राष्ट्रपती कार्यालय
18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान
परदेशातील भारतीय समुदाय विकसित भारताच्या दृष्टीकोनाचा अविभाज्य भाग आहे- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
10 JAN 2025 4:53PM by PIB Mumbai
ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये आज (10 जानेवारी, 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी त्यांनी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देखील प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या परदेशातील भारतीय समुदाय आपल्या देशाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतो. त्यांनी या पवित्र भूमीतून प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्यच नाही तर अनेक शतकांच्या सभ्यतेचा पाया असलेली मूल्ये आणि नैतिकता देखील आपल्यासोबत नेली आहे.तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, कला किंवा उद्योजकता यापैकी कोणतेही क्षेत्र असो, भारतीय समुदायाने यामध्ये आपला असा ठसा उमटवला आहे की जग त्यांची दखल घेते आणि त्यांचा बहुमान करते.
यावेळी सर्व प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार विजेत्यांचे राष्ट्रपतींनी अभिनंदन केले.
प्रवासी भारतीय दिवस हा केवळ एक कार्यक्रम न राहता त्यापलीकडे गेला आहे हे पाहून राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. सध्या आपला देश 2047 पर्यंत विकसित भारतच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. हे एक राष्ट्रीय अभियान असून यामध्ये परदेशात राहणाऱ्यांसह प्रत्येक भारतीयाचा सक्रीय आणि उत्साही सहभाग आवश्यक आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. परदेशस्थ भारतीय समुदाय या दृष्टीकोनाचा अविभाज्य घटक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या जागतिक उपस्थितीने त्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन प्रदान केला आहे आणि त्यांच्या कामगिरीमुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये त्यांना लक्षणीय योगदान देता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताच्या वसुधैव कुटुंबकम या कालातीत तत्वज्ञानाचा संदर्भ देत राष्ट्रपती म्हणाल्या की, हा दृष्टीकोन केवळ आपल्या गरजांची पूर्तता करण्याविषयीच नाही तर जागतिक कल्याणातही योगदान देणारी परिसंस्था निर्माण करण्याबद्दलचा आहे. आम्ही आर्थिक प्रगती आणि सामाजिक न्याय आणि पर्यावरणीय व्यवस्थापन यांचे संतुलन साधणारे आणि भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करणारे राष्ट्र बनू इच्छित आहोत,असे त्यांनी सांगितले. या स्वप्नाच्या पूर्ततेत भारतीय समुदायाची भूमिका महत्त्वाची असेल असे त्या म्हणाल्या.
आपल्या प्रवासी भारतीय परिवाराच्या कामगिरीचा आनंद साजरा करताना, आपण आशा आणि निर्धाराने भविष्याकडेही लक्ष दिले पाहिजे. एकत्रितपणे, आपण एक विकसित भारत निर्माण करू शकतो, एक असे राष्ट्र जे जागतिक व्यासपीठावर उच्च स्थानी असेल आणि जगासाठी प्रकाशाचा किरण बनून राहील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2091923)
Visitor Counter : 42