सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने महाकुंभ -2025 मध्ये उभारलेल्या दैवी, भव्य आणि डिजिटल या संकल्पनेवर आधारित दालनाचे मंत्रालयाच्या सचिवांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
16 JAN 2025 1:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळा -2025 मध्ये नाग वासुकी, सेक्टर 07, कैलासपुरी मार्ग, (पश्चिमी पत्री), येथे उभारलेल्या दालनाचे काल दि. 15 जानेवारी 2025 रोजी मंत्रालयाचे सचिव अमित यादव यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी अमित यादव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समोरील आव्हाने, लाभ आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी मंत्रालयाच्या योजनांचा लाभ मिळालेल्या कारागिरांनी त्यांच्या यशोगाथा सांगितल्या. या यशोगाथांमधून ट्यूलिप (Traditional Artisans Upliftment Livelihood Programme - पारंपारिक कारागीर उत्थान उपजीविका कार्यक्रम) ब्रँडसारख्या उपक्रमांचा सकारात्मक प्रभावाचेही प्रतिबिंब उमटले होते. महाकुंभ-2025 मध्ये मंत्रालयाच्या अशा प्रकारच्या सहभागातून मंत्रालयाच्या प्रमुख योजना आणि उपक्रमांद्वारे सामाजिक उन्नतीस चालना देण्याची मंत्रालयाची वचनबद्धता देखील दिसून आली. मंत्रालयाने उभारलेल्या या दालनाची रचना ही दैवी, भव्य आणि डिजिटल या संकल्पनेवर आधारित, यातून पारंपारिक मूल्यांसह आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याप्रती मंत्रालयाची वचनबद्धताही प्रतिबिंबित होत आहे.
या दालनाच्या माध्यमातून उपेक्षित गटांना आर्थिक सहाय्य प्रदान करणार्या वंचित घटक समुह आणि वर्गांसाठी आर्थिक सहाय्य योजना (Vanchit Ikai Samooh aur Vargon ki Aarthik Sahayata Yojana- विस्वास ) आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या उपेक्षितांसाठी कौशल्य विकासावर भर देणारी प्रधानमंत्री -दक्ष योजना यांसह अनेक महत्त्वाच्या योजनांचा प्रचार प्रसार केला जात आहे. ज्येष्ठ नागरिक कल्याण योजना, नशामुक्त भारत अभियान आणि नमस्ते योजनेसह इतर योजना आणि उपक्रमांचाही या दालनातून प्रचार प्रसार केला जात असून, त्या माध्यमातून मेळ्याला भेट देणाऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.
या दालनाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल अभ्यागतांना माहिती देण्यासाठी संविधान टच-स्क्रीन फ्लिपबुक आहे. तसेच संस्मरणीय अनुभवासाठी एआय-सक्षम वैशिष्ट्यांसह एक डिजिटल सेल्फी पॉइंट आहे. दालनाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ट्यूलिप ब्रँड इनिशिएटिव्ह. या अंतर्गत लाभार्थी कारागिरांना, त्यांच्या हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री यासाठी स्टॉल वाटप करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंत्रालयाच्या विविध योजनांद्वारे पारंपरिक कारागिरांना आर्थिक समावेशनाच्या संधी प्रदान करून उन्नती साधण्यास त्यांना साहाय्य करतो.
एएलआयएमसीओ (आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) स्टॉल येणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या स्टॉलवर वृद्ध व्यक्तींना सहाय्यक उपकरणांचे मोफत वितरण करण्यासाठी टोकन दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना साहाय्य करण्याची मंत्रालयाची वचनबद्धता यातून व्यक्त होते. दैनंदिन सांस्कृतिक कार्यक्रम, उत्साहपूर्ण सादरीकरणे, तज्ज्ञांच्या चर्चा, संगीत कार्यक्रम आणि डिजिटल प्रदर्शने यामुळे हे दालन आकर्षक आणि माहितीपूर्ण झाले आहे. अभ्यागतांसाठी हा एक समृद्ध अनुभव ठरत आहे. दालनात प्रवेश विनामूल्य असल्यामुळे जास्तीत जास्त सहभागाला चालना मिळत आहे.
महाकुंभ-2025 मध्ये मंत्रालयाचा सहभाग, आपल्या योजना विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याची तीव्र इच्छाशक्ती प्रकट करणारा आहे. देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातून येणाऱ्या भाविकांसमोर, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाप्रति मंत्रालयाची समर्पण भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ हे दालन पुरवत आहे.
S.Kane/S.Kakade/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2093311)
Visitor Counter : 34