संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सध्याचे सुरक्षेशी संबंधित  वातावरण पाहता जागतिक समुदायांनी एकजूट  वाढवण्याचे  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  यांचे आवाहन


आशिया खंडातील सर्वात मोठे हवाई प्रदर्शन राष्ट्रांना एकत्रितपणे आपली बलस्थाने आणि क्षमतांचे आकलन करण्याची तसेच धोरणात्मक आणि सामरिक गरजा पूर्ण करण्याची संधी प्रदान करते"

Posted On: 10 JAN 2025 5:15PM by PIB Mumbai

 

अनेक संघर्ष आणि आव्हानांनी ग्रासलेले सध्याचे सुरक्षाविषयक वातावरण पाहता जागतिक समुदायांनी एकजूट वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  यांनी केले आहे. एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या राजदूतांच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. परस्पर समृद्धी आणि जागतिक शांततेसाठी सध्याच्या भूराजकीय तणावातून बाहेर येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शांतता आणि समृद्धीकरता एकत्रित कृती करण्याकरता समविचारी राष्ट्रांनी एकजुटीने कार्य करणे अतिशय महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. अन्यथा आजच्या युगात आपण अनुभवत असलेल्या तंत्रज्ञानातील नवकल्पना किंवा आर्थिक विकासाचा लाभ आपली पुढील पिढी घेऊ शकणार नाही, असे राजनाथ सिंह  यांनी या परिषदेला उपस्थित असलेल्या विविध देशांच्या राजदूतांना आणि उच्चायुक्तांना सांगितले.

भारत ग्लोबल साऊथच्या समस्या जगासमोर मांडणारा एक उदयोन्मुख देश बनला असून नेहमीच समान दृष्टिकोन बाळगत आला आहे, समृद्धीसाठी आवश्यक  सामूहिक प्रयत्नांमध्ये भारत नेहमीच विविध विचारांचा आदर करतो, असे सिंह  म्हणाले.

एअरो इंडिया हे आशिया खंडातील असे एक सर्वात मोठे हवाईप्रदर्शन आहे, ज्यामध्ये अनेक राष्ट्र सीमांच्या पलीकडे जाऊन दृढ बंध तयार करतात.  व्यवसायाच्या वाढत्या संधी, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, संयुक्त विकास आणि विविध उद्योगांमधील सह-उत्पादन यासाठी धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्याचे व्यासपीठ म्हणून हे प्रदर्शन एक उपयुक्त व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन उपक्रम आणि भागीदारी करू इच्छिणाऱ्या परदेशी कंपन्यांसाठी भारतीय हवाईक्षेत्र आणि संरक्षण क्षेत्र अतिशय आकर्षक संधी प्रदान करत आहे, असे ते म्हणाले.

भारत हे गुंतवणुकीसाठी एक अत्यंत आकर्षक  स्थान बनले असून एअरो इंडियामुळे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या राष्ट्रांना एकत्रितपणे आपली बलस्थाने आणि क्षमतांचे आकलन करण्याची तसेच धोरणात्मक आणि सामरिक गरजा पूर्ण करण्याची संधी प्राप्त होते. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी, भागीदारीच्या शक्यता आजमावण्यासाठी  एअरो इंडिया हवाई प्रदर्शन एक भक्कम पाया म्हणून कार्य करत आहे. आपण सर्वजण एकत्रितपणे सर्वसमावेशक आणि शाश्वत समृद्धीचा मार्ग निर्माण करू, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

या गोलमेज परिषदेत उपस्थित असलेले राजदूत आणि उच्चायुक्तांना राजनाथ सिंह  यांनी एअरो इंडिया 2025 मधील विविध महत्वपूर्ण कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली  आणि त्यांच्या वरिष्ठ  नेत्यांना वैयक्तिक रित्या आमंत्रण दिले.

एअरो इंडिया 2025 विषयी

15 वे  एअरो इंडिया 2025 हे हवाई प्रदर्शन  10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलहंका येथील हवाई  तळावर होणार आहे.

***

N.Chitale/B.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2091932) Visitor Counter : 33


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil