पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक निखिल कामत यांच्यासोबत साधला संवाद

Posted On: 10 JAN 2025 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक आणि गुंतवणूकदार निखिल कामत यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. अतिशय मोकळेपणाने झालेल्या या संवादात त्यांना त्यांच्या बालपणाबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या काळातील अनुभव आणि उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या छोट्याशा शहराशी त्यांचे फार पूर्वीपासून असलेले संबंध अधोरेखित केले.. त्यांनी नमूद केले की, गायकवाड राज्यातील वडनगर हे गाव तलाव, पोस्ट ऑफिस आणि लायब्ररी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांसह शिक्षणाच्या बांधिलकीसाठी ओळखले जात होते. गायकवाड राज्य प्राथमिक शाळा आणि भागवताचार्य नारायणाचार्य हायस्कूलमधील शालेय दिवसांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. वडनगरमध्ये बराच काळ व्यतीत करणारा चिनी तत्ववेत्ता झुआंगझांग यांच्यावरील चित्रपटाबद्दल त्यांनी एकदा चिनी दूतावासाला कसे लिहिले याची एक मनोरंजक कथा त्यांनी सामाईक केली. त्यांनी 2014 मध्ये आलेल्या एका अनुभवाचाही उल्लेख केला, ज्यावेळी ते भारताचे पंतप्रधान झाले आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झु आंग झांग आणि त्यांच्या दोन मूळ शहरांमधील ऐतिहासिक संबंधाचा हवाला देत गुजरात आणि वडनगरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की हे बंध दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि मजबूत संबंधांना अधोरेखित करत आहेत.

आपल्या विद्यार्थी जीवनाविषयी सांगताना मोदी यांनी स्वत:चे एक सरासरी विद्यार्थी म्हणून वर्णन केले ज्याची विशेष दखल घेतली गेली नाही. त्यांनी त्यांचे शिक्षक वेलजीभाई चौधरी यांचा उल्लेख केला, ज्यांनी त्यांच्यामध्ये भरपूर क्षमता पाहिली आणि अनेकदा मोदींच्या वडिलांकडे त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. वेलजीभाईंच्या असे लक्षात आले की, मोदी यांची आकलनक्षमता चांगली असल्याने त्यांना विषय लवकर समजायचे मात्र, नंतर ते त्यांच्याच विश्वात हरवून गेले. त्यांच्या शिक्षकांना आपल्याविषयी खूपच जिव्हाळा होता, मात्र त्यांना स्वतःला कोणत्याही स्पर्धेत रस नव्हता. जास्त आटापिटा न करता परीक्षा उत्तीर्ण होण्याला त्यांनी प्राधान्य दिले आणि त्यांचा ओढा विविध गोष्टी करण्याकडे होता.  नव्या गोष्टी लवकरात लवकर आत्मसात करायच्या आणि नवनव्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे, अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव असल्यावर त्यांनी भर दिला. 

पंतप्रधानांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवन प्रवासाच्या आठवणी सामाईक केल्या ज्यावेळी त्यांनी अगदी तरुण वयात घर सोडले आणि आपले कुटुंबीय आणि मित्रांसोबत कोणताही संपर्क ठेवला नाही. ज्यावेळी ते मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांच्या मनात काही इच्छा होत्या त्यापैकी काही म्हणजे पुन्हा एकदा जुन्या वर्गमित्रांची भेट घेण्याची त्यांना इच्छा होती आणि त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी 30-35 मित्रांना आमंत्रित केले. पण त्यावेळी त्या मित्रांनी त्यांना जुना मित्र मानण्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले. पंतप्रधानांनी असे देखील व्यक्त केले की त्यांना त्यांच्या शिक्षकांचा सार्वजनिक सत्कार करायचा होता ज्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी योगदान दिले होते. त्यांनी त्यांचे सर्वाधिक वयोवृद्ध शिक्षक जे त्यावेळी सुमारे 93 वर्षांचे होते त्यांच्यासह सुमारे 30-32 शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला राज्यपाल आणि गुजरातमधील इतर मान्यवर  उपस्थित होते. त्याशिवाय त्यांनी त्यांच्या विस्तारित कुटुंबाला मुख्यमंत्री निवासस्थानी आमंत्रित केले आणि त्यांची एकमेकांना ओळख करून दिली. आरएसएस मधील त्यांच्या सुरुवातीच्या काळात ज्या कुटुंबांनी त्यांना जेवण दिले होते त्यांना देखील आमंत्रित केले. हे चार कार्यक्रम त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे कार्यक्रम होते,  ज्यातून त्यांची कृतज्ञता आणि  आपल्या मुळांशी जोडले राहण्याची इच्छा प्रदर्शित होते.

