार्श्वभूमीवर भारताचे आक्रमक  आणि बचावात्मक  प्रतिसाद  आणखी मजबूत करण्याची गरज संरक्षणमंत्री  राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली आहे. 17 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे 2024 हे नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना, संरक्षण मंत्र्यांनी  तणावपूर्ण भू-राजकीय सुरक्षा परिस्थितीमुळे सशस्त्र दलांसाठी गुंतागुंत वाढल्याचे अधोरेखित केले आणि लवकरात लवकर देशाची महत्वपूर्ण क्षमता वाढवण्यार भर दिला.

जर आपण संरक्षण आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण दशकाचे  मूल्यांकन केले, तर आपण असे म्हणू शकतो की हे  अस्थिर दशक राहिले आहे. जगभरातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये  संघर्ष आणि युद्धे सुरु असल्याचे आपण पाहत आहोत. या गोष्टी लक्षात घेऊन,आपल्या सुरक्षिततेसाठी नियोजन, संसाधन आणि खर्चाचा ताळमेळ आवश्यक आहे. सल्लामसलत  दृष्टिकोनाचा  अवलंब करण्याची गरज आहे. भविष्यातील आव्हानांना कसे सामोरे जायचे  याबद्दल सर्व संबंधितांकडून सूचना जाणून घेणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार आपले सैन्य सुसज्ज आणि तयार असायला हवे ” असे सांगत  राजनाथ सिंह म्हणाले, सशस्त्र दलांचा अविभाज्य भाग असलेले नागरी कर्मचारी, नियोजन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

सैन्य एक मोठा  जनादेश आणि जटिल संरचनेसह पुढे जात आहे आणि नागरी कर्मचारी "गणवेश नसलेले सैनिक" एक निर्णायक भूमिका बजावतात कारण ते सैन्याला महत्त्वपूर्ण शक्ती प्रदान करण्यासाठी पडद्यामागून काम करतात यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला . देशभक्ती, शौर्य आणि शिस्त सैनिकांना  धोके आणि आव्हानांपासून देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्यास मदत करतात आणि सुरक्षा विषयक पायाभूत सुविधांना अधिक बळ देण्यासाठी नागरी कर्मचाऱ्यांनी ही मूल्ये आत्मसात केली पाहिजेत, असे त्यांनी प्रतिपादन केले. "राष्ट्रीय सेवेच्या व्यापक दृष्टीकोनातून, प्रत्येक जबाबदार नागरिक हा गणवेश नसलेला सैनिक आहे  आणि प्रत्येक सैनिक हा गणवेशातील नागरिक आहे ," असे ते म्हणाले.

हिंद महासागर क्षेत्रातील भारताचे सामरिक स्थान आणि  भौगोलिक राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन  राजनाथ सिंह यांनी  नौदलाला बळकट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आणि  आजच्या काळाची ती गरज असल्याचे सांगितले.  माझगाव  डॉक लिमिटेडद्वारे  भारतात निर्मित आयएनएस सूरत, आयएनएस  निलगिरी आणि आयएनएस  वाघशीर या तीन जागतिक दर्जाच्या युद्धनौका नुकत्याच नौदलात दाखल झाल्याचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की सर्व हितधारकांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. या युद्धनौका  भारताच्या सक्षमीकरणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

"भारताची आर्थिक वृद्धी सागरी सुरक्षेशी निगडित आहे आणि म्हणूनच आपल्या सागरी हद्दीचे रक्षण करणे, जलवाहतुकीचे स्वातंत्र्य अबाधित राखणे, आणि सागरी महामार्ग असलेल्या सागरी मार्गांचे रक्षण करणे आवश्यक आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये मोठ्या नौदल शक्तींनी हिंद महासागर क्षेत्रातील आपले अस्तित्व कमी केले असून भारतीय नौदलाने त्यात वाढ केली आहे. एडनचे आखात, लाल समुद्र आणि पूर्व आफ्रिकी देशांच्या नजीकच्या सागरी क्षेत्रांत धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेता, भारतीय नौदल या भागात आपली उपस्थिती आणखी वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे,” असे संरक्षणमंत्री म्हणाले.

आजच्या काळात सायबर सुरक्षा हा सागरी सुरक्षेतील महत्वाचा पैलू असून सायबर हल्ल्यांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते, असे राजनाथ सिंग म्हणाले. सशस्त्र दलांमध्ये सायबर सुरक्षेसंदर्भात विशेष जनजागृती अभियान राबवण्यावर त्यांनी भर दिला.

देशासाठी सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानाची दखल घेण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. "कोणीच मागे राहू नये. याच भावनेतून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत आहोत. विशेषतः भारतीय नौदलाबद्दल सांगायचे झाले तर आम्ही नागरी आणि सेवेतील कर्मचाऱ्यांना समान प्राधान्य दिले आहे" असे त्यांनी सांगितले.

भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सुरु केलेल्या विविध उपक्रमांबद्दल राजनाथ सिंह यांनी माहिती दिली, या योजनांच्या माध्यमातून हे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना विमा सुरक्षा प्रदान करून त्यांचे आर्थिक हित जपले जाते, असे ते म्हणाले. सशस्त्र दलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, प्रत्येक भारतीय त्यांच्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले.

नौदलाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला अद्ययावत प्रगत तंत्रज्ञानाने अवगत करावे आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपल्यातील कौशल्यवृद्धी करावी, असे आवाहन त्यांनी केले. संयुक्त प्रयत्नांमुळे, आपले राष्ट्र भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम होईल आणि एक विकसित राष्ट्र बनू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी ‘नौदल कर्मचाऱ्यांचे वर्ष’ या अनुषंगाने हाती घेण्यात आलेले  विविध योजना आणि उपक्रमांवर प्रकाश टाकणारा लघुपट दाखवण्यात आला. या सोहळ्याला एक सांगीतिक साज चढवत भारतीय नौदलाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाला समर्पित  एक विशेष गीत यावेळी प्रसिद्ध करण्यात आले. या गीतामध्ये नौदलाच्या कर्मचाऱ्यांची निष्ठा, लवचिकता आणि कठोर परिश्रम तसेच नौदलाच्या मोहिमांसाठी ते करत असलेले अथक प्रयत्न शब्दबद्ध करण्यात आले आहेत. नौदलाच्या कर्मचाऱ्यांमधील काही जणांनी हे गाणे प्रत्यक्ष सादर केले. अत्यंत आशयघन गीत आणि भावपूर्ण संगीतामुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये अभिमान, एकात्मतेची भावना जागृत केली ज्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली.

***

S.Patil/S.Kane/B.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2093902) Visitor Counter : 24


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali