आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय रेड रन 2.0 साठी गोवा सज्ज, मिरामार येथे शनिवार 18 जानेवारी रोजी दौडचे आयोजन
Posted On:
16 JAN 2025 6:21PM by PIB Mumbai
पणजी, 16 जानेवारी 2025
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था(नॅको),गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या (जीएसएसीएस) सहयोगाने बहुप्रतिक्षीत नॅशनल रेड रन 2.0 आयोजित करत आहे. ही दौड शनिवार 18 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पणजीमधल्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर सुरू होईल.
पणजी येथे आज 16 जानेवारी 2025 रोजी आयोजित वार्ताहर परिषदेत जीएसएसीएसच्या प्रकल्प संचालक डॉ. ललिता उमरस्कर यांनी याबाबत माहिती दिली.एचआयव्ही प्रतिबंधाबद्दल खेळ आणि सामुदायिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात देशभरातील विविध राज्यांतील सहभागींसाठी 10 किमी धावण्याची स्पर्धा असेल. या स्पर्धेला पणजी शहरातील मिरामार सर्कल येथून सकाळी 6:30 वाजता सुरुवात होईल आणि सहभागी मिरामार सर्कल ते एनआयओ मार्गे दोना पावला आणि परत मिरामार सर्कलपर्यंतचा मार्ग पार करतील. जीएसएसीएसचे सहसंचालक उमाकांत सावंत हे देखील या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते.
यापूर्वी, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पुरूष, महिला आणि तृतीयपंथी श्रेणींमध्ये जिल्हा आणि राज्यस्तरीय रेड रनचे आयोजन केले होते. राज्यस्तरीय शर्यतीतील अव्वल दोन विजेते 10 किमी-राष्ट्रीय रेड रनमध्ये सहभागी होतील. या शर्यतीत तिन्ही श्रेणींमध्ये स्पर्धक सहभागी होतील.शर्यतीत पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे 50,000 रुपये, 35,000 रुपये आणि 25,000 रुपये रोख पारितोषिक मिळेल.
याव्यतिरिक्त, एचआयव्हीग्रस्तांना धीर दर्शवण्यासाठी धोरणकर्ते, सरकारचे प्रतिनिधी, नागरी समाज, विविध संस्था युवक, विकास भागीदार, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, संरक्षण, पोलिस आणि सामान्य नागरिक, अशा विविध घटकांमधील सहभागींसाठी 2 किमी एकता शर्यतीचेदेखील आयोजन केले जाईल. सर्व सहभागींना शर्यत पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि पदके दिली जातील.
या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. गोवा सरकारचे आरोग्य आणि नगरविकास मंत्री विश्वजित राणे हे सन्माननीय पाहुणे असतील.केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधले अनेक अधिकारी, नॅको आणि गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीमधील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
एचआयव्ही/एड्स नियंत्रणासंदर्भात समुदाय जनजागृतीसाठी आणि एचआयव्ही, एसटीआय आणि अमली पदार्थ दुष्परिणाम याबाबत माहिती घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मदत करण्यासाठी देशभरात सुमारे 13,000 रेड रिबन क्लब स्थापन करण्यात आले आहेत. देशभरात एवढ्या मोठ्या संख्येने असलेले रेड रिबन क्लब लक्षात घेऊन, एचआयव्ही/एड्स प्रतिबंधात तरुण पिढीच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, गैरसमज दूर करण्यासाठी आणि चर्चेसाठी सुरक्षित जागा प्रदान करण्यासाठी रेड रन हा उपक्रम आखण्यात आला आहे.
S.Patil/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2093508)
Visitor Counter : 21