पंतप्रधानांनी नमूद केले की त्यांनी कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वज्ञानाचे पालन केले नाही आणि जास्त गुणांसाठी प्रयत्न न करता परीक्षा उत्तीर्ण होण्यात ते समाधानी असायचे. विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याकडे, फारशी तयारी न करता नाटकासारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा आपला कल पंतप्रधानांनी नमूद केला. त्यांनी त्यांचे शारीरिक प्रशिक्षण शिक्षक परमार यांच्याबद्दल एक कथा सांगितली, ज्यांनी त्यांना नियमितपणे मल्लखांब आणि कुस्तीचा सराव करण्यास प्रेरित केले. मात्र, बरेच प्रयत्न करूनही ते व्यावसायिक खेळाडू बनू शकले नाही आणि अखेरीस त्यांनी असे उपक्रम बंद केले.

ज्यावेळी त्यांना असे विचारले की राजकारणातील एखाद्या राजकारण्यामध्ये कोणती गोष्ट म्हणजे त्याची प्रतिभा मानता येईल, तेव्हा मोदी यांनी उत्तर दिले की राजकारणी बनणे आणि राजकारणात यशस्वी बनणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समर्पितता, बांधिलकी आणि लोकांची सुखदुःखे याविषयी आपुलकी या गोष्टी राजकारणात यश मिळवण्यासाठी अत्यावश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले. एक वर्चस्ववादी नेता बनण्यापेक्षा संघभावना असलेला खेळाडू बनण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे उदाहरण दिले, ज्यामध्ये अनेक जणांनी स्वातंत्र्यासाठी राजकारणात प्रवेश न करताही मोलाचे योगदान दिले. स्वातंत्र्योत्तर काळातील नेते स्वातंत्र्यलढ्यातून समाजाप्रती असलेल्या समर्पणाच्या खोल भावनेने उदयाला आले यावर त्यांनी भर दिला. "चांगल्या लोकांनी राजकारणात महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येय घेऊन येत राहावे" यावर  मोदी यांनी भर दिला. महात्मा गांधींचे उदाहरण देत मोदी म्हणाले की गांधीजींचे जीवन आणि कृती खूप काही सांगतात आणि संपूर्ण देशाला प्रेरणा देतात.

प्रभावी भाषणांपेक्षा प्रभावी संवाद महत्त्वाचा आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी गांधीजींच्या कृती आणि प्रतीकांद्वारे शक्तिशाली संदेश देण्याची क्षमता अधोरेखित केली.अहिंसेचा पुरस्कार करताना उंच काठी बाळगण्याच्या विरोधाभासाकडे त्यांनी निर्देश केला. राजकारणात खरे यश केवळ व्यावसायिक कौशल्ये किंवा वक्तृत्वावर अवलंबून राहण्याऐवजी समर्पणाचे जीवन आणि प्रभावी संवादातून मिळते यावर पंतप्रधानांनी भर दिला.

मोदी यांनी एक लाख तरुणांनी महत्त्वाकांक्षेपेक्षा ध्येयाने प्रेरित दृष्टिकोनाने राजकारणात येण्याच्या आवश्यकतेचा पुनरुच्चार केला. उद्योजकांनी विकासावर लक्ष केंद्रित केले असले तरी राजकारणात स्वार्थत्याग आणि राष्ट्राला प्रथम स्थान देणे आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले. जे लोक राष्ट्राला प्राधान्य देतात त्यांना समाज स्वीकारतो आणि राजकीय जीवन सोपे नसते यावर त्यांनी भर दिला. राजकारणातील जीवन सोपे नव्हते असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी अतिशय समर्पित कार्यकर्ते आणि अनेक वेळा मंत्री होऊनही साधे जीवन जगणाऱ्या अशोक भट्ट यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, अशोक भट्ट नेहमीच म्हणजे अगदी रात्रीच्या वेळीही मदतीसाठी उपलब्ध असत आणि वैयक्तिक स्वार्थाशिवाय सेवाभावी जीवन जगले. हे उदाहरण राजकारणात समर्पण आणि निस्वार्थीपणाचे महत्त्व अधोरेखित करते. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की राजकारण म्हणजे केवळ निवडणुका लढवणे नाही तर सामान्य लोकांची मने जिंकणे आहे, ज्यासाठी एखाद्याला त्यांच्यामध्ये राहावे लागते आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले असले पाहिजे.

“माझे आयुष्यच माझे सर्वात मोठे शिक्षक आहेत,” असे मोदी यांनी सांगितले. जीवनाला परिस्थिती कशा प्रकारे आकार देते, असे विचारल्यावर सांगितले. "प्रतिकूलतेचे विद्यापीठ" असे आपल्या आव्हानात्मक बालपणाचा उल्लेख केल्याचा संदर्भ देत परिस्थिती कशा प्रकारे जीवनाला आकार देते असा प्रश्न विचारल्यावर मोदी यांनी हे उत्तर दिले.

आपल्या राज्यातील महिलांना पाणी आणण्यासाठी काही किलोमीटर पायपीट करण्याचा संघर्ष करावा लागत असल्याचे पाहिल्यावर स्वातंत्र्यानंतर त्यांना पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांना प्रेरणा मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोणत्याही योजनांवर आपली मालकी नसल्याचे सांगत देशाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित करत असल्यावर त्यांनी भर दिला. स्वतः मुख्यमंत्री असल्यापासून त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या, अथक प्रयत्न करत रहा, वैयक्तिक स्वार्थ पाहू नका आणि जाणीवपूर्वक चुका करू नका या सिद्धांताची त्यांनी माहिती दिली. चुका मानवी असतात हे त्यांनी मान्य केले पण चांगल्या हेतून काम करण्याची बांधिलकी ठेवण्यावर त्यांनी भर दिला. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या भाषणाची त्यांनी आठवण करून दिली. आपण कष्टांपासून मागे हटणार नाही, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतीही गोष्ट करणार नाही आणि वाईट हेतूने चुका करणार नाही  हे तीन सिद्धांत त्यांनी सांगितले आणि हेच आपल्या जीवनाचे तीन मंत्र असल्याचे स्पष्ट केले.

विचारसरणी आणि आदर्शवादाचे महत्त्व सांगताना पंतप्रधानांनी यावर भर दिला की राष्ट्र प्रथम हा नेहमीच त्यांचा मार्गदर्शक सिद्धांत राहिलेला आहे. विचारसरणी पारंपरिक आणि वैचारिक सीमा ओलांडते, ज्यामुळे त्यांना नवीन कल्पना स्वीकारण्याची आणि राष्ट्राच्या हितासाठी  जुन्या कल्पनांचा त्याग करण्याची प्रेरणा मिळते. राष्ट्र प्रथम हा त्यांचा अढळ सिद्धांत आहे, असे त्यांनी नमूद केले. परिणामकारक राजकारणात विचारसरणीपेक्षा आदर्शवादाचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. विचारसरणी गरजेची आहेच, पण अर्थपूर्ण राजकीय प्रभावासाठी आदर्शवाद महत्त्वाचा ठरतो, असे त्यांनी नमूद केले. यासाठी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा दाखला दिला, जिथे विविध प्रकारच्या विचारसरणी स्वातंत्र्य या एकमेव उद्देशाने एकत्र आल्या होत्या.

सार्वजनिक जीवनातील ट्रोल आणि नको असलेल्या टीकेला तरुण राजकारण्यांनी कसे सामोरे जावे, या प्रश्नाला उत्तर देताना, ज्यांना इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो, अशा संवेदनशील व्यक्तींची राजकारणात गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. लोकशाहीत आरोप-प्रत्यारोप स्वीकारलेच पाहिजेत, पण जर कोणी बरोबर असेल आणि त्याने चुकीचे काहीच केले नसेल ,तर काळजी करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

सोशल मीडिया -पूर्व आणि सोशल मिडिया-पश्चात राजकारण आणि त्याचा राजकारण्यांवर होणारा परिणाम आणि तरुण राजकारण्यांना सोशल मीडियाचा वापर करण्याचा सल्ला, या विषयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांबरोबरच्या आपल्या संवादाचा एक विनोदी किस्सा सांगितला, जेव्हा त्यांनी असे विचारले होते, की टीव्हीवर असताना टीका सहन करताना त्यांना कसे वाटते?

अपमानाने विचलित न होणार्‍या एका व्यक्तीची गोष्ट आठवून ते म्हणाले की, जोपर्यंत माणूस सत्यवादी आहे आणि त्याचा विवेक अबाधित आहे, तोपर्यंत टीकेची चिंता करण्याची गरज नाही. आपणही अशीच मानसिकता स्वीकारली असून, आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले आहे, आणि सत्यावर ठाम राहिले आहे,राहिलो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. सार्वजनिक जीवनात संवेदनशीलतेच्या गरजेवर भर देत, त्याशिवाय खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करता येणार नाही, असे ते म्हणाले. राजकारण आणि कामाच्या ठिकाणांसह प्रत्येक क्षेत्रात टीका आणि मतभेद ही सामान्य गोष्ट आहेत, आपण ते स्वीकारायला हवे, आणि त्यामधून मार्ग काढायला हवा, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी लोकशाहीतील सोशल मीडियाच्या परिवर्तनकारी शक्तीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, पूर्वी मोजक्याच स्रोतांकडून माहिती दिली जात होती, परंतु आता लोक विविध माध्यमांद्वारे सहजपणे वस्तुस्थितीची पडताळणी करू शकतात. "सोशल मीडिया लोकशाहीसाठी एक महत्वाचे साधन बनले आहे, ज्यामुळे लोकांना सत्य आणि माहितीची पडताळणी करता येते,” पंतप्रधान मोदी म्हणाले. आजची तरुणाई सोशल मीडियावर, विशेषत: अंतराळ संशोधनासारख्या क्षेत्रात सक्रियपणे माहितीची पडताळणी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, 'चांद्रयान’च्या यशामुळे तरुणांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाली, जे गगनयान मोहिमेसारख्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. "सोशल मीडिया हे नवीन पिढीसाठी एक शक्तिशाली साधन आहे", असे सांगून पंतप्रधानांनी सोशल मीडियाच्या उपयुक्ततेला दुजोरा दिला. राजकारणातील आपल्या सुरुवातीच्या दिवसांविषयी बोलताना ते म्हणाले की, सोशल मीडियाच्या आगमनापूर्वी देखील टीका आणि निराधार आरोप ही सामान्य गोष्ट होती. मात्र, आज विविध व्यासपीठांची उपलब्धता सत्यशोधन आणि पडताळणीसाठी व्यापक  साधने उपलब्ध करून देते, असेही ते म्हणाले. सोशल मीडिया लोकशाही आणि युवा पिढीला सक्षम बनवून समाजासाठी एक मोलाचा स्रोत निर्माण करू शकतो यावर त्यांनी भर दिला.

चिंतेच्या विषयावर बोलताना, हा अनुभव आपल्यासह सर्वांनाच येतो, असे ते म्हणाले. चिंतेचे व्यवस्थापन करण्याची प्रत्येक व्यक्तीची क्षमता भिन्न असते आणि ती हाताळण्याची प्रत्येक व्यक्तीची स्वतःची शैली असते असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी 2002 च्या गुजरात निवडणुका आणि गोध्रा घटनेसह वैयक्तिक अनुभव सांगताना, आव्हानात्मक काळात त्यांनी आपल्या भावना आणि जबाबदाऱ्या कशा हाताळल्या यावर प्रकाश टाकला. नैसर्गिक मानवी प्रवृत्तींच्या पलीकडे राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी अनावश्यक दडपण न घेता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून परीक्षेला सामोरे जावे, आणि  तो आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, असे मानावे असे त्यांनी सांगितले.

अत्यंत कठीण परिस्थितीत अती विचार न करण्याबद्दल आपला दृष्टिकोन मांडताना, मोदी म्हणाले की, त्यांनी कधीही आपल्या सध्याच्या पदावर पोहोचण्याच्या दृष्टीने आपल्या प्रवासाचे नियोजन केले नाही, आणि नेहमीच आपल्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी कधीही यश अथवा अपयशाच्या विचारांना आपल्या मनावर अधिराज्य गाजवू दिले नाही, असे ते म्हणाले.

अपयशातून धडा घेण्याविषयी बोलताना पंतप्रधानांनी चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणामधील अपयशावर प्रकाश टाकला, जिथे त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि शास्त्रज्ञांना आशावादी राहण्यासाठी प्रेरणा दिली. राजकारणात जोखीम पत्करणे, युवा नेत्यांना पाठबळ देणे आणि त्यांना देशासाठी काम करण्याचे प्रोत्साहन देणे, याच्या महत्वावर त्यांनी जोर दिला.

राजकारणाला प्रतिष्ठा देणे आणि चांगल्या लोकांना त्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे हे राजकारणाच्या उदात्तीकरणासाठी गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. युवा नेत्यांनी अज्ञाताच्या भीतीवर मात करावी असे आवाहन करून, भारताच्या भविष्याचे यश त्यांच्याच हातात आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. युवकांनी वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे, तर देशासाठी काम करावे, आणि लोकशाहीची प्रतिष्ठा अबाधित ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

राजकारण ही 'घाणेरडी जागा' असल्याच्या समजुतीबद्दल बोलताना, राजकारण म्हणजे केवळ निवडणुका आणि जिंकणे किंवा हरणे नसून, त्यामध्ये धोरण-निर्मिती आणि प्रशासन देखील समाविष्ट आहे, जे महत्वाचे बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे, यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. बदलत्या परिस्थितीत चांगल्या धोरणांचे आणि त्यांच्या अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित करताना, मोदी यांनी पीएम जनमन (PM JANMAN) योजनेचे उदाहरण दिले, जी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत वंचित आदिवासी समुदायांना आधार देण्यासाठी विकसित केलेली योजना आहे. या उपक्रमाचा राजकीय फायदा होणार नसला तरी 250 ठिकाणच्या 25 लाख जनतेच्या जीवनावर त्याचा खोलवर प्रभाव पडल्याचे त्यांनी नमूद केले. राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, तर भरीव सकारात्मक बदल घडू शकतात, समाधान आणि परिपूर्णतेची भावना निर्माण होऊ शकते, यावर त्यांनी भर दिला.

मोदी यांनी आपले अनुभव सांगितले, लष्करी शाळेत प्रवेश घेण्याची आपली लहानपणापासूनची इच्छा सांगितली, जी आर्थिक अडचणींमुळे पूर्ण होऊ शकली नाही. रामकृष्ण मिशनमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करूनही मठाधीश जीवन जगण्याची अपूर्ण राहिलेली आपली इच्छाही त्यांनी सांगितली. अपयश हा जीवनाचा एक भाग आहे, आणि वैयक्तिक विकासात ते महत्वाचे योगदान देते, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. त्यांनी आरएसएसमध्ये असतानाचा एक प्रसंग सांगितला, जेव्हा वाहन चालवताना झालेल्या चुकीमधून ते शिकले. अपयशातून शिकण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

ते म्हणाले की, आपण नेहमीच आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर राहिलो, ज्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आकाराला आला. प्रगतीसाठी कम्फर्ट झोन टाळणे आवश्यक आहे आणि यश मिळविण्यासाठी जोखीम घेणे महत्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. आरामामुळे आपले अंतिम ध्येय गाठताना अडथळा येऊ शकतो, आणि प्रगतीसाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

आपली जोखीम घेण्याची क्षमता आणि काळानुरूप ती कशी विकसित झाली यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांची जोखीम घेण्याची क्षमता अफाट आहे, कारण त्यांनी वैयक्तिक लाभला कधीच प्राधान्य दिले नाही, आणि या निर्भीड वृत्तीमुळेच ते कोणताही निर्णय घेताना कचरत नाहीत.

ते म्हणाले की, आपण एकांतवासात स्वत: शी संपर्क साधायचो. 1980 च्या दशकात वाळवंटात राहण्याचा आपला असाच एक अनुभव त्यांनी सांगितला, जिथे त्यांच्यामध्ये आध्यात्मिक जाणीव निर्माण झाली. यामधूनच आपल्याला रण महोत्सवाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळाली, जो एक प्रमुख पर्यटन कार्यक्रम बनला आहे, आणि सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून जागतिक मान्यता मिळवत आहे, असे ते म्हणाले.

राजकारण आणि उद्योजकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये विकास आणि प्रगतीसाठी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जोखीम पत्करणे आणि आव्हानांना तोंड देणे यामुळे अधिक यश मिळते, यावर त्यांनी भर दिला.

आपल्या वैयक्तिक नात्यांविषयी बोलताना पंतप्रधानांनी त्यांच्या पालकांपासून दूर जाण्याबाबतचे त्यांचे स्वतःचे अनुभव सामायिक केले. अतिशय लहान वयात घर सोडल्यामुळे आपल्याला पालकांशी निसर्गतः असलेल्या  जिव्हाळ्याचा फारसा अनुभव घेता आला नाही, मात्र आपल्या आईच्या शंभराव्या वाढदिवसाला तिने आपल्याला "सुज्ञपणे काम कर, पावित्र्याने जीवन जग"  असा अतिशय मौल्यवान सल्ला दिला, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपली आई अशिक्षित असली तरी तिने आपल्यामध्ये कित्येक शहाणपणाच्या गोष्टी रुजवल्या, असे ते म्हणाले. आपल्या आईबरोबर आपल्याला फार काळ व्यतीत करता आला नाही, मात्र आपण सतत कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे याकडे आईचा कटाक्ष असायचा, असे त्यांनी सांगितले. पालकांना गमावण्याचे दुःख म्हणजे भावभावनांचा कल्लोळ असतो मात्र त्यांनी आपल्याला दिलेली शिकवण आणि मूल्य म्हणजे आपल्यासाठी एक दीर्घ काळ राहणारा खजिनाच असतो, असे त्यांनी सांगितले.

राजकारण ही एक घृणास्पद गोष्ट असल्याच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की राजकारणी लोकांच्या कृतीमधून ही प्रतिमा बदलणे शक्य आहे. राजकारण हे अजूनही परिवर्तन घडवून आणू इच्छिणाऱ्या आदर्शवादी व्यक्तींसाठी योग्य स्थान आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या बालपणातील एका स्थानिक डॉक्टरांबद्दलचा किस्सा सांगितला या डॉक्टरांनी कमीत कमी निधीतून स्वतंत्र निवडणूक मोहीम चालवली आणि समाज नेहमीच खरेपणा आणि समर्पण भावना ओळखतो आणि त्याला पाठिंबा देतो हे दाखवून दिले. राजकारणामध्ये संयम आणि वचनबद्धतेला अनन्यसाधारण महत्व आहे मात्र नेहमी निवडणुकांच्या नजरेतून बघू नये याकडे यावर त्यांनी भर दिला. धोरण निर्मिती आणि समाजासाठी कार्य करणे हे अतिशय महत्वाचे आहे, यामुळे लक्षणीय परिवर्तन घडून येते, असे ते म्हणाले. यासाठी त्यांनी त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील उदाहरण दिले. त्यावेळी त्यांनी कशाप्रकारे अधिकाऱ्यांना भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रोत्साहन दिले आणि कालबाह्य नियम बदलून परिणामकारक निर्णय घ्यायच्या सूचना केल्या, ते पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी एका  उपक्रमाची माहिती दिली, ज्यामध्ये त्यांनी नोकरशहांना त्यांची कारकीर्द सुरू केलेल्या गावांना पुन्हा भेट देण्यासाठी, ग्रामीण जीवनाच्या वास्तविकतेशी पुन्हा जोडण्यासाठी आणि त्यांच्या कामाचा प्रभाव समजून घेण्यासाठी प्रोत्साहित केले होते. कठोर शब्द किंवा फटकारून न बोलता प्रशासनाच्या दृष्टिकोनातून  आपल्या टीमला  प्रेरित करणे आणि मार्गदर्शन करणे यावर आपला भर असल्याचे ते म्हणाले.

किमान सरकार आणि कमाल शासन या दृष्टिकोनाचा अर्थ असा नव्हे की कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे, किंबहुना या विचारामागे सुविहित प्रक्रिया आणि नोकरशहांवरील ताण कमी करणे असा विचार असल्याचे या विषयावरील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. नागरिकांवरील ताण कमी करण्यासाठी आतापर्यंत सुमारे 40,000 नियम रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सुमारे  1,500 कालबाह्य कायदे देखील रद्द करण्यात आले असून गुन्हेगारी कायद्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रशासन सुलभ करणे आणि ते अधिक कार्यक्षम करणे हे यामागील उद्दिष्ट आहे आणि हे प्रयत्न सध्या यशस्वीपणे राबवले जात आहेत, यावर त्यांनी भर दिला.

इंडिया स्टॅक उपक्रमाबद्दल  चर्चा करताना, पंतप्रधानांनी  UPI, ESIC आणि आधार यांसारख्या भारतातील डिजिटल उपक्रमांच्या परिवर्तनीय प्रभावावर प्रकाश टाकला. तंत्रज्ञानातील या क्रांतीमळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होऊ लागली आहे, ज्यामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण येऊन निधीचा अपहार होणे थांबले आहे, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या तंत्रज्ञान आधारित शतकात भारताने तंत्रज्ञानाला लोकशाहीच्या रंगात मिसळले आहे त्या निकषावर युपीआय जागतिक चमत्कार बनले आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी त्यांच्या तैवान भेटीचा एक किस्सा सामायिक केला, तैवान भेटीत आपण तेथील उच्च विद्याविभूषित नेत्यांमुळे प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय तरुणांनीही अशाच प्रकारची उत्कर्ष साधावा अशी  इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी तैवानच्या दुभाष्याशी झालेल्या संभाषणाची आठवणही सांगितली, ज्यांना भारताबद्दल जुना समज वाटत होता. पंतप्रधानांनी विनोदाने स्पष्ट केले की भारताच्या भूतकाळात सर्पमित्रांचा समावेश होता, आजचा भारत तंत्रज्ञानाने सक्षम  आहे, प्रत्येक मूल संगणकाचा माउस वापरण्यात पारंगत आहे.  भारताची ताकद आता त्याच्या तांत्रिक प्रगतीमध्ये आहे आणि सरकारने नाविन्यपूर्णतेला पाठिंबा देण्यासाठी स्वतंत्र निधी आणि आयोग तयार केले आहेत. आपल्या प्रयत्नांत अयशस्वी झाले तरी सरकार तरुणांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही देत त्यांनी तरुणांना धोका पत्करण्यास प्रोत्साहित केले.

भारताच्या जागतिक दृष्टिकोनाबद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले की हे केवळ त्यांचे एकट्याचे यश नसून सर्व भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. परदेशात प्रवास करणारा प्रत्येक भारतीय हा देशाचा राजदूत असून तो देशाच्या प्रतिमेला अधिक उंचावण्यात योगदान देतो, असे त्यांनी सांगितले. जगभरातील भारतीय समुदायाला देशाशी जोडण्याचे आणि त्यांच्या सामर्थ्याचा उपयोग करून घेणे हे  नीती आयोगाचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री होण्याआधी आपण केलेल्या अथक प्रवासाबद्दल आणि भारतीय समुदायाच्या क्षमतेला आपण कसे ओळखू शकलो याबाबत त्यांनी माहिती दिली. या समुदायामुळे  भारताचे जागतिक स्वरूप अधिक मजबूत झाले आहे.   गुन्हेगारी दराचे अल्प प्रमाण, उच्च शिक्षण पातळी आणि कायद्याचे पालन करण्याचा भारतीय नागरिकांचा  स्वभाव यामुळे जगात भारताबद्दल एक प्रकारची सकारात्मक जागतिक भावना  निर्माण झाली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. सामुहिक शक्तींचा फायदा घेऊन, सकारात्मक प्रतिमा राखून आणि मजबूत नेटवर्क आणि नातेसंबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून उद्योजक या दृष्टिकोनातून शिकू शकतात यावर त्यांनी भर दिला.

उद्योजकता आणि राजकारण या दोघांमधील स्पर्धेच्या महत्वावर त्यांनी भर दिला. अमेरिकेच्या सरकारने  2005 मध्ये त्यांना व्हिसा नाकारल्याचा किस्सा त्यांनी सामायिक केला. या गोष्टीकडे आपण निवडून आलेले सरकार आणि राष्ट्राचा अपमान असल्याचे समजलो, असे ते म्हणाले. जग भारतीय व्हिसासाठी रांगेत उभे राहील अशा भविष्याची कल्पना त्यांनी केली आणि आज 2025 मध्ये ते स्वप्न साकार होत आहे, असे ते म्हणाले. आपल्या अलीकडील कुवेत दौऱ्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी भारतीय युवा वर्ग आणि सर्वसामान्य माणसांच्या आकांक्षांवर भर दिला. आपल्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे असे स्वप्न पाहणाऱ्या एका मजुराशी झालेला संवाद त्यांनी सांगितला. अशा आकांक्षा भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने नेतील यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारतातील तरुणांची भावना आणि महत्त्वाकांक्षा देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताने सातत्याने शांततेचा पुरस्कार करून जगभरात विश्वासार्हता आणि निष्ठा प्राप्त केली आहे. भारत हा तटस्थ देश नसून शांततेचा कट्टर समर्थक आहे, आणि भारताची ही भूमिका देशाशी संवादात्मक संबंध असणाऱ्या प्रत्येक राष्ट्राला कळवली आहे, ज्यामध्ये रशिया, युक्रेन, इराण, पॅलेस्टाईन आणि इस्राईलचाही समावेश आहे, असे ते म्हणाले. कोविड-19 महामारीच्या संकटकाळात भारतीय नागरिकांना आणि शेजारील देशांतील नागरिकांना संकटातून बाहेर काढणे यासाठी भारताने केलेल्या  सक्रिय प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारतीय हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी देशाबाहेरील नागरिकांना परत देशात आणण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालून नागरिकांप्रती असलेली देशाची बांधिलकी दाखवून दिली, असे पंतप्रधान म्हणाले. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी घडलेली एक घटना त्यांनी सामायिक केली, जिथे नागरिकांना वाचवण्याच्या आणि परत आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे एका डॉक्टरने कौतुक केले ज्यांना अशा प्राण वाचवण्याच्या मोहिमांमध्ये करांचे मूल्य कळले. जागतिक स्तरावर नागरिकांची सेवा केल्याने सौहार्द्र  आणि परस्परसंवादाची भावना निर्माण होते. अबुधाबी या इस्लामिक देशात मंदिर बांधण्याकरता जमिनीसाठी केलेल्या विनंतीला मान देण्यात आल्याचाही  त्यांनी उल्लेख केला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताबद्दलचा आदर आणि विश्वास दिसून येतो. यामुळे लाखो भारतीयांना अतिशय आनंद झाला. शांतता आणि जगभरातील भारतीय नागरिकांच्या प्रति असलेली भारताची वचनबद्धता सदैव कायम राहील आणि जागतिक पटलावर देशाची विश्वासार्हता वृद्धिंगत होत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अन्नाच्या/ पदार्थांच्या आवडींबद्दल आपले विचार मांडताना मोदी म्हणाले की ते अन्नप्रेमी/खवैये नाहीत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांना जे काही दिले जाते त्याचा ते आवडीने स्वीकार करतात. त्यांनी नमूद केले की संघटनेत काम करताना, ते अनेकदा दिवंगत अरुण जेटलींवर अवलंबून असायचे.  जेटली भारतातील सर्वोत्तम रेस्टॉरंट्स आणि पदार्थांमध्ये पारंगत होते, असे ते म्हणाले.

गेल्या काही वर्षांत त्यांच्या भूमिकेतील बदलाच्या धारणांना स्पर्श करताना पंतप्रधान म्हणाले की परिस्थिती आणि भूमिका बदलल्या असल्या तरीही व्यक्ती म्हणून त्यांच्यात बदल होत नाही. त्यांना काहीही वेगळे वाटत नाही आणि त्यांच्या व्यक्तित्वाचे सार बदललेले नाही, असे देखील ते म्हणाले.

पंतप्रधानांनी नमूद केले की पद आणि जबाबदाऱ्यांमधील बदलाचा त्यांच्या मूलभूत मूल्यांवर आणि तत्त्वांवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांच्या  विविध जबाबदऱ्या आणि पदातील बदलांमुळे ते अस्थिर किंवा प्रभावित होत नाहीत, त्यांच्या कामासाठी समान नम्रता आणि समर्पण कायम ठेवतात, असे त्यांनी जोर देऊन सांगितले.

सार्वजनिक भाषणाबद्दल पंतप्रधानांनी आपले विचार मांडले, ते म्हणाले की स्वतःचा अनुभव महत्त्वाची भूमिका बजावतो. जेव्हा लोक स्वतःच्या अनुभवांवरून बोलतात तेव्हा त्यांचे शब्द, अभिव्यक्ती आणि कथन स्वाभाविकपणे प्रभावी होतात असे त्यांनी नमूद केले. गुजराती असूनही, अस्खलितपणे हिंदी बोलण्याची त्यांची क्षमता त्यांच्या सुरुवातीच्या जीवनातील अनुभवांमधून निर्माण झाली आहे.  जसे की रेल्वे स्थानकांवर चहा विकणे आणि वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांशी संवाद साधणे यामुळे ते शक्य झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. जमिनीशी जोडलेले राहणे, स्थिर राहणे आणि स्वतःच्या मुळांशी जोडलेले राहणे प्रभावी संवाद साधण्यास मदत करते. चांगल्या वक्तृत्वाचे सार हृदयापासून बोलणे आणि खरे अनुभव सांगणे यात आहे यावर त्यांनी भर दिला.

भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमच्या उत्क्रांतीवर मोदींनी प्रकाश टाकला. भारतातील तरुणांच्या शक्तीवर विश्वास व्यक्त करताना, त्यांनी पहिल्या स्टार्टअप परिषदेतील एक किस्सा सांगितला, जिथे कोलकाता येथील एका तरुणीने स्टार्टअप्सबद्दलच्या सुरुवातीच्या समजुतीचे वर्णन अपयशाकडे नेणारे मार्ग म्हणून केले होते.

पंतप्रधानांनी सांगितले की आज स्टार्टअप्सना प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता मिळाली आहे. भारतातील उद्योजकीय भावना मोठ्या स्वप्नांनी आणि आकांक्षांनी प्रेरित आहे आणि देशातील तरुण आता पारंपारिक नोकऱ्या शोधण्याऐवजी स्वतःचे उद्योग सुरू करण्याकडे अधिक इच्छुक आहेत यावर त्यांनी भर दिला.

सरकारच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्यकाळातील फरकांबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी भारताच्या विकासासाठी त्यांचे विकसित होत असलेले दृष्टिकोन सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ते आणि जनता दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि ते दिल्लीलाही समजून घेण्याचा प्रयत्न करत होते.

त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात, त्यांनी मागील कामगिरीची तुलना करण्यावर आणि नवीन ध्येये निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले. तथापि, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात, त्यांचा दृष्टिकोन लक्षणीयरीत्या विस्तारला आहे. त्यांनी यावर भर दिला की त्यांची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत, 2047 पर्यंत विकसित भारताचे स्पष्ट दृश्य आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांचा दृष्टिकोन लक्षणीयरीत्या बदलला आहे, 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शौचालये, वीज आणि पाईपलाईन पाणी यासारख्या मूलभूत सुविधा प्रत्येक नागरिकाला 100% देण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि हे अधिकार आहेत, विशेषाधिकार नाहीत असे प्रतिपादन त्यांनी केले. खरा सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता प्रत्येक भारतीयाला भेदभावाशिवाय लाभ मिळावा यात आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांची प्रेरक शक्ती "आकांक्षापूर्ण भारत" आहे आणि त्यांचे सध्याचे लक्ष भविष्यावर आहे, 2047 पर्यंत महत्त्वाचे टप्पे गाठण्याचे उद्दिष्ट आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की त्यांचा तिसरा कार्यकाळ मागील कार्यकाळांपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळा आहे, ज्यामध्ये महत्त्वाकांक्षा आणि दृढनिश्चयाची भावना वाढली आहे.

पंतप्रधानांनी पुढच्या पिढीच्या नेत्यांना तयार करण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि गुजरातमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पुढील 20  वर्षांसाठी संभाव्य नेत्यांना प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे असे नमूद केले. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ते त्यांच्या टीमला किती चांगल्या प्रकारे तयार करतात यावरून त्यांचे यश मोजले जाते यावर त्यांनी भर दिला. भविष्यासाठी एक मजबूत आणि सक्षम नेतृत्व सुनिश्चित करण्यासाठी तरुण प्रतिभेचे संगोपन आणि विकास करण्याची वचनबद्धता पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवार होण्यासाठी आणि यशस्वी राजकारणी होण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रता यातील फरकावर भर दिला. उमेदवारीसाठी मूलभूत आवश्यकता कमी असल्या तरी, यशस्वी राजकारणी होण्यासाठी अपवादात्मक गुणांची आवश्यकता असते असे त्यांनी नमूद केले. राजकारणी सतत तपासणीच्या कक्षेत असतो आणि एक चूक वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमाला बाधा आणू शकते यावर पंतप्रधानांनी भर दिला.

त्यांनी 24x7 जाणीव आणि समर्पण यावर भर देतानाच हे गुण  केवळ विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांद्वारे मिळवता येत नसल्याचे सांगितले. खऱ्या राजकीय यशासाठी अतुलनीय वचनबद्धता आणि सचोटी आवश्यक असते यावर त्यांनी भर दिला.

संवादाचा समारोप करताना,  मोदी यांनी देशातील तरुण आणि महिलांना संबोधित केले. नेतृत्व आणि राजकारणातील सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आणि तरुणींना स्थानिक प्रशासनात 50% आरक्षणाचा लाभ घेण्यास आणि विधानसभा आणि संसदेत प्रस्तावित 33% आरक्षणासह नेतृत्व भूमिकांसाठी स्वतःला तयार करण्यास प्रोत्साहित केले. पंतप्रधानांनी तरुणांना राजकारणाकडे नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता सार्वजनिक जीवनात ध्येय-केंद्रित दृष्टिकोनाने सहभागी होण्याचे आवाहन केले. सर्जनशील, समाधान-केंद्रित आणि देशाच्या प्रगतीसाठी समर्पित नेत्यांची गरज त्यांनी अधोरेखित केली.

2047पर्यंत आजचे तरुण देशाला विकासाकडे घेऊन जातील, असे त्यांनी अधोरेखित केले. युवकांच्या सहभागाचे त्यांचे आवाहन कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षापुरते मर्यादित नाही तर सर्व राजकीय पक्षांमध्ये नवीन दृष्टिकोन आणि ऊर्जा आणण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि भारताचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी तरुण नेत्यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

 

 

* * *

S.Kane/NM/Shailesh/Rajshree/Bhakti/Hemangi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2092281) Visitor Counter : 